Interview with Additional Commissioner Ulhas Jagtap: ‘नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध’

0

एमपीसी न्यूज – (गणेश यादव) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्थानिक अधिका-यांसाठी असलेल्या तिस-या अतिरिक्त आयुक्तपदी उल्हास जगताप यांची नियुक्ती झाली आहे. त्यानिमित्त ‘एमपीसी न्यूज’ने त्यांच्याशी संवाद साधला.  

प्रश्न:- फायरमन ते अतिरिक्त आयुक्त पदापर्यंतच्या प्रवासाबाबत काय सांगाल?

उत्तर – स्पर्धेने माझी सुरुवात झाली. फायरमन म्हणून जॉईन होताना मी बारावीला असेल. राजकीय ओळखीतूनच नोकरी लागते असा माझा समज होता. त्यामुळे विविध जागांसाठीची जाहिरात असताना मी फायरमनसाठी अर्ज केला. दोन वर्षांनी परीक्षेसाठी मला फोन आला. लेखी परीक्षा, रनिंग, स्विमींगची परीक्षा दिली. बी.कॉमच्या शेवटच्या वर्षात असताना 1988 मध्ये मला जॉईनिंग पत्र मिळाले.

रात्र पाळीत काम करत असताना दिवसभर कॉलेजला जात  एलएलबी, एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेतले. त्यानंतर 1998 मध्ये सहाय्यक समाजविकास, 2003 मध्ये समाजविकास अधिकारी  म्हणून काम करण्याची संधी मिळाली. समाजविकास अधिकारी म्हणून काम करताना विविध चांगले, वाईट अनुभव आले. त्यातून खूप काही शिकण्यास मिळाले. त्याचा आता उपयोग होईल. 2013 मध्ये नगरसचिव झालो. या पदापर्यंत पोहचण्याकरिता तत्कालीन आयुक्त जयराज फाटक, प्रवीणसिंह परदेशी, अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे, फायर ब्रिगेडमधील, नागरवस्ती, नगरसचिव विभागातील सहकारी, अधिकारी कर्मचा-यांनी मोठे सहकार्य केले. आई, पत्नी यांना मी माझ्या यशाचे श्रेय देतो.

प्रश्न:- अतिरिक्त आयुक्त म्हणून शहर विकासाबाबत तुमचे ‘व्हिजन’ काय असेल?

उत्तर – पिंपरी-चिंचवड गावांचा परिसर होता. गावे एकत्र येवू शहर विकसित झाले. स्मार्ट सिटीत चांगल्या रितीने शहर विकास होईल. प्रकल्प, नवीन सुविधा निर्माण होत आहेत. तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. समाजसेवा हा माझा पिंड आहे. शहर विकास होत आहे. वायफायची सुविधा येईल. परंतु, शहरातील शेवटच्या घटकातील माणसाची सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. महापालिका झोपडीतील माणसाला फ्लॅटमध्ये नेते. पण, आज त्याच्या अडचणी वेगळ्या आहेत. वीज बील, लिफ्टचे पैसे देताना अडचणी येतात.

त्यासाठी तो माणूस आर्थिक सक्षम कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील राहिल. रोजगार मिळाल्याने झोपडपट्टीतील नवीन पिढी सुधारेल. झोपडपट्टीतील, गोरगरिब नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यावर माझा भर राहिल. नागरिकांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत. याची मला जाणीव असून त्या पूर्ण करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध राहील.

प्रश्न:- तुमच्याकडे जे विभाग दिले आहेत.  त्यातील कोणत्या विभागात काम करण्यास जास्त वाव वाटतो?

उत्तर – माझ्याकडे नऊ विभाग दिले आहे. सर्व विभागांचा आढावा घेणार आहे. क्षेत्रीय कार्यालयांना बांधकाम परवानगी, नागरवस्तींचे अर्ज तपासणी अशी वेगवेगळी कामे दिली आहेत. त्याची माहिती घेवून माहिती तंत्रज्ञानाचा काही उपयोग करता येईल का, त्यासाठी प्रयत्न करणार आहे. कोरोनामुळे महापालिकेच्या काही कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. कामगार कल्याण विभागाकडे पाच हजार रुपयांची मयत फंडाची रक्कम असते. याची अनेकांना माहिती नाही. त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी ‘स्वतंत्र सेल’ निर्माण करण्याचा माझा विचार आहे. कर्मचा-यांच्या कुटुबियांना काही मदत लागली. तर, या सेलमधून त्यांना माहिती मिळेल, अडचणी सुटतील. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचा-यांच्या नातेवाईकाला मयत फंडाची रक्कम मिळवून देण्यात येईल. कामगार कल्याण विभागाकडील कर्मचा-यांची देणी देण्यासाठी प्राधान्यक्रम असेल.

_MPC_DIR_MPU_II

प्रश्न:- तिसरे स्थानिक अतिरिक्त आयुक्त आहात. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – महापालिकेचे स्थानिक अधिकारी म्हणून दिलीप गावडे, प्रवीण तुपे दोघांनी अतिरिक्त आयुक्त म्हणून काम केले. मी चिंचवडगावचा रहिवाशी आहे. महापालिकेच्या हुतात्मा शाळेतील विद्यार्थी आहे. महापालिकेचा अधिकारी म्हणून सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत. अतिरिक्त आयुक्त पदावर गेलो असलो. तरी माझ्या वागण्यात बदल होणार नाही. सर्व कर्मचा-यांना मदत करणार आहे. नागरिक, महापालिका आणि कर्मचा-यांचे हित जपण्यासाठी मी बांधील राहिल.

प्रश्न:- स्थानिक म्हणून राजकीय दबाव असेल का?

उत्तर – मला न्याय मिळाल्याने माझी जबाबदारी पण तेवढीच वाढली आहे. जसा मला न्याय मिळाला. तसा इतरांना न्याय देण्याची माझी जबाबदारी आहे. दबाव शब्दाचा अर्थ कसा घेता यावर अवलंबून आहे. एखाद्याचे काम झाले नाही. तर, त्याचा आवाज वाढतो. आवाज वाढला म्हणजे दबाव का, हा प्रश्न आहे.  परंतु, समोरचा माणूस ज्यावेळी जोरात बोलतो. त्यावेळी आपले काही चुकते का हे तपासण्याची आवश्यकता असते. जर चुकत असेल आणि दुरुस्ती केली. तर, समोरचा माणूस खूश होऊन जातो. त्यामुळे दबाव म्हणता येणार नाही. स्थानिक असल्याने सर्वांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढतील. आपला माणूस आहे अशी नगरसेवकांमध्ये भावना आहे. नगरसेवक जनतेचे काम करत असतात. काम समजून घेतल्यास दबाव राहत नाही.  नियमांच्या चौकटीत राहून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची माझी नक्कीच धारणा राहिल.

प्रश्न:- स्थानिक अधिकारी-कर्मचा-यांच्या तुमच्या कडून खुप अपेक्षा आहेत. त्या कशा पूर्ण करणार?

उत्तर – स्थानिक अधिकारी, कर्मचा-यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल. कर्मचा-यांसाठी नेहमी उपलब्ध असेल. कर्मचा-यांच्या पदोन्नतीसाठी प्रयत्न करणार आहे. सेवा नियमात काही पदांच्या बाबतीत 50 टक्के पदोन्नती आणि 50 टक्के सरळसेवेने भरण्यात येणार आहेत. त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता असून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. निश्चितच कर्मचा-यांच्या माझ्याकडून अपेक्षा असणार आहेत. त्यांना मी 100 टक्के मदत करणार आहे.

 प्रश्न:- आपला संघर्षमय प्रवास आहे. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – महापालिका शाळेत शिकलो. शाळेत दहावीपर्यंत माझा पहिला क्रमांक येत होता. ग्रॅज्यूशन होईपर्यंत मातीचे घर होते. बी.कॉम होईपर्यंत घरात लाईट नव्हती. मित्राच्या दारासमोर रात्रीचा अभ्यास केला. सर्व मित्रांची, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांची मोलाची मदत झाली. या सर्वांचा मी ऋणी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.