Pimpri: आवास योजनेत गोलमाल?; महापालिका आयुक्तांची खातेनिहाय चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत राबविल्या जाणा-या  पंतप्रधान आवास योजनेत 350 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत भ्रष्टाचारात सामील असलेल्या सल्लागार, ठेकेदार यांना पाठीशी घालणा-या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी अशी मागणी, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. 

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यात योगेश बाबर यांनी म्हटले आहे की, महापालिकेमार्फत आवास योजनेअंतर्गत शहराच्या विविध भागात 10 ठिकाणी 9 हजार 458  सदनिका बांधण्याचे नियोजन आहे. त्यानुसार च-होली येथे 1442, रावेतमध्ये 934, डुडुळगावमध्ये 896, दिघीत 840, मोशी – बो-हाडेवाडीमध्ये 1288, वडमुखवाडीत 1400, चिखलीमध्ये 1400, पिंपरीत 300, पिंपरीतच आणखी 200 आणि आकुर्डीमध्ये 500 सदनिका उभारण्याचे प्रस्तावित आहे.

या योजनेअंतर्गत बो-हाडेवाडी येथे 1 हजार 288 घरांच्या प्रकल्पासाठी 123. 78 कोटी रकमेची स्थायी समितीची मंजुरी आहे. हा दर बाजारभावानुसार अतिशय जास्त आहे. त्यामुळे या सर्वच प्रकल्पामध्ये सल्लागार, ठेकेदार, स्थायी समिती, अधिकारी, आयुक्त यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडपणे दिसत आहे.  बो-हाडेवाडी येथील गृहप्रकल्पात किमान 50 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता असून एकूण 9458 सदनिकांमध्ये 370 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे.

बो-हाडेवाडीतील प्रकल्पाच्या निविदांबाबत विरोधकांनी आवाज उठविल्यावर 1 हजार 288 सदनिकांच्या 123.78 कोटींच्या प्रस्तावावर पुनर्विचार केला. आयुक्तांनी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातर्फे राबवित असलेल्या प्रकल्पातील आर्थिक आणि तांत्रिक निकशांशी तुलना केली. त्यानंतर बो-हाडेवाडीतील प्रकल्पात काही तांत्रिक बदल करुन बांधकामाच्या दर्जामध्ये तडजोड करित 109 कोटींची फेरनिविदा स्थायी समोर मान्यतेसाठी ठेवली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात सामील असलेल्या सल्लागार, ठेकेदार यांना पाठीशी घालणा-या महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बाबर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.