Pimpri : ‘आयआयएमएस’च्या एमबीए शाखेतील विद्यार्थ्याची कात्रज डेअरीला इंडस्ट्रीअल व्हिजिट

एमपीसी न्यूज – चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए शाखेतील विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाचा महत्वाचा भाग म्हणून इंडस्ट्रिअल व्हिजिट उपक्रमांतर्गत पुणे येथील  पुणे जिल्हा सहकारी दूध  उत्पादक संघ यांच्या कात्रज डेअरीला भेट दिली आहे.

याप्रसंगी   कात्रज डेअरीच्या  प्रशिक्षण  व मनुष्यबळ  व्यवस्थापन  विभागाच्या  सहाय्यक  व्यवस्थापिका  अर्चना  नरुटे, आयआयएमएसचे संचालक  डॉ.शिवाजी  मुंढे, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस, प्रा. डॉ. पुष्पराज वाघ, प्रा. डॉ. सचिन आंबेकर, प्रा.डॉ. अमित  गिरी, प्रशांत  कुलकर्णी, अमृता तेंडुलकर,आदिती  चिपळूणकर,  संदीप  गेजगे यांच्यासह  सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी  मोठ्या  संख्येने  उपस्थित  होते.

सुरुवातीला  डेअरी व्यवस्थापनाकडून  विद्यार्थ्यांना  डेअरीबद्दलचा  माहितीपट  दाखविण्यात आला. तसेच आकाश  वाळुंज व विशाल कामठे या  दोन्ही मार्गदर्शकांनी विद्यार्थ्यांना  संपूर्ण डेअरी परिसर, दूध संकलन विभाग, शीतकरण  विभाग, पॅकेजिंग विभाग, आईस्क्रीम  विभाग आदी  सर्व  विभागांचे  कामकाज  प्रत्यक्ष  दाखवून  कामकाजाची  सविस्तर माहिती दिली.

विविध ग्रामीण भागातील  गवळ्यांकडून  दररोज दूध  संकलन करून, त्याची दर्जा  तपासणी झाल्यावर योग्य त्या दुधाचा स्वीकार करून ते दूध  डेअरीत आणले जाते. दूध संकलनाची  विविध ठिकाणी आठ शीतकरण केंद्र देखील सुरु करण्यात आली आहेत.  १९६० साली सुरु झालेल्या  कात्रज डेअरीतून   सध्या दररोज अडीच  लाख लिटर  दूध  उत्पादित  केले जाते. सहकारी  तत्वावर सुरु करण्यात आलेल्या  या डेअरीच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना लाभ होत आहे.

दूध  उत्पादन व दुग्धजन्य  पदार्थांचा  दर्जा  एकसमान  राहावा यासाठी  शेतकऱ्याचे  प्रशिक्षण, पशुधनाची  काळजी, पशु आहार याबाबतही  कात्रज डेअरी व्यवस्थापनाकडून  मार्गदर्शन  करण्यात  येते.व्यवस्थापन शास्त्रातील  तत्वे  कशाप्रकारे  डेअरीच्या  कामकाजात अंमलात  आणली जातात  याबद्दल  विद्यार्थ्याना  मार्गदर्शन  करण्यात  आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.