
Indonesia Volcano Eruption: इंडोनेशियातील माऊंट सीनाबंग ज्वालामुखीतून आकाशात 5 किलोमीटर उंच धुराचे लोट

एमपीसी न्यूज – इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर गेली अनेक वर्षे धगधगत असलेल्या माउंट सीनाबंग ज्वालामुखीतून आज (सोमवारी) सकाळी अचानक मोठा स्फोट होऊन उद्रेक झाला. या ज्वालामुखीतून मोठ्या प्रमाणात राख व धूर बाहेर येऊ लागला. आकाशात सुमारे पाच हजार मीटर म्हणजेच 16 हजार 400 फूट उंचीपर्यंत आकाशात फक्त धुराचा लोट उसळला तसेच आसपासच्या भागात राख पडू लागली.

जियोलॉजिकल हॅझार्ड मिटिगेशन सेंटरच्या म्हणण्यानुसार, ज्वालामुखी फुटल्यामुळे कोणाचाही मृत्यू झाल्याचे अथवा कोणालाही दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

ज्वालामुखीपासून पाच किलोमीटरच्या परिसरात कोणीही जाऊ नये, असा सल्ला ग्रामस्थांना देण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्वालामुखीतून लाव्हा रस बाहेर पडत असल्याबद्दल त्यांना इशारा देण्यात आला असून दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. या घटनेचा सध्या तरी हवाई वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे परिवहन मंत्रालयाने म्हटले आहे.
या ज्वालामुखीमुळे गेल्या काही वर्षांत सुमारे 30 हजार लोकांना घरे सोडून इतरत्र स्थायिक होण्यास भाग पाडले गेले आहे. तथापि, ज्वालामुखीच्या सभोवतालच्या क्षेत्रावर बर्याच वर्षांपासून बंदी आहे.
