INS Shivaji Lonavala : ‘आयएनएस शिवाजी’ लोणावळा येथे नौदल दिवस उत्साहात, उपस्थितांनी अनुभवला साहसी प्रात्यक्षिकांचा थरार!

एमपीसी न्यूज – साहसी प्रात्यक्षिकांचे प्रदर्शन तसेच अनेक उपक्रम राबवत लोणावळ्याच्या ‘आयएनएस शिवाजी’ येथे नौदल दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 1971 च्या युद्धात भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी कराची बंदरावर केलेल्या धाडसी हल्ल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 04 डिसेंबर हा दिवस नौदल दिन साजरा केला जातो.

नौदल दिनानिमित्त शनिवारी (दि.04) ‘INS शिवाजी’चे कमांडिंग ऑफिसर आणि स्टेशन कमांडर अरविंद रावल यांनी सर्वोच्च बलिदान देणार्‍या नौदल अधिकारी आणि खलाशांना युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी सैनिकाच्या बलिदान सन्मानार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात आले.

सायंकाळी आयएनएस शिवाजी बँडद्वारे मार्शल ट्यून वाजवण्यात आले, ज्यात ट्यूब बेल्सच्या झंकारांसह मंत्रमुग्ध करणारे वातावरण निर्माण करण्यात आले. ‘सूर्यास्त सोहळ्यात’ स्टेशनवरील 600 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. सी कॅडेट कॉर्प्सच्या आयएनएस शिवाजी बँडने ‘बीटिंग रिट्रीट’ समारंभाचा भाग म्हणून भारतीय नौदल आणि सामूहिक शक्तीचे प्रतीक असलेले विविध उपक्रम सादर  केले.

यावेळी नौदलाच्या जवानांनी धाडसी प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. त्यात शस्त्रास्त्रांच्या निपुण हाताळणीचे प्रदर्शन करणाऱ्या ‘कंटिन्युटी ड्रिल’ने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. 11 ते 14 वयोगटातील शाळकरी मुलांचा समावेश असलेल्या सी कॅडेट कॉर्प्सने ‘हॉर्नपाइप डान्स’ सादर केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.