Bhosari : इंद्रायणी नदीच्या पुनरुज्जीवनासाठी ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प’ – आमदार महेश लांडगे

एमपीसी न्यूज – देहू-आळंदी या तीर्थाक्षेत्रांवरून वाहणारी इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण विरहित करण्यासाठी आम्ही पावले उचलली आहेत. आजवर न झालेले नदी स्वच्छतेचे काम करण्याचा प्रण आम्ही घेतला आहे. ‘इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प’ नदी स्वच्छतेसह आदर्श प्रकल्प म्हणून उदयास येईल, असे मत आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे केले.

भाजप-शिवसेना-रिपाई-रासप-शिवसंग्राम संघटना-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे कोपरा सभा झाली. या सभेत आमदार महेश लांडगे यांनी विरोधकांवर टीका न करता त्यांनी केलेल्या कामांचा आढावा उपस्थित मोशीकरांसमोर मांडला. आजवर जे प्रश्न सोडविण्याचे धाडस कोणीही केले नाही. त्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर औद्योगिक शहर आहेत. भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात कारखाने आहेत. या कारखान्यांचे दुषित पाणी इंद्रायणी नदीत कोणतीही प्रक्रिया न करता सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषण होते. जलपर्णी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. इंद्रायणी नदी देहू आणि आळंदी या तीर्थक्षेत्रांवरून वाहत असल्याने नदी प्रदूषणाचा परिणाम राज्यभरातून येणा-या लाखो भाविक भक्तांना होतो.

आमदार महेश लांडगे म्हणाले, “मागील १५ वर्षात ज्यांना नदी स्वच्छ करता आली नाही, त्यांनी यावर बोलू नये. आम्ही हा प्रकल्प हाती घेतला आहे. मागील काही दिवसांपूर्वी त्याचे भूमिपूजन देखील झाले आहे. येत्या काही दिवसात त्याचे काम वेगाने सुरु होईल. इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हजारो पर्यटक नदीकाठी भेट देतील. मोशी कचरा डेपोचे पावसाचे पाणी देखील इंद्रायणी नदीत जात आहे. त्यावर देखील तोडगा काढण्याचे काम सुरु आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.