Chakan : ‘औद्योगिक गुन्हेगारीचे कंबरडे मोडणार’

चाकण येथे फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या बैठकीत पोलीस आयुक्तांचे आश्वासन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड या कामगार नगरीचा चाकण हा महत्वाचा औद्योगिक परिसर आहे. चाकणसह शहरातील संपूर्ण औद्योगिक परिसरात शांतता अबाधित राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. काही गुन्हेगारी कुरापती होत असतील तर गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस तत्पर आहेत, असे आश्वासन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या बैठकीत दिले.

चाकण येथे पिंपरी-चिंचवड पोलीस आणि फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के आणि परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. लहान, मोठे उद्योग आहेत. त्यामुळे राज्यासह देशभरातून शहरात नागरिक वास्तव्यास आले आहेत. त्यात अनेक वेळेला कंपनी प्रशासनासोबत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक वाद घालतात. त्यातून तक्रारी वाढतात. औद्योगिक गुन्हेगारीचे कंबरडे मोडण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सक्षम असून असे प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले आहे.

दरम्यान, चाकण परिसरात महाळुंगे पोलीस ठाणे तसेच वासोली, उरुळी आणि खराबवाडी येथे पोलीस चौकी सुरु करण्यासाठी मागणी करण्यात आली. यावर बोलताना आयुक्त म्हणाले, महाळूंगे पोलीस ठाणे आणि चौकीच्या मागणीसाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरु आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यास त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येईल. तोपर्यंत या परिसरात पोलीस गस्त वाढवण्यासाठी कंपन्यांनी सीएसआर फंडातून मदत करावी. कंपन्यांकडून वाहनांची मदत झाल्यास पोलीस बळाचा पुरवठा करून गस्त वाढवण्यास मदत होईल, असेही आयुक्त म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.