पुणे मेट्रो

(श्रीपाद शिंदे)

पुणे शहर म्हणजे दक्खनची राणी ! महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, भारतातील माहिती आणि तंत्रज्ञानाचं ऑक्सफर्ड असलेलं अत्यंत महत्वाचं केंद्र. असं या शहराचं वर्णन केलं जातं. तसेच पुण्याला लागूनच असलेला परंतु स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेला पिंपरी-चिंचवडचा औद्योगिक परिसर देखील पुणे जिल्ह्याच्या वैभवात भर घालतो. जगभरातून कामासाठी, व्यवसायासाठी, शिक्षणासाठी विद्यार्थी, नागरिक या दोन्ही शहरात येत असतात. पुणे हे आशिया-पॅसिफिक प्रदेशातील अतिशय जलदगतीने विकासाकडे वाटचाल करणा-या शहरांपैकी एक आहे. त्याचबरोबर भव्यदिव्य स्थापत्यशास्त्र पुण्यात ठिकठिकाणी बघायला मिळतं. वैभवशाली आणि तेजस्वी भूतकाळ लाभलेल्या या शहराला आणखी उत्साही बनविण्यासाठी मेट्रो येत आहे. यामुळे कलेच्या आविष्काराने ओतप्रोत भरलेली वाहतुकीची स्वतःची जलद प्रणाली साकारली जाणार आहे.

भारतातील दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये पुणे नवव्या स्थानावर आहे. शैक्षणिक संस्था, औद्योगिकरण यामुळे हे शहर अफाट वाढलं आहे. याचा सार्वजनिक वाहतुकीवर प्रचंड ताण येतो. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण आणि रस्त्यांवरील अपघात याचा सामना सध्या शहराला करावा लागत आहे. ही संकटे कमी करण्यासाठी शहरात सार्वजनिक वाहतूक सेवेचे जाळे पसरविणे आवश्यक आहे. बीआरटी, लोकल रेल्वे सध्या उपलब्ध असली तरी अजूनही सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणावी तेवढी मजबूत झालेली नाही. त्यासाठी मेट्रोची आवश्यकता भासते. पुणे मेट्रोचा दोन्ही शहरातील सुमारे 50 लाख प्रवाशांना फायदा होणार आहे.

पुणे मेट्रोचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीला देण्यात आला. कंपनीने 31.254 किलोमीटरच्या अंतराचा अहवाल तयार केला. यामध्ये पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण असे दोन मार्ग तयार करण्यात आले. प्रत्येक मार्गावर मेट्रोचे एक आगार असून त्यामध्ये मेट्रोची स्वच्छता, समयोचित तपासणी, देखभाल, किरकोळ दुरुस्ती आणि तांत्रिक भागांची देखभाल करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट हा पहिला मार्ग (कॉरिडॉर एक) आहे. या मार्गावर भुयारी आणि जमिनीवरील दोन्ही प्रकारे मेट्रो धावणार आहे. 16.6 किलोमीटरच्या या मार्गावर 14 स्थानकं असणार आहेत. तर वनाज ते रामवाडी हा दुसरा मार्ग (कॉरिडॉर दोन) आहे. 14.7 किलोमीटरच्या या मार्गावर 16 स्थानकं आहेत. प्रत्येक नागरिकाला मेट्रो स्थानकापर्यंत सहजतेने पोहोचता यावे. तसेच मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर गंतव्य स्थळी सहज पोहोचता यावे, हा उद्देश ठेवून स्थानकांची निर्मिंती करण्यात आली आहे.

मेट्रो स्थानकं अनोख्या पद्धतीची बनविण्यासाठी मेट्रोकडून स्थापत्यशास्त्र क्षेत्रात काम करणा-या जगभरातल्या कंपन्यांकडून स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आल्या. मेट्रो स्थानकांची निर्मिती करताना लहान मुले, वृद्ध नागरिक, गरोदर महिला, अपंग या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे मेट्रोच्या डब्यांमध्ये चोवीस तास निगराणी ठेवणार आहेत. त्यामुळे मेट्रोचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. संस्कृतीने नटलेल्या या शहरात स्थापत्यशास्त्राचे अनोखे नमुने मेट्रो स्थानकांमध्ये तयार करण्यात येणार आहेत. त्यामुळे या शहराच्या लौकिकात आणखीनच भर पडणार आहे.

मेट्रो मार्गाचा विस्तार : मेट्रो, महापालिका आणि लोकप्रतिनिधी
पुणे मेट्रो सध्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गावर धावणार आहे. पिंपरी-चिंचवड मधील नागरिकांनी मेट्रो पहिल्या टप्प्यात निगडी पर्यंत पोहोचावी अशी मागणी केली. यासाठी विविध सामाजिक संघटनांनी आंदोलने, मानवी साखळी, उपोषण, महापालिका प्रशासनाकडे निवेदने, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने महा मेट्रोला पिंपरी-चिंचवड महापालिका ते निगडी या मार्गाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास सांगितले. त्यानुसार महामेट्रोने हा डीपीआर तयार केला असून तो महापालिकेकडे देण्यात आला आहे. याचप्रमाणे कासारवाडी ते चाकण या मार्गावर मेट्रो धावावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे आणि चाकण, भोसरीकर करीत आहेत. पुण्यामध्ये स्वारगेटपासून कात्रज पर्यंत मेट्रो धावायला हवी, अशी मागणी पुणेकरांनी केली आहे. जवळपास सर्वच मार्गांवर मेट्रोचा विस्तार करावा अशी मागणी होत आहे. पण त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन कितीपट उत्साही आहे, हे पाहणे महत्वाचे आहे.

पर्यावरणपूरक मेट्रो –
पुणे मेट्रो पर्यावरण पूरक बनविण्यासाठी विविध उपाय योजण्यात आले आहेत. मेट्रोमार्गात अडथळा ठरणारे वृक्ष एका जागेवरून दुस-या जागेवर पुनर्रोपित करण्यात येत आहेत. तसेच काही झाडांना तोडावे लागणार आहे. तोडाव्या लागणा-या झाडांच्या संख्येच्या दहापट झाडे महामेट्रोकडून लावण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो मार्गातील एकूण 419 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. पुणे मेट्रोला आणखी पर्यावरणपूरक बनविण्यासाठी मेट्रो खांबांवर व्हर्टिकल गार्डन, मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण असे मार्ग अवलंबिण्यात आले आहेत. मागील वर्षी महामेट्रोकडून सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली. सर्व झाडे चांगल्या स्थितीत तग धरून वाढीला लागली आहे. तसेच यावर्षी जून महिन्यापर्यंत सुमारे तीन हजार झाडे लावण्यात आली. 2018 अखेर पर्यंत आणखी तीन हजार झाडे लावण्यात येणार आहेत. एकूण सुमारे 10 हजार पेक्षा जास्त झाडे दोन वर्षांमध्ये लावण्यात येणार आहेत. मेट्रोमार्गास अडथळा ठरणा-या झाडांमध्ये प्रामुख्याने बदाम, मोहगनी, पिवळा गुलमोहर, पिंपळ, गुलमोहर, पार्किया आदी प्रमुख झाडे आहेत. 419 झाडे पुनर्रोपित करण्याचे टेंडर ग्रीन मॉर्निंग हैद्राबाद या संस्थेला देण्यात आले आहे.

पुणे मेट्रोसाठी लागणा-या एकूण ऊर्जेच्या 65 टक्के ऊर्जेची गरज सौरऊर्जेतून भागवली जाणार आहे. त्यामुळे पुणे मेट्रोला ग्रीनेस्ट मेट्रो असं संबोधलं जाणार आहे. सर्व स्थानकांचे छप्पर, आगाराच्या भिंती, आगारातील निवा-याचे छप्पर आणि रिकाम्या जागांवरील सौर पीव्ही पॅनल्स बसविण्यात येणार आहेत. पावसाळ्यातील पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), हिरव्या इमारतींचे तंत्र (ग्रीन बिल्डिंग टेक्निक्स), बायो डायजेस्टर टेक्नॉलॉजी आदी उपाय देखील करण्यात येणार आहेत.

कॉमन मोबिलिटी कार्ड

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो सुरु झाली तरी शहराच्या सर्व भागामध्ये मेट्रो पोहोचणे शक्य नाही. त्यामुळे प्रवाशांना मेट्रो, बीआरटी, पीएमपीएमएल या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करावा लागणार आहे. सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करत असताना प्रवाशांना प्रत्येक वेळी तिकीट काढावे लागू नये यासाठी मेट्रो कॉमन मोबिलिटी कार्ड सुरु करण्याची योजना बनवीत आहे. यामुळे केवळ एकदा तिकीट काढले तर पुढे संपूर्ण प्रवासात कुठेही तिकीट काढायची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.

ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट

मेट्रो स्थानकावर उतरल्यानंतर प्रवाशांना पुढील प्रवासासाठी किंवा गंतव्य स्थळी पोहोचण्यासाठी इतरत्र धावपळ करावी लागू नये, यासाठी सर्व प्रकारच्या वाहतूक सेवांचा समन्वय साधत मेट्रो स्थानकाबाहेर आगळे वेगळे बस स्थानक, टॅक्सी स्टॅन्ड, रिक्षा स्टॉप किंवा अन्य वाहतूक सेवा पुरविण्याचा विचार मेट्रोचा सुरु आहे.

# मेट्रो मार्ग –

कॉरिडॉर एक – पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट (उत्तर-दक्षिण)
अंतर – 16.589 किलोमीटर (उंचीवरील मार्ग – 11.570 किलोमीटर, भुयारी मार्ग – 5.019 किलोमीटर)
मेट्रो स्थानके – 14

कॉरिडॉर दोन – वनाज ते रामवाडी (पश्चिम-पूर्व)
अंतर – 14.665 किलोमीटर( संपूर्ण उंचीवरील रेल्वे मार्ग)
मेट्रो स्थानके – 16

मेट्रो डेपो – रेंजहिल डेपो, वनाज डेपो

पुणे मेट्रोच्या महत्वपूर्ण नोंदी –
# प्रकल्प मूल्य – 11 हजार 420 कोटी (केंद्रीय करांसहित)
# 8 डिसेंबर 2016 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रोला मंजुरी
# 10 डिसेंबर 2016 – एनएमआरसीएल या प्रकल्पासंचालक संस्थेने टीडीआरचे पुनरावलोकन व पुढील कार्ययोजना तयार करण्यासाठी एक चमूची स्थापना केली.
# 24 डिसेंबर 2016 – पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोनशिला बसविण्यात आली.
# 29 डिसेंबर 2016 – महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोचे संकेतस्थळ आणि समाजमाध्यम वाहिन्यांचे लोकार्पण केले.
# 1 जानेवारी 2017 – कोरेगाव पार्क येथे पुणे मेट्रोचे कार्यालय कार्यान्वित झाले.
# 21 जानेवारी 2017 – पुणे मेट्रोबद्दल नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी पहिला संवाद घेण्यात आला.
# 23 जानेवारी 2017 – महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा मेट्रो) ची स्थापना करण्यात आली.
# 7 एप्रिल 2017 – वनाज ते दिवाणी न्यायालयापर्यंतच्या 7.150 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी दुसरे कंत्राट देण्यात आले.
# 3 मे 2017 – पादचारी पुलाचे पहिले कंत्राट देण्यात आले.
# 1 जून 2017 – नाशिक फाटा येथे पहिले खोदकाम सुरु करण्यात आले.
# 5 जून 2017 – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आकुर्डी येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
# 13 जून 2017 – पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या करारपत्राच्या टप्प्याला महाराष्ट्र मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
# 22 जून 2017 – पहिला स्तंभ उभारण्यासाठी खोदाई सुरु
# 3 जुलै 2017 – मेट्रो वनविहार तळजाई पर्वत, पाचगाव पर्वती येथे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते वृक्षारोपण मोहीम सुरु
# 10 ऑगस्ट 2017 – एफडी आणि पुणे मेट्रोच्या चमूची भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी स्थापना करण्यात आली.
# 19 ऑगस्ट 2017 – घोले रस्त्यावर महामेट्रोच्या कार्यालयाचे उदघाटन
# 28 सप्टेंबर 2017 – वनाज जवळ पौड मार्गापासून पुणे मेट्रोच्या कामाला सुरुवात
# 28 सप्टेंबर 2017 – वनाज ते दिवाणी न्यायालय या पुणे मेट्रोच्या दुस-या मार्गाच्या स्थापत्य कामाचा शुभारंभ
# 24 ऑक्टोबर 2017 – नाशिक फाट्याजवळील पुणे मेट्रोचा पहिला स्तंभ पूर्ण झाला.
# 27 ऑक्टोबर 2017 – शिवाजीनगर येथेही आंतरबदल स्थानक उभारण्यासाठी शासनाच्या अन्नधान्य गोदामाच्या जागेचा ताबा महा मेट्रोला मिळाला.
# 20 नोव्हेंबर 2017 – वल्लभनगर येथील सहयोग केंद्राचे उदघाटन
# 14 डिसेंबर 2017 – महा मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या पहिल्या पादचारी पुलाचे लोकार्पण
# 11 मार्च 2018 – वनाज ते रामवाडी या मार्गावरील पहिला स्तंभ पूर्ण झाला

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.