Maval : अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती केंद्र व वडगाव मावळ शाखा यांच्यातर्फे दुय्यम निबंधक कार्यालयाची पाहणी

एमपीसी न्यूज – जागृत नागरिक महासंघ संलग्न अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समिती केंद्र शाखा आणि वडगाव मावळ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि ३० मे) दुपारी साडेचार वाजता दुय्यम निबंधक कार्यालय वडगाव मावळ या कार्यालयाची पाहणी करण्यात आली. माहिती अधिकार कायदा २००५ कलम ४(१) ख उपकलम (३)व(४) अंतर्गत ही पाहणी करण्यात आली.

शासकीय कार्यालयाच्या कामकाजामध्ये सुसूत्रता व गतिमानता यावी,  स्वच्छ,  भ्रष्टाचार मुक्त व भयमुक्त शासन कारभाराचा सर्वसामान्यांना अनुभव मिळावा, नागरिकांची शासन दरबारातील कामे ठराविक मुदतीत व ठराविक फी भरून व्हायला हवीत यासाठी संस्थेतर्फे महाराष्ट्रभर कार्यालय पाहणी करण्यात येत असते.

संस्थेतर्फे कार्यालय पाहणीसाठी केलेल्या विनंतीपत्रावर कार्यालयाने लेखी परवानगी दिल्यानंतर ही पाहणी करण्यात आली. माहिती अधिकार कायदा कलम ४ नुसार स्वयंप्रेरणेने करावयाच्या प्रगटनबाबत कार्यालयाने जी अंमलबजावणी केली आहे. त्याची समितीने पाहणी केली.

पाहणी दरम्यान दुय्यम निबंधक बडगुजर स्वतः उपस्थित नव्हते. तथापी कार्यालयाचे कनिष्ठ लिपिक यांनी पाहणीसाठी संपूर्ण सहकार्य केले. कार्यालय पाहणी अहवाल लवकरच राज्य माहिती आयुक्त, राज्य माहिती आयोग महानिबंधक महाराषट्र राज्य आणि मंत्रालय मुंबई यांना पाठविण्यात येईल. कार्यालय पाहणी दरम्यान आढळलेल्या त्रुटी लवकर दुरुस्त करण्यासाठी कार्यालयाला विनंती केली आहे. बडगुजर यांनी 15 दिवसात सर्व त्रुटी दुरुस्त केल्या जातील असे भ्रमण ध्वणीवरून सांगितले आहे.

या कार्यालय पाहणीमध्ये केंद्र शाखेतर्फे संस्थापक अध्यक्ष नितीन यादव, उपाध्यक्ष राजेश विश्वकर्मा,  पिंपरी-चिंचवड शहर प्रमुख अशोक कोकणे तसेच केंद्र शाखा सहसचिव उमेश सणस व मावळ शाखा अध्यक्ष दत्तात्रय काजळे सदस्य बंडोपंत सातकर, गणेश वाघवले,  मच्छिन्द्र गुजर,  अनिल वरघडे, बाळासाहेब दळवी व इतर यांनी सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.