Kolhapur : कोल्हापुरात इंटरनेट सेवा ठप्प ; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

आक्षेपार्ह पोस्टमुळे कोल्हापूरात तणावपूर्ण वातावरण

एमपीसी न्यूज : कोल्हापुरातील तणावाची परिस्थिती लक्षात घेता पुढचे 31 तास इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गृह विभागाच्या सचिवांनी इंटरनेट बंद करायला परवानगी दिली आहे, यामुळे 8 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

Dehu : श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर आनंदवारीत आनंदडोह नाट्यप्रयोगाचे पालखी मार्गावर विविध ठिकाणी होणार सादरीकरण

कोल्हापुरमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीवर गृहखात्याने पोलिसांना आदेश दिले असून चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे. तसंच कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी असंही आवाहन करण्यात आलं आहे.

जनतेने शांतता पाळावी असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. कोल्हापुरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमारही केला. तसंच जिल्ह्यात 19 जूनपर्यंत बंदी आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार पाच किंवा त्याहून जास्त लोकांना एकत्र जमा होण्यास बंदी असणार आहे. शरद पवार यांनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली. छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर असताना पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोल्हापूर येथील आंदोलनाची बातमी टिव्हीवर पाहिली. कोणीतरी मोबाईलवर मेसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहित करणे योग्य नाही.
राज्यात शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण जर राज्य सरकारच या प्रकरणात लोकांना उचकवू लागले आणि दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करू लागले तर हे काही चांगले लक्षण नाही. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनेतील व्यक्ती मोर्चा काढत रस्त्यावर उतरले आहेत. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्याने आंदोलन चिघळलं आहे. अशात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

राष्ट्रपुरुषांचा अवमान करणारे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूर शहरात तणाव निर्माण झालाय. दरम्यान, कारवाईचे ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त जमाव रस्त्यावर उतरलाय. रस्त्यावर उतरत जमावाने दगडफेक देखील केली आहे. त्यामुळे आंदोलन मोठ्या प्रमाणावर चिघळलं आहे. परिस्थीती नियंत्रणाबाहेर जात असल्याने जमाव पांगवण्यासाठी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर छ. संभाजीनगरमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायचे काय कारण आहे, असा सवाल शरद पवार यांनी विचारला आहे.

 

कोल्हापुरातील वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केलं आहे. “गोष्टी आम्हाला समजताहेत. जे चुकीचे आहे ते खपवून घेतले जाणार नाही. अचानकपणे औरंगजेब, टिपू सुलतान यांचे राज्यातील विविध जिल्ह्यात उदात्तीकरण होणे हा काही याेगायाेग नाही. हे आम्हाला स्पष्ट दिसत आहे. विराेधी पक्षाकडून वारंवार दंगली घडविण्याचा प्रयत्न होतोय. तसेच औरंगजेबचे उदात्तीकरण कसे होत आहे याचा तपास सुरु असल्याचं, फडणवीसांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियातील आक्षेपार्ह स्टेटस आणि मेसेज प्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील सर्व बाजारपेठांमधील दुकाने बंद आहेत. सकाळी दहापासून हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी चौकात गर्दी केली होती. आक्षेपार्ह स्टेटस ठेवून राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे मेसेज व्हायरल करणा-यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.

सध्या कोल्हापूर शहरातील परिस्थिती नियंत्रणात येत आहे, अशी माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी (7 जून) दिली. सद्यस्थितीत कोल्हापुरात तणावपूर्ण शांतता आहे.

सध्या कोल्हापुरातील स्थिती सामान्य आहे. सध्या इथं 2 एसआरपीएफच्या तुकड्यांसह मोठा फौजफाटा शहर आणि जिल्ह्यात तैनात करण्यात आला आहे.

या प्रकरणी तीन पोलीस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात 36 जणांना तब्यात घेण्यात आलं आहे. त्यातील 3 तरूण अल्पवयीन आहेत,” असं कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितलं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.