Pimpri: पवना धरणाची तपासणी; धरण सुरक्षित

Inspection of Pavana Dam; Dam safe

धरणात 36.83 टक्के पाणीसाठा ; जुलैअखेरपर्यंत पुरणार पाणी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या पवना धरणाची पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने तपासणी केली आहे. तपासणीत धरणाला धोका असल्याचे निदर्शनास आले नाही. धरण सुरक्षित असल्याचे, पवना धरणाचे शाखा अभियंता ए. एम. गडवाल यांनी सांगितले.  तसेच धरणात आजमितीला 36.83 टक्के पाणीसाठा असून जुलैअखेर पर्यंत हा साठा पुरेल, असेही त्यांनी सांगितले.

पावसाळ्यात धरणाला काही धोका निर्माण होवू नये यासाठी पावसाळ्यापुर्वी धरणांची तपासणी केली जाते.  दरवर्षी नियमित 31 मे पूर्वी धरणांची तपासणी जलसंपदा विभागाकडून करण्यात येते. त्यानुसार पवना धरणाची तपासणी करण्यात आली आहे.

त्यामध्ये धोकादायक पद्धतीने गळती, धरणाला धोका असल्याचे निदर्शनास आले नाही. धरण सुरक्षित असल्याचे पवना धरणाचे शाखा अभियंता  गडवाल यांनी सांगितले.

पावसाळा जवळ आला आहे. काय उपाययोजना कराव्यात. त्याबाबत जलसंपदा विभागाने आम्हाला सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. मावळतील पवना धरणातून पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविली जाते. मावळ परिसरातील गावांसह शेतीसाठीही पाणी दिले जाते.

…अशी होतो धरणांची तपासणी

पावसाळ्यापुर्वी धरणांची तपासणी केली जाते. तपासणी करताना धरणातील गळती मोजणे, सांडवा, धरणाच्यावरील आणि खालील पिचिंग, दरवाजे कार्यरत आहेत का, देखभाल-दुरुस्ती, नोंदीनुसार कामे झाली आहेत का, वीजपुरवठा, जनरेटरची सुविधा अशा विविध घटकांची तपासणी होते. या तपासणीत पवना धरण सुरक्षित असल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.

धरणात 36.83 टक्के जुलैअखेर पुरेल एवढा पाणीसाठा

पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसह मावळमधील विविध गावांना पाणीपुरवठा केला जातो. मागीलवर्षी धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे धरण तीनवेळा 100 टक्के भरले होते. परिणामी, यंदा उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाई भासली नाही.

लॉकडाउनमुळे नागरिक दोन महिने घरी असूनही पाण्याच्या तक्रारी आल्या नाहीत. धरणात आजमितीला 36.83 टक्के पाणीसाठा आहे.  जुलैअखेर पर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे,  असेही गडवाल यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like