Nigdi : गांधीजींच्या 150 व्या जयंतीवर्षानिमित्त स्वच्छतेबरोबर स्वदेशीचाही संकल्प करावा – काश्मिरी लाल

एमपीसी न्यूज – महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या वर्षात शासनाने स्वच्छतेबरोबर स्वदेशीचाही संकल्प करावा, यासाठी नागरिकांनी शासनाला मजबूर करावे, असे आवाहन स्वदेशी जागरण मंचचे राष्ट्रीय संघटक काश्मिरी लाल यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिलेल्या विशेष मुुलाखतीत केले.  

स्वदेशी जागरण मंचच्या एका कार्यक्रमासाठी काश्मिरी लाल निगडी येथे आले होते. त्यावेळी एमपीसी न्यूजचे संपादक विवेक इनामदार यांनी त्यांची मुलाखत घेतली.

स्वदेशी जागरण मंचची भूमिका समजावून सांगताना काश्मिरी लाल म्हणाले की, देश स्वतंत्र झाला पण देशाची आर्थिक धोरणे आणि मानसिकता मात्र स्वतंत्र झालेली नाही. त्यामुळे भारतात परदेशातील माल मोठ्या प्रमाणात येतो. इंग्रजांनी आपल्या देशाला 45 ट्रिलियन डॉलर्सना लुटले, ती लूट अजूनही चालूच आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या हेतूने 1991 मध्ये स्वदेशी जागरण मंचची स्थापना झाली. ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, असे दत्तोपंत ठेंगडी यांनी म्हटले होते. त्यामुळे ही लढाई आजही उपयुक्त आणि आवश्यक आहे.

‘वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्व आपण मान्य करतो, तेव्हा इतरांपासून आपण वेगळे राहू शकत नाही, मात्र आपण कोणाचीही शिकार बनू नये, इतरांच्या अटी-शर्तींप्रमाणे नव्हे तर आपली गरज आणि आपल्या अटी-शर्तीप्रमाणे आदान-प्रदान झाले पाहिजे, एवढीच स्वदेशी जागरण मंचची आग्रही भूमिका आहे, असे काश्मिरी लाल यांनी स्पष्ट केले.

भारतात दिवाळी साजरी केली जाते. दिवाळीच्या निमित्ताने आपल्याच देशातील बांधवांच्या विविध व्यवसायांना चालना मिळत असे. आपलेच काही बांधव दिवे बनवत, आपल्याच बांधवांनी बनविलेले तेल वापरले जायचे. पण अलिकडे चिनी दिवे आले आणि भारतातील पैसा चीनला जायला लागला. तेव्हा स्वदेशी जागरण मंचने म्हटले की, आपले सण आपल्या पद्धतीने साजरे करा. त्यामुळे जे हा सण साजरा करतात, त्यांचीही दिवाळी साजरी झाली पाहिजे. स्वदेशी जागरण मंचने ही भूमिका घेतल्यापासून भारताचे चीनशी व्यापारातील 10 अरब डॉलर्सचे नुकसान कमी झाले आहे. आपल्याला सगळ्यांबरोबर राहायचे आहे, पण ते आपल्या गरजा, आवश्यकता लक्षात घेऊन तसेच आपल्या अटींप्रमाणे राहायचे आहे, याकडे काश्मिरी लाल यांनी लक्ष वेधले.

स्वदेशी जागरण मंचने आतापर्यंत दिलेल्या विविध लढ्यांची माहिती काश्मिरी लाल यांनी दिली. स्वदेशी जागरण मंच स्वतः काही बनवत नाही आणि बनविण्याचा विचारही करीत नाही, पण देशाला लुटायला आलेल्या एन्रॉन कंपनीचा भांडाफोड स्वदेशी जागरण मंचने केला. विडी कामगारांचा रोजगार वाचविण्यासाठी लढा दिला. आयोडिनयुक्त मीठाच्या सक्तीमुळे भारतात सर्वसाधारण मीठाच्या विक्रीवर परिणाम झाला होता. तो प्रयत्न स्वदेशी जागरण मंचने हाणून पाडला.

रिजनल कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशीप (आरसीईपी) हा करार सोळा देशांमध्ये होऊ घातला होता. या करारामुळे भारताचे 105 अरब डॉलरचे व्यापारी नुकसान होणार होते. ही बाब स्वदेशी जागरण मंचने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास आणून दिली. अशा प्रकारे स्वदेशी जागरण मंचने ही दीर्घकालीन लढाई केली आहे. भारतीय लष्करला लागणारी हत्यारे भारतीय बनावटीचीच असावी. भारतात नवीन संशोधन व्हावे, नवीन भारतीय उत्पादने विकसित व्हावीत, भारताला लागणारी सर्व उत्पादने भारतात बनवली जाऊन भारत स्वयंपूर्ण व्हावा आदी मुद्द्यांचा स्वदेशी जागरण मंचने सातत्याने पाठपुरावा केला असून त्यात बऱ्यापैकी यश मिळाले आहे आणि भविष्यात आणखी यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताने उच्च तंत्रज्ञानाच्या उत्पादनांबाबत विदेशी सहकार्य घेण्यास स्वदेशी जागरण मंचची काहीच हरकत नाही, मात्र शून्य तंत्रज्ञानाची (झिरो टेक्नॉलॉजी) उत्पादने ही स्वदेशीच असली पाहिजेत. साबण, तेल, टूथपेस्ट, शाम्पू अशा ग्राहकोपयोगी वस्तूंमध्ये 80 टक्के उत्पादने परकीय आहेत. स्कूटर 50 टक्के विदेशी आहेत. कार 85 टक्के विदेशी आहेत. एसी, फ्रीज अशा वस्तू 85 टक्के विदेशी कंपन्यांच्या विकल्या जात आहेत. हे अशाच प्रकारे सुरू राहिले तर भारत पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कधीच बनू शकणार नाही. ग्राहकोपयोगी वस्तू घेताना विदेशी मालावर बहिष्कार टाकला तर भारत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होईल. शेतकरी कधीही आत्महत्या करणार नाही. भारतीय युवकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.

जागतिकीकरणाच्या काळात देशात विदेशी गुंतवणूक यावी यासाठी पंतप्रधानांना आवाहन करावे लागणार, पण त्यांच्या हृदयात स्वदेशी असली पाहिजे, अशी अपेक्षा काश्मिरी लाल यांनी व्यक्त केली. स्वदेशी जागरण मंच समाजात जागरुकता निर्माण करतो, तसेच शासनाला योग्यवेळी सावध करण्याचे काम करतो. विदेशी गुंतवणूक जरूर देशात यावी पण त्यांनी या देशात उत्पादन करावे. त्यातून येथील उद्योजक, व्यापारी यांना फायदा व्हावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही चांगल्या धोरणांमुळे देशातील व्यापाराला चालना मिळायला सुरूवात झाली आहे, ही समाधानाची बाब आहे, असे ते म्हणाले.

जगातील 16 देशांशी झालेले व्यापारी करार भारताचे नुकसान करत आहेत. भारताने आणखी जास्त देशांशी फायदेशीर व्यापारी करार करण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशाकडून आपण 18 अरब डॉलर मिळवू शकतो तर जगातील छोट्या छोट्या अनेक देशांकडून किती तरी फायदा मिळवू शकतो. या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन फायदेशीर जागतिक व्यापार वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, अशी सूचना त्यांनी केली.

हे दत्तोपंत ठेंगडी यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. ठेंगडी यांनी 17 देशांमध्ये जाऊन तेथील लोकांना स्वदेशीचे महत्त्व समजून सांगितले होते. चीनमध्ये भारतीय नागरिकांना यायला बंदी होती, त्या काळात कामगार संघटना कशी उभारावी, हे समजून घेण्यासाठी चीनने त्यांना बोलवले होते. ठेंगडी यांना समजून घेणे म्हणजे स्वदेशी समजून घेणे. ठेंगडींना समजून घेणे जगातले सर्वश्रेष्ठ तंत्रज्ञान भारतात विकसित करणे होय. त्यामुळे देशातील जनतेने ठेंगडी यांना समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वदेशी जागरण मंचने dbthengadi.in ही वेबसाईट विकसित केली असून त्यावर ठेंगडी यांची माहिती व विचार सर्वांसाठी उपलब्ध करून दिले आहेत. सर्वांनी या वेबसाईटला भेट देऊन ठेंगडी यांचे विचार समजून घ्यावेत, असे आवाहन काश्मिरी लाल यांनी केले.

आपले सण साजरे करताना स्वदेशीचा अंगीकार करावा. चीन होळी साजरी करत नाही, दिवाळी साजरी करत नाही, पण आपण होळी आणि दिवाळीला चिनी वस्तू खरेदी करतो. त्यामुळे चीनची दिवाळी होते आणि आपले दिवाळे निघतात. त्यामुळे लोकांनी सणांपासून सुरूवात करून सर्वसामान्य जीवनापर्यंत स्वदेशीचा स्वीकार करावा, असे आवाहन काश्मिरी लाल यांनी सर्व जनतेला केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.