Pune : कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त भागात इंडो ऍथलेटिक सोसायटीकडून 15 टन धान्याचे वाटप

एमपीसी न्यूज- कोल्हापूर व सांगली पूरग्रस्त भागामधील नागरिकांना शनिवारी (दि.24) देशाच्या विविध भागात क्रीडा, आरोग्य व पर्यावरण या क्षेत्रामध्ये काम करत असलेल्या इंडो ऍथलेटिक सोसायटीकडून तब्बल 15 टन धान्य व जीवनावश्यक गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

तीन आठवड्यांपूर्वी या भागांमध्ये प्रलय निर्माण झाल्याचे समजल्यानंतर लगेच कमिटीतर्फे तातडीची बैठक बोलविण्यात आली व सर्व सदस्यांना मदतीसाठी आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यांमध्ये त्याचप्रमाणे भारताबाहेरील सदस्यांना देखील सोशल मीडिया नेटवर्कद्वारे कळवण्यात आले त्याप्रमाणे पुण्यामध्ये चार व पिंपरी-चिंचवडमध्ये चार ठिकाणी संकलन केंद्र तयार करण्यात आली.

केवळ दोन आठवड्यांमध्ये जवळजवळ 1५ टन धान्य जमा करण्यात आले त्याचे प्रत्येक कुटुंबासाठी 25 किलो धान्याचे पॅकेट तयार करण्यात आले. त्याच्यामध्ये गहू, तांदूळ, ज्वारी, तेल, साखर, चहा पत्ती, साबण, ब्लॅंकेट, चादर, टॉवेल, मीठ, तूरडाळ, साडी इत्यादी वस्तूंचा समावेश करून त्याचे वर्गीकरण करून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील जवळजवळ सातशे कुटुंबांना वाटप करण्यात आले, कोल्हापूरमध्ये राजापूर, राजापूर वाडी, खिद्रापूर या ठिकाणी तर सांगलीमध्ये रेठरे हरणाक्ष, जुना खेडा ,बिचूद या गावांमध्ये सदस्यांतर्फे घरांची पाहणी करून त्यांना टोकन देऊन ते टोकन दाखवून गावातील मध्यवर्ती ठिकाणी ट्रक मधून सामानाचे किट घेण्यास सांगण्यात आले अशाप्रकारे गरजू व्यक्तींना संस्थेतर्फे धान्यवाटप करण्यात आले.

इंडो ऍथलेटिक सोसायटी संस्थेने आवाहन केल्यानंतर अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, कॅनडा येथील सदस्यांनी देखील आवाहनाला प्रचंड प्रतिसाद देत मदतीचा हात पुढे केला. शहरांमधील अटॉस सिन्टेल, श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, ऑल्विन फायनान्स, मोरया शिक्षण संस्थेचे वि. एम. माटे स्कूल, जय अंबे ट्रान्सपोर्ट व गजराज क्लीनर्स यांचे विशेष सहकार्य लाभले. नवीन त्याचप्रमाणे जुन्या कपड्यांचे दान देखील केले. परंतु कपडे वर्गीकरण करून व्यवस्थित ड्रायक्लिनिंग व इस्त्री करून नंतरच ते सांगली व कोल्हापूर या ठिकाणी पाठवण्यात आले. मोहीम संपल्यानंतर महत्वाची औषधे कोल्हापूरमध्ये काम करत असलेल्या डॉक्टरांच्या युनिटला देण्यात आली.

कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक सदस्यांनी स्वतः गावात सर्वेक्षण केल्यामुळे गरजू लोकांना मदत पोहोचली, कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही गावकऱ्यांचे देखील सहकार्य केले. सर्व मदत गरजू व्यक्तीच्या हातात गेल्यामुळे गावकऱ्यांच्या तर्फे संस्थेच्या कामाचे कौतुक व सत्कार देखील करण्यात आले. पूरग्रस्त व दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांना शिक्षण साहित्य मोफत देण्यात येईल असे संस्थेतर्फे सांगण्यात आले. जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांना शालेय मदत पोहोचवण्याचे संस्थेचा मानस आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.