PCMC News: ‘जॅकवेल’च्या निविदा प्रक्रियेची चौकशी करा; भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भामा-आसखेड धरणाजवळ मौजे वाकी तर्फे वाडा येथे जलउपसा केंद्र बांधण्याबाबतच्या कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेतील झालेल्या भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करण्याची मागणी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली आहे. याबाबत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना पत्र पाठविले आहे.

भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यासाठी जॅकवेल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली होती. या जॅकवेलच्या निविदेत तब्बल 30 कोटी रूपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. त्यापार्श्वभूमीवर आमदार लक्ष्मण जगताप यांनी आयुक्तांना पत्र पाठवून निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमदार जगताप यांनी पत्रात म्हटले आहे की, महापालिकेच्या वतीने जल उपसा प्रकल्पाचे बांधकाम करण्याकामी दोन-तीन वेळा यापूर्वी निविदा सूचना जारी करण्यात आल्या होत्या. संदर्भीय निविदा सूचना कोणीही निविदा भरणार नाही याची महापालिका पाणीपुरवठा विभागाने काळजी घेतली होती. त्यानंतर कोणा एका कंत्राटदारासाठीच निविदा अटी व शर्ती शिथिल करण्यात येवून संदर्भीय नमूद सूचना जारी करण्यात आली.

Alandi News : आळंदीमध्ये ओळख श्री ज्ञानेश्वरीची संस्कारक्षम उपक्रम शुभारंभ सोहळा संपन्न

महापालिका पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ भ्रष्ट अधिका-यांच्या मनमानी व आडमुठ्या कामाच्या पद्धतीमुळे या विभागाच्या निविदा भरण्याच्या भानगडीत नवीन कंत्राटदार पडत नाहीत. यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होते आहे. या निविदेची प्रक्रिया ही अत्यंत अपारदर्शीपणे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करुन पूर्ण केली जात आहे. प्रथमदर्शनी निविदा उघडण्याआधीच कमीत कमी 20 ते 25 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे ही निविदा प्रक्रिया तत्काळ स्थगित करण्यात यावी. निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांमध्ये निकोप स्पर्धा झाल्यास महापालिकेचा नक्कीच आर्थिक फायदा होतो. प्रस्तावित कामे माफक दरात पूर्ण होतात.

या निविदा प्रक्रियेत पात्रता निकष हे निष्पक्षपणे लावण्यात आलेले नसून फक्त एकाच कंत्राटदारास या निविदेतील काम मिळावे म्हणून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी भ्रष्ट मार्ग निवडला आहे. त्यामुळे या प्रकरणातील भ्रष्टाचाराची तत्काळ चौकशी करुन दोषी अधिका-यांवर कारवाई करावी. या निविदा प्रक्रियेतील पात्रता निकषबाबत निविदा दाखल केलेल्या सर्व कंत्राटदारांच्या पात्रता पडताळून घेण्यात याव्यात. त्यानुसारच निविदा प्रक्रिया पार पाडण्यात यावी. जेणेकरुन महापालिकेचे संभाव्य मोठ्या प्रमाणातील आर्थिक नुकसान टाळता येणे शक्य होईल. याबाबत केलेल्या कार्यवाहीची प्रत अवगत करावी अशी सूचना आमदार जगताप यांनी केली आहे.

याबाबत पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे म्हणाले, ”आमदार लक्ष्मण जगताप यांचे पत्र प्राप्त झाले आहे. निविदा प्रक्रियेतील कागदपत्रांची तपसाणी करण्याचे त्यांनी सांगितले आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.