Bhosari News : ‘रिव्हर सायक्लोथॉन’द्वारे इंद्रायणी नदीस्वच्छतेची जनजागृती; सुमारे 12 हजार सायकलपटुंचा सहभाग

एमपीसी न्यूज – इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडली. यामध्ये सुमारे 12 हजार सायकलपटू, पर्यावरण प्रेमींनी सहभाग घेतला. भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी काम करणारी अविरत श्रमदान, सायकल मित्र, महेशदादा स्पोर्ट्स फाउंडेशन, पर्यावरण प्रेमी संस्था आणि पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या पुढाकाराने या सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, अविरत श्रमदान संस्थेचे संस्थापक सदस्य डॉ. निलेश लोंढे, भाजपा प्रवक्ते अमोल थोरात, सरचिटणीस विजय फुगे आदी उपस्थित होते.

रिव्हर सायक्लोथॉन तीन टप्प्यांमध्ये झाली. लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सात किमी मर्यादा होती. अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता. दुसरा टप्पा 15 किमी अंतराचा अंकुशराव लांडगे सभागृह- जय गणेश साम्राज्य क्रांती चौक- जय गणेश साम्राज्य- अंकुशराव लांडगे सभागृह असा होता. तर, 25 किमी अंतराच्या सायक्लोथॉनसाठी अंकुशराव लांडगे सभागृह- स्पाईन रोड- क्रांती चौक साने चौक, कृष्णानगर- अंकुशराव लांडगे सभागृह असा मार्ग होता.

इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानासह मोशी येथे साकारण्यात येत असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जगातील सर्वांत उंच पुतळा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ बाबत जनजागृती करण्यात आली. सायक्लोथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलपटूला टी-शर्ट, हॅवर सॅक, वॉटर बॉटल आणि मेडल मोफत देण्यात आले.

“भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने इंद्रायणी नदी स्वच्छता अभियानाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेली भारतातील सर्वांत मोठी ‘रिव्हर सायक्लोथॉन’ पाहून अभिमान वाटतो. भोसरीच्या गावजत्रा मैदानावर जमलेला सायकलपटूंचा हा सागर नाही, तर महासागर आहे”, अशा शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपक्रमाचे कौतुक केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.