Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात 100 विद्यार्थ्यांचे लसीकरण

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, उच्च शिक्षण विभाग पुणे, विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे यांच्या सहकार्याने इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे इंद्रायणी महाविद्यालयात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. मिशन युवा स्वास्थ्य अभियानातंर्गत घेण्यात आलेल्या या लसीकरण शिबिरात 100 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

या शिबीराचे उद्घाटन इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे व तळेगाव दाभाडे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महालींगे यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संभाजी मलगे हे होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख वैद्यकिय अधिकारी डाॅ.महालींगे म्हणाले की, कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण हा प्रभावी उपाय असून ज्या विद्यार्थ्यांचे वय वर्षे 18 पुर्ण झालेले आहे अशा सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लसीकरण करुन घ्यावे.

संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे आपल्या मनोगतात म्हणाले, मावळ तालुक्यात कोविड- 19 हा साथीचा आजार जरी नियंत्रणात आला असला तरी तो पुर्णतः संपुष्टात आलेला नाही.यासाठी लसीकरणाबरोबरच निर्जंतुकीकरण,मास्क वापरणे,योग्य सामाजिक अंतर राखणे या सारख्या उपाययोजनांचा देखील वापर करणे आवश्यक आहे.

प्राचार्य डॉ संभाजी मलघे म्हणाले, विद्यार्थी हा महाविद्यालयाचा केंद्रबिंदू असून विद्यार्थी हित लक्षात घेता कोव्हिड प्रतिबंधक सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून महाविद्यालयात “मिशन युवा स्वास्थ्य ” या अभियानातंर्गत महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शिक्षक व कर्मचारी यांच्या लसीकरणाची व्यापक मोहीम महाविद्यालयात राबवली जात आहे. या लसीकरण मोहिमेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले.

“मिशन युवा स्वास्थ्य” या अभियानातंर्गत कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण शिबीरात एकूण 100 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लस घेतली आहे.

शिबीराच्या सुरवातीला प्राचार्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी डाॅ.एस.एस.मेंगाळ यांनी केले. या शिबीराच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.प्रमोद बोराडे,डाॅ.सत्यम सानप, प्रा.राजेंद्र आठवले, विज्ञान विभाग प्रमुख प्रा.रोहित नागलगाव,प्रा.विद्या भेगडे,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

सदर शिबीराचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयूक्त विद्यमाने करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.