Interaction With Girija Prbhu: गौरी आणि जयदीप घेऊन येत आहेत सुखाची वेगळी परिभाषा

Interaction With Girija Prbhu लहान वयापासून मनोरंजन क्षेत्रात असलेली गिरीजा मूळची पिंपरी-चिंचवडकर आहे.

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – ‘तेव्हा खरंतर माझी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही मालिका सुरु होती. त्यामुळे ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’साठी मी ऑडिशन द्यावी का नाही या विचारात होते. पण ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये मी सेमी फायनलपर्यंत गेले आणि नंतर माझा तिथला प्रवास संपला. तेव्हा त्याची थोडी खंत वाटली. पण त्यामुळे मी या मालिकेची ऑडिशन देऊन सिलेक्ट झाले. हीच माझ्यासाठी मोठी अ‍ॅचिव्हमेंट ठरली. कारण यात मला नायिकेची मुख्य भूमिका साकारता येणार आहे. एक प्रवास संपला पण दुसरा सुरु झाला’, असं अभिमानाने युवा अभिनेत्री गिरीजा प्रभू सांगत होती.

सोमवारपासून स्टार प्रवाहवर कोठारे व्हीजनची ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही नवीन मालिका येत आहे. गिरीजा त्यात गौरीची मुख्य भूमिका साकारते आहे. लहान वयापासून मनोरंजन क्षेत्रात असलेली गिरीजा मूळची पिंपरी-चिंचवडकर आहे.

या मालिकेच्या निमित्ताने तिच्याशी बातचीत करण्याची संधी मिळाली. सध्या या मालिकेचे मुंबईत फिल्मसिटी येथे शूटिंग सुरु आहे. सरकारने घालून दिलेली सर्व बंधने पाळत या मालिकेचे 1 ऑगस्टपासून शूटिंग सुरु झाले आहे.

या गौरीचा प्रवास कसा सुरु झाला ते उलगडत असताना गिरीजा सांगत होती की ‘पुण्यातून मी 1 मार्चला शूटिंग करुन पाठवले. ते सिलेक्ट झाल्यावर ८ व ९ मार्चला मुंबईत ऑडिशन झाली. ती ऑडिशन संपवून मी परत येत असतानाच १२ मार्चला यातील मुख्य भूमिकेसाठी मी सिलेक्ट झाल्याचा मला प्रॉडक्शन हाऊसकडून फोन आला. त्यानंतर १५ मार्चला प्रोमो शूट झाला. पण नंतर लॉकडाऊनच सुरु झाला. त्यामुळे सगळंच ठप्प झाले. आता परत 1 ऑगस्टपासून शूटिंग सुरु झाले आहे’.

_MPC_DIR_MPU_II

याआधी गिरीजाने महेश कोठारे यांच्या कोठारे व्हीजनच्या काही मालिकांमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिला येथे फारशी अडचण जाणवली नाही. या मालिकेत गिरीजाच्या सोबतीला मंदार जाधव जयदीप या मुख्य भूमिकेत आहे.

तसेच ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर ब-याच दिवसांनी मालिका विश्वात पदार्पण करत आहेत. या सर्वांशी असलेल्या रॅपोबद्दल बोलताना गिरीजा म्हणाली, ‘गंमतीची गोष्ट म्हणजे वर्षाताईंबरोबर काम करण्याचे पहिल्यांदा दडपण आले. पण नंतर ते जाणवलेच नाही. याचे कारण ऐकून तुम्हाला गंमतच वाटेल.

त्या गोव्याच्या आणि मी पण मूळची गोव्याची, त्यामुळे आम्हा दोघींचे मस्त जमले. या मालिकेत कोल्हापुरी ढंगाची भाषा आहे. पण त्यासाठी मला फार मेहनत घ्यावी लागली नाही. कारण याआधी माझ्या या भाषेतील दोन तीन फिल्म येऊन गेल्या आहेत. त्यामुळे या भाषिक लहेजाची मला ओळख होती’.

‘दगडी चाळ’ या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या मालिकेचे दिग्दर्शन करत आहेत. तर संहिता ‘माझ्या नव-याची बायको’ फेम अभिजीत गुरु यांची आहे.

सुखाची नवीन परिभाषा सांगण्यासाठी जयदीप आणि गौरी सज्ज आहेत. आता प्रेक्षकांनी त्यांना प्रेम देण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like