Chinchwad News : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 124 पोलीस कर्मचाऱ्यांच्या झटपट बदल्या

एमपीसी न्यूज – पोलिसांच्या बदली प्रक्रियेत अनेकदा भ्रष्टाचार होण्याचे आरोप केले जातात. त्यामुळे बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी नवा फंडा वापरला आहे. थेट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोलिसांशी संवाद साधत पसंतीक्रम जाणून घेत 124 पोलीस कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. ही बदली प्रक्रिया बुधवारी (दि. 28) राबविण्यात आली. संबंधित पोलीस ठाण्यातील कार्यकाळ पूर्ण झालेल्या 11 सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या देखील अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

अंतर्गत बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त डॉ. सुधीर हिरेमठ यांच्या सोबत मिळून थेट पोलीस कर्मचाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. पोलीस कर्मचार्‍यांच्या अडचणी आणि बदलीसाठी पसंतीक्रम आयुक्तांनी जाणून घेतला.

या बदली प्रक्रियेला बुधवारी दुपारी सुरुवात झाली. दुपारच्या वेळी पोलीस आयुक्तांनी संबंधित प्रभारी अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सची लिंक पाठवली. त्यानंतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पसंतीच्या पोलीस ठाण्याचे नाव सुचवल्या नंतर उपलब्धता तपासून तात्काळ बदलीचे आदेश देण्यात आले. गुरुवारी (दि. 29) आणखी 239 जणांचा पसंतीक्रम जाणून घेऊन बदल्या करण्यात येणार आहेत.

एरवी इच्छित स्थळी बदली करून घेण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना अनेकांची मनधरणी करावी लागते. मात्र यावेळी तात्काळ निर्णय झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यापूर्वी शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी देखील बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी दरबार बोलावून बदली प्रक्रिया राबवली होती.

अकरा सहाय्यक निरीक्षक उपनिरीक्षक यांच्या अंतर्गत बदल्या

पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसह ज्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांचा संबंधित पोलीस ठाण्याचा कार्यकाल पूर्ण झाला आहे, अशा अकरा अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कुमार खटाळ (दिघी ते हिंजवडी), उद्धव खाडे (हिंजवडी ते शिरगाव), शाहिद पठाण (देहूरोड ते वाहतूक विभाग), पोलीस उपनिरीक्षक विद्या माने (दिघी ते आळंदी), विशाल दांडगे (चाकण ते भोसरी), दत्तात्रय मोरे (देहूरोड ते पिंपरी), अमरदीप पुजारी (एमआयडीसी भोसरी ते चिखली), बापू जोंधळे (आळंदी ते दिघी), विनोद शेंडकर (सांगवी ते चाकण), सचिन देशमुख (चिखली ते एमआयडीसी भोसरी), नंदराज गभाले (हिंजवडी ते दिघी)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.