Pimple Saudagar : स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपळेसौदागर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार संकुल

एमपीसी न्यूज – स्मार्ट सिटी अंतर्गत नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून पिंपळेसौदागर, कोकणे चौक येथील नियोजित रिंगरोड अंतर्गत दिल्ली येथील भूमिगत पालिका बाजार व्यापार संकुलाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार संकुल उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये 270 चौरस फुटाची 55 दुकाने उभारण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे ब्रॅण्ड असलेल्या वस्तू, कंपन्या विक्रेत्यांचा त्यामध्ये समावेश असणार आहे. संकुलाच्या निम्म्या भागातील छत असणार असून त्यावरुन वाहतूक केली जाणार आहे. रस्त्याच्या खाली शॉपिंग गाळे असणार आहेत. यासाठी 45 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. याबाबतचा प्रस्ताव स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळापुढे ठेवला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी या योजनेत पिंपरी-चिंचवड शहराचा तिस-या टप्प्यात समावेश झाला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत पहिल्या टप्यात, पिंपळेसौदार, पिंपळेगुरव परिसराचा विकास केला जात आहेत. त्यामध्ये सायकल शेअरिंग योजना सुरु केली आहे. आता कोकणे चौकात भूमिगत व्यापार संकुलाचे फेरीवाला झोन प्रमाणे नियोजन केले आहे. त्यामध्ये 55 दुकाने असणार आहेत. दुकानाचे क्षेत्रफळ 270 चौरस फूट असणार आहे. त्यामध्ये फुले, फळे, आईस्क्रिम, महिला प्रसाधने, केकशॉप, इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट शॉप्स, बॅंक्वेटस्‌ या दुकानांचा समावेश असणार आहे.

व्यापारी संकुलाच्या निम्म्या भागावर स्लॅबचे छत असणार आहे. त्यावरुन रिंगरोडमधील सेवा रस्त्यावरील वाहनांची वाहतूक होणार आहे. रस्त्याच्या खाली शॉपिंग गाळे असणार असून शॉपिंग व हॉकर्स झोनचा भाग मध्यभागी मोकळा असेल. त्याचबरोबरच मध्यभागी वर्ल्डक्‍लास लॅण्डस्केपिंग व स्ट्रीट फर्निचरचादेखील समावेश केला जाणार आहे. या व्यापारी संकुलामध्ये उतरण्यासाठी अत्याधुनिक सरकत्या जिन्याचे नियोजन केले जाणार आहे.

अत्याधुनिक छोटेखानी उद्यान व त्यामधील धबधबा या व्यापारी संकुलाच्या सौंदर्यात आणखी भर घालणार आहे. हे व्यापारी संकुल शहरातील एक नाविन्यपूर्ण आकर्षण असणार आहे. संकुलाच्या एका बाजूला कोप-यातील जागेमध्ये सर्वोत्तम गॅझेट शॉप्स असणार आहे. अशा पद्धतीने ख-या अर्थाने पाश्‍चिमात्य देशाप्रमाणे शहरातील नागरिकांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापारी संकुल उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असणार आहे.

प्रकल्पासाठी अंदाजे 45 कोटी खर्च अपेक्षित आहे. तसेच हा प्रकल्प मान्यतेसाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी संचालक मंडळापुढे ठेवला जाणार आहे. त्यामध्ये संचालकांच्या सूचनांचा अंतर्भाव करुनच अपेक्षित बदल स्वीकारुन अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे. निविदा प्रक्रिया करुन या प्रकल्पाचे काम सुरू केले जाणार आहे, अशी माहिती बीआरटीचे प्रवक्ते विजय भोजने यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.