Pimpri: करदात्यांच्या पैशातून नगरसेवकांचा विमा कशासाठी? – सचिन साठे

आयुक्तांना पदाधिका-यांचे लांगूलचालन करण्यातच धन्यता वाटतेय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा केलेला ठराव करदात्यांवर अन्यायकारक आहे. अशा पध्दतीने विमा काढणे म्हणजे करदात्या जनतेच्या पैशावर डल्ला मारण्याचा उद्योग आहे. जनतेच्या पैशावर नगरसेवकांचा विमा कशासाठी? या विमा उद्योगामुळे नेमके कोणाचे ‘आरोग्य’   सुधारणार आहे,  असा सवाल  काँग्रेसचे शहाराध्यक्ष सचिन साठे उपस्थित केला आहे. तसेच हा ठराव महासभेने रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आयुक्तांना पदाधिका-यांचे लांगूलचालन करण्यातच धन्यता वाटतेय असा आरोपही त्यांनी केला.

साठे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक व त्यांच्या कुटूंबियांसाठी करदात्या नागरिकांच्या पैशातून आरोग्य विमा काढण्याचा ठराव स्थायी समितीने मंजूर केला आहे. हा ठराव सर्व साधारण सभेने रद्द करावा. प्रत्यक्षात नागरिकांचे सर्वांगिण आरोग्य सुदृढ ठेवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. नगरसेवकांच्या आरोग्याची एवढी काळजी प्रशासनाला असेल. तर, त्यांनी शहरातील सर्वच करदात्या नागरिकांचा आरोग्य विमा काढावा.

नगरसेवक हे सेवेचे पद आहे. परंतू चहूबाजूंनी भ्रष्टाचारात गुरफटलेल्या प्रशासनाला व सत्ताधा-यांच्या हातचे बाहूले बनलेल्या आयुक्तांना पदाधिका-यांचे लांगूलचालन करण्यातच धन्यता वाटते. सर्व साधारण सभेने हा ठराव रद्द करावा. अन्यथा  काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही साठे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.