Chinchwad News : एकाच ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले

शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे एकाच पोलीस ठाण्यात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या प्रस्थापित पोलिसांच्या गडाचे बुरुज ढासळले आहेत. आयुक्तांनी पदभार स्वीकारताच पहिल्याच महिन्यात बदल्या केल्याने शहर पोलिसांत खळबळ उडाली आहे. 

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची 2 सप्टेंबर रोजी पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांनी 5 सप्टेंबर रोजी आयुक्त पदाची सूत्रे तत्कालीन पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून घेतला. आयुक्त पदाची सूत्रे घेतल्यानंतर एका महिन्याच्या आतच आयुक्तांनी शहर पोलीस दलातील 399 पोलिसांच्या बदल्या केल्या.

सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले आहेत. सहाय्यक फौजदार (13), पोलीस हवालदार (122), पोलीस नाईक (157), पोलीस शिपाई (107) अशा एकूण 399 पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

यातील काही पोलीस एकाच पोलीस ठाण्यात मागील काही वर्षांपासून ठाण मांडून बसले होते. त्या प्रस्थापितांच्या गडाला या बदल्यांमुळे चांगलाच धक्का बसला आहे. पोलीस स्टेशन, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि मुख्यालयातील पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.