BNR-HDR-TOP-Mobile

Pimple Gurav : ‘अतिक्रमण कारवाईत सत्ताधारी नगरसेवकांचा हस्तक्षेप; अधिका-यांकडून दुजाभाव’ 

मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांचा आरोप 

0 916
PST-BNR-FTR-ALL

कारवाई टाळण्यासाठी अधिका-यांवर दबाव आणणा-या ‘त्या’ नगरसेवकांचे पद रद्द करा 

एमपीसी न्यूज – पिंपळेगुरव येथे अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी आलेल्या पथकाला सत्ताधारी नगरसेवकांकडून फोन करून कारवाई न करण्याबाबत धमकाविण्यात आले. त्यामुळे या पथकाला कारवाई न करताच परतावे लागल्याचा आरोप मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत केला. तसेच ही नामुष्कीजनक गोष्ट असून महापालिका आयुक्तांनी ‘त्या’ नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द करावे. कारवाईत दुजाभाव करीत असलेल्या अतिक्रमण विरोधी पथकातील अधिका-यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.  

अतिक्रमण कारवाईत हस्तक्षेप केल्यास नगरसेवक पद रद्द होऊ शकते. कायद्यात याबाबतची तरतूद असून सेक्शन 44 अंतर्गत आयुक्तांना कारवाईचे अधिकार देण्यात आल्याचे सांगत अरुण पवार म्हणाले, महापालिका प्रशासन सत्ताधा-यांच्या तालावर नाचताना दिसत आहे. हे चुकीचे आहे. अधिकारी अतिक्रमण हटविण्याची कामे तटस्थपणे करीत नसल्याबाबत हेच नगरसेवक महापालिका सभागृहात आरडाओरडा करीत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमण विरोधी कारवाई करताना अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी दुजाभाव करताना दिसतात. दोन महिन्यांपूर्वीही पिंपळेगुरव येथील ठराविक पत्राशेडवर कारवाई करण्यात आली.

पिंपळे गुरवमध्ये आज नदीपात्रालगत शंभरहून अधिक अनधिकृत पत्राशेड आहेत. मात्र, केवळ सत्ताधारी नगरसेवकांच्या दबावामुळे अधिकारी कारवाईस टाळाटाळ करतात. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिका-यांवर कारवाई करावी. तसेच अतिक्रमण विरोधी पथकावर फोन करून दबाव आणलेल्या संबंधित नगरसेवकांवर कारवाई करून त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे, अशी मागणी पवार यांनी केली.

संपूर्ण शहरातच अतिक्रमनांचे पेव फुटले आहे. अतिक्रमणविरोधी पथकातील अधिकारी याकडे गंभीरपणे पाहत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. राजकारणी लोक सांगतील त्या अतिक्रमनांवर कारवाई करताना दिसतात. हेच राजकारणी लोक सभागृहात मात्र या अधिका-यांवर कारवाईसाठी तावातावाने बोलतात. सभागृहाबाहेर मात्र याच्या उलट वागतात.

पिंपळेगुरवमधील ठराविक पत्राशेडवर कारवाई करा, या मागणीसाठी दोन महिन्यांपूर्वी काही नगरसेवक आयुक्तांसमोर ठाण मांडून बसले होते. त्यानुसार अतिक्रमणविरोधी पथकाने शंभर पत्राशेडपैकी केवळ चार पत्राशेडवर कारवाई केली. मंगळवारी अतिक्रमणविरोधी पथक सर्व लवाजम्यासह कारवाईसाठी पिंपळेगुरवमध्ये आले होते. मात्र, विद्यमान नगरसेवकांनी अधिका-यांना फोन करून कारवाई टाळण्यासाठी धमकावले. त्यामुळे हे पथक कारवाईविनाच परतले. ही नामुष्कीजनक गोष्ट आहे, असेही पवार म्हणाले.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3