chikhali News : जलपर्णीच्या विळख्यात हरवली ‘इंद्रायणी’; डास आणि माशांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त

जलपर्णी हटविण्यासाठी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे महापौरांना साकडे

‘नमामी गंगे’च्या धर्तीवर ‘नमामी इंद्रायणी’ अभियान सुरू करण्याची आवश्यकता

एमपीसीन्यूज : वारकरी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या इंद्रायणी नदीची चिखलीत अतिशय वाईट अवस्था झाली आहे. संपूर्ण नदीपात्र जलपर्णीने झाकले गेले आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच गायब झाल्याचे दिसून येते. त्यामुळे नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी महापौर माई ढोरे यांना साकडे घातले आहे.

याबाबत दिनेश यादव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकतीच महापौर उषा माई ढोरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शिष्टमंडळात श्री रामकृष्ण लांडगे ,अनिकेत शेलार, दीपक घन, प्रकाश चौधरी, जवाहर ढोरे यांचा समावेश होता.

वाढत्या शहरीकरणामुळे नद्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. अनेक ठिकाणाहून रसायन व सांडपाणी मिश्रित पाणी चिखली येथे इंद्रायणी नदीत सोडले जात आहे. त्यामुळे नदीपात्रात जलपर्णीची वाढ झाली आहे.

याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून, अधिकाऱ्यांना सांगून देखील जलपर्णी काढली जात नाही. नद्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी काहीही हालचाली होत नाहीत. ‘नमामी गंगे’च्या धर्तीवर ‘नमामी इंद्रायणी’ अभियान सुरू करण्याची आवश्यकता आहे.

नद्यांचे संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. मनपाने याबाबत पुढाकार घेऊन चिखलीत या मोहिमेचा प्रारंभ करून नद्यांच्या बाबतीत प्रशासन गंभीर आहे याची जाणीव नागरिकांना करून देणे गरजेचे असल्याचे यादव यांनी महापौरांना सांगितले.

जलपर्णी वाढल्यामुळे चिखली भागात डास, माशा व कीटक यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिक त्रस्त आहेत आणि पालिकेने त्वरित याबाबत उपाययोजना करावी अशी नागरिकांची मागणी आहे. जलपर्णी काढल्यानंतर नदीचे पाणी स्वच्छ होऊन त्याचा जनसामान्यांना वापर करता येईल तसेच आजारांना देखील आळा घालता येणे शक्य होईल.

दरम्यान, महापौर माई ढोरे यांनी संबंधित विभागाचे अधिकारी अनिल रॉय यांना लवकरात लवकर इंद्रायणीत जलपर्णी काढण्याच्या सूचना दिल्याची माहिती यादव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.