Insta Live Sessions: लॉकडाउनमधील स्पृहा जोशीच्या या ‘खजिन्या’वर रसिक झाले फिदा

Insta Live Sessions: Art Lovers Happy with Spruha Joshi's 'Khajina' in Lockdown

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात एकमेकांशी जोडून राहणे खूप आवश्यक बनले होते. त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने शक्कल लढवत होता. अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशीने  ‘खजिना’ ही सेलिब्रिटी गप्पा आणि कवितांच्या इन्स्टा लाइव्ह सेशनची एक श्रवणीय मालिका केली. 15 भागांच्या या इन्स्टा लाइव्ह सेशन्सना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.

लॉकडाउन सुरु झाल्यावर ‘हॅशटॅग ग्रॅटिट्यूड डायरी’ नावाने सोशल मीडियावर स्पृहा जोशी आपल्या जवळच्या व्यक्तींविषयीचे फोटो आणि पोस्ट टाकत होती. २१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउननंतर ही ग्रॅटिट्यूड डायरी संपली आणि ‘खजिना’ सीरिज सुरु झाली. या इन्स्टा सीरिजद्वारे स्वानंद किरकिरे, सुबोध भावे, अवधूत गुप्ते, अनिता दाते, जितेंद्र जोशी, प्रसाद ओक, पुष्कर श्रोत्री, महेश काळे, वैभव जोशी, संदीप खरे, अमेय वाघ, संकर्षण कऱ्हाडे, शाल्मली खोलगडे, सिध्दार्थ मिश्रा अशा १४ सेलिब्रिटींच्यासोबत स्पृहा जोशीच्या अमीट कविता, साहित्यावरची लाइव्ह सेशन्सची मेजवानी रसिकांना पाहायला मिळाली.

खजिना या उपक्रमाविषयी बोलताना स्पृहा म्हणाली, ‘वाचनाचा छंद असल्याने लॉकडाउन सुरु झाल्यावर मी वाचन सुरु केलं. मग त्यावेळी उत्सुकता चाळवली की, आपले सेलिब्रिटी मित्र या लॉकडाउनच्या काळात सध्या काय वाचन करत असतील, त्यांची आवडती कविता, पुस्तकं कोणती? हे जाणून घेण्यासाठी खजिनाची संकल्पना सुचली.

या गप्पा निश्चितच प्रेक्षकांनाही मनोरंजक आणि माहितीपर ठरतील. लाइव सेशन्स केली तर प्रेक्षकांचाही त्यात सहभाग असेल, असं वाटल्याने खजिनाची इन्स्टा लाइव्ह सेशन्स सुरु केली. ही सेशन्स सुरु झाल्यावर लक्षात आलं की, या प्रत्येक कलाकाराकडे आपल्या सिनेसृष्टीतल्या कामाचा, अनुभवाचा आणि वाचनाचा एवढा खजिना आहे, की त्यामुळे या सीरिजचे नावही कुठेतरी सार्थक झाल्याचे समाधान वाटले.’

बा.भ. बोरकरांपासून ते शांता शेळके आणि कवी ग्रेस ह्यांपर्यंत अनेक कवींच्या कवितांची फर्माइश रसिकांनी केली. 15 भागांनंतर ही रंगलेली सीरिज संपल्याने अनेक रसिकांचा हिरमोड झाला. याविषयी विचारल्यावर स्पृहा सांगते, ‘प्रत्येक सेशननंतर रसिकांचा मिळणारा प्रतिसाद हे दरवेळी माझा उत्साह वाढवणारे होते. म्हणूनच तर 14 भाग सेलिब्रिटींसोबत केल्यावर रसिकांसोबत केलेला शेवटचा भागही उत्तम रंगला.

अनेकांनी खजिना संपल्यावर नाराजी व्यक्त केली. पण मला असं वाटतं की, प्रत्येक गोष्टीची थोडक्यात गोडी असते. कधी संपवणार या प्रश्नापेक्षा का संपवलं हा प्रश्न सुखद असतो. सध्या पुरतं हा स्वल्पविराम आहे, असं म्हणूया. आता नवीन संकल्पनेसह प्रेक्षकांच्या भेटीला यायचा विचार आहे.’

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.