Interview with Adv. Sunil Kadam : तुम्ही जिथे असाल तिथे वृक्षारोपण करा – अ‍ॅड. सुनील कदम

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – आपल्याला आपल्या भावी पिढीला चांगले, स्वच्छ पर्यावरण द्यायचे आहे. आताच्या पर्यावरणीय समस्यांमधून पृथ्वीला सोडविण्यासाठी वृक्षांचे आच्छादन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येकाने जिथे असेल तिथे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करायला हवे. असे मत अविरत श्रमदान संस्थेचे क्रियाशील सभासद अ‍ॅड. सुनील कदम यांनी व्यक्त केले. कदम यांच्या मुलाखतीतून अविरत श्रमदान संस्थेच्या कार्याविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रश्न : सध्याच्या पर्यावरणीय समस्यांबद्दल काय सांगाल ?
उत्तर : मानव हा पर्यावरणातील महत्त्वाचा व सर्वात बुद्धिमान घटक आहे. मानवाच्या प्रगती व वर्चस्वासाठी काम करताना त्याच्या हातून अनेक चुका होत आहेत त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असून त्याचे परिणाम निसर्गातील अनेक घटकांबरोबर मानवालाही भोगावे लागत आहेत.

मानवी समस्या अनेक आहेत. त्यातील नागरी व ग्रामीण अशा समस्या सांगता येतील. नागरी समस्यांमध्ये दाट लोकवस्तीमुळे वृक्षांची कत्तल होऊन तेथे निवासी औद्योगिक बांधकामे झाली. नदी, नाले, ओढे यांच्यावर अतिक्रमणे होऊन त्यांचे अस्तित्व धोक्यात आले. त्यातून नवीन समस्या अस्तित्वात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने ध्वनीप्रदूषण, वायूप्रदूषण, जलप्रदूषण यांचा समावेश होतो. या प्रदूषणाचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होत आहे.

प्रश्न : आपली संस्था कशी काम करत आहे ?
उत्तर : डिसेंबर 2016 मध्ये काही निसर्गवेडे, वृक्षमित्र, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे मित्र, सायकलिंग व ट्रेकिंगच्या माध्यमातून एकत्र आलेले मित्र हे दिघी येथील दत्तगड (दिघीचा डोंगर) या ठिकाणी चक्कर मारण्यासाठी गेले. त्यावेळी त्या ठिकाणी सर्व परिसर बोडका व उजाड दिसत होता. या भागांमध्ये काहीतरी पर्यावरण विषयक काम चालू करावे, अशी चर्चा होऊन जानेवारी 2017 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली.

त्यावेळी गुरुवार, शनिवार, रविवार या तीन दिवशी पाणी अडविण्यासाठी सीसीटी (चर) खोदण्याचे काम सुरू झाले. ज्या भागात कामाला सुरुवात केली होती. तेथे सीसीटीसाठी जागा शिल्लक न राहिल्याने दुसऱ्या जागेवर सीसीटी घेण्यास सुरुवात केली. असे काम करताना उन्हाळा संपला व पावसाळा सुरू झाला. त्यावेळी रघुनंदन ढोले यांच्यामार्फत झाडे मिळतील ती आपण लावू, असा निर्णय झाला व खड्डे घेऊन सुमारे 100 झाडे सुरुवातीला लावण्यात आली.

हे पर्यावरण संवर्धनाचे चांगले काम पाहून अनेक वृक्षमित्र आम्हाला मदत करु लागले. 2016 च्या शेवटी ते 2017चा जून चा कालावधी या कामांमध्ये अनेक व्यक्ती संघटना जोडल्या गेल्या या कामांमध्ये सातत्य वाढत गेले. त्यानंतर आपण सतत 100 दिवस काम चालू ठेवू असा निर्णय घेतला. मग 100 दिवसांचे ठरविलेले काम आजपर्यंत अविरतपणे दररोज चालू आहे. त्यामुळे आम्ही संस्थेचे नावही ‘अविरत श्रमदान’ असे ठेवले आहे.

आजही रोज सकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेमध्ये संस्थेचे सभासद श्रमदानासाठी हजर असतात. नवीन सभासद वाढत गेले. यामध्ये महिला, विद्यार्थी, शिक्षक, कामगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर, उद्योजक अशा विविध क्षेत्रातील लोकांचा सहभाग वाढत गेला.

आमदार महेश लांडगे यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य यासाठी लाभले आहे. त्याचप्रमाणे त्यांचे बंधू सचिन लांडगे हे स्वतः दैनिक श्रमदानामध्ये सुरुवातीपासून सामील आहेत. तसेच दिघी येथील BEG मधील TB2 येथील लष्कराच्या अधिका-यांचे देखील मोठे सहकार्य मिळत आहे.

प्रश्न : किती स्वयंसेवक सध्या काम करत आहेत ?
उत्तर : आमच्या संस्थेला एनजीओ म्हणून मान्यता मिळाली आहे. धर्मादाय आयुक्त यांच्याकडे मागील दोन वर्षांपूर्वी संस्थेची नोंदणी केली आहे. सध्या सुमारे तीनशे सभासद सक्रिय काम करत आहेत.

प्रश्न : सर्व सभासद कुठे आणि काय काम करतात ?
उत्तर : संस्थेच्या वतीने दिघी येथील दत्तगडाच्या पायथ्याला व माथ्यावर 250 प्रकारची 5 हजार देशी व स्थानिक प्रकारची झाडे लावलेली आहेत. त्यांचे चांगले संवर्धन केले आहे. वृक्षारोपण करण्यात आलेल्या जागेवर पशुपक्षांना पाणी व खाऊची सोय केली आहे. हे काम सर्व सभासद अविरतपणे करत आहेत.

प्रश्न : बाजूलाच लष्करी कॅम्प आहे, लष्कराचे सहकार्य मिळते का ?
उत्तर : सध्या लष्कराच्या माध्यमातून दत्तगड परिसरात एक लक्ष वृक्ष लागवडीचे काम चालू आहे. यापैकी 10 हजार झाडे ही अविरत श्रमदान या आमच्या सेवाभावी संस्थेच्या वतीने लावण्याचे काम सध्या सुरू आहे. या झाडांचे संवर्धन आम्ही पुढील 5 वर्ष करणार आहोत. लष्कराकडून देखील पर्यावरण संवर्धनासाठी सहकार्य मिळते.

प्रश्न : नदी स्वच्छता अभियान राबवले आहे, त्याबद्दल काय सांगाल ?
उत्तर : नदी स्वच्छता अभियानामध्ये सुरुवातीला काही मोहिमा पवना नदीच्या किनाऱ्यावर केल्या. त्यानंतर तळवडे ते आळंदी या भागांमध्ये इंद्रायणी स्वच्छता मोहीम राबवली जात असून मागील दोन-तीन वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर व योग्य वेळी पाण्यातून जलपर्णी काढण्याचे काम केले. त्यामुळे यावर्षी नदीमध्ये जलपर्णीचे प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये घटलेले दिसून येत आहे.

येत्या काही काळात पिंपरी चिंचवड मनपा व लोकसहभागातून संस्थेमार्फत इंद्रायणी पूर्ण स्वच्छ केलेली दिसेल. विद्यार्थ्यांमध्ये नदी स्वच्छतेबाबत जागृती व्हावी, म्हणून साधारण 70 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवून निबंध, चित्रकला, वकृत्व स्पर्धा यांच्या माध्यमातून विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये नदी स्वच्छतेबाबत जनजागृती घडवून आणली. त्यांचा स्वच्छता अभियानामध्ये मोलाचा सहभाग होता. अनेक शाळा विद्यार्थ्यांना घेऊन नदी स्वच्छता करण्यासाठी प्रत्यक्ष नदीवर उपस्थित होत्या.

मागील दोन-तीन वर्षांपासून इंद्रायणी नदीच्या तीरावरच्या वेगवेगळ्या घाटांवर संस्थेमार्फत लोकांमध्ये गणेश विसर्जन या विषयावर प्रबोधन करून घाटावर व वेगवेगळ्या ठिकाणी बांधलेल्या जलकुंभ यामध्ये गणेश मूर्तींचे विसर्जन घडवून आणले जात आहे. त्याच प्रमाणे संस्थेने हजारो गणेश मूर्तींचे दान स्वीकारून पालिकेच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वापरात आण्याचे नियोजन घडवून आणले आहे.

सायकल चालवा पर्यावरण वाचवा व नदी स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी संस्थेच्या वतीने पिंपरी-चिंचवड मध्ये सर्वात मोठ्या सायक्लोथॉनचाचे आयोजन केले जात आहे. प्रत्येक वर्षी सहभागाचा नवीन उच्चांक रचला जात आहे. यातून मोठ्या प्रमाणावर पर्यावरण या विषयावर प्रबोधन व प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे.

प्रश्न : पर्यावरण विषयवार काम करणा-या इतर संस्थांसोबत कसे काम केले जाते ?
उत्तर : संस्थेचे काही सभासद दत्तगड पायथा, दत्तगड माथा, घोराडेश्वर डोंगर, आयप्पा टेकडी याठिकाणी तसेच इतर संस्थांमार्फत चालू असणाऱ्या प्रकल्पांना भेट देऊन तेथेही काम करत आहेत. संस्थेचे काम पाहून वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी काम चालू केले त्यांना संस्था मार्गदर्शन करत असून त्यांना रोपे व बिया देणे अशा स्वरूपात मदत करत आहे. अनेक संस्थांना मदत केली जाते व त्यांचीही आमच्या प्रकल्पात मदत घेतली जात आहे. शासनाच्या व पालिकेच्या नदी सुधारणा प्रकल्पावर संस्थेचा सभासद प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

प्रश्न : आजवरच्या कामात काही अडचणी आल्या का? कोणत्या ?
उत्तर : हो, वृक्षारोपण करताना येणाऱ्या प्रमुख अडचणी म्हणजे काही लोक अजूनही याला गांभीर्याने घेत नाहीत. लावलेल्या झाडांचे नुकसान, झाडांची मोडतोड करणे, झाडाभोवती असलेले गवत जाळणे ज्यामुळे झाडांना अतिशय नुकसान होते. काही वेळेस जनावरे झाडे खाताना किंवा त्यांची मोडतोड करतात. पाणी देण्यासाठी आणलेल्या साहित्याची चोरी करणे व केलेल्या व्यवस्थापनाचे नुकसान केले जात आहे. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्याचे काम हे मोठे आव्हान आहे.

प्रश्न : शासनाकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा कराल ?
उत्तर : आमचे शासनाला असे आवाहन आहे की, जेथे शासकीय जमिनी, माळरान उजाड पडलेली आहेत, त्या ठिकाणी आमच्या सारख्या संस्थांना वृक्षारोपण करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी. फक्त वृक्ष लागवड न करता त्याचे संवर्धन कसे होईल, यासाठी प्रयत्न करावा.

प्रश्न : भविष्यात कामाचा व्याप किती वाढणार आहे ? त्याचा काय फायदा होईल ?
उत्तर : अविरत श्रमदान ही आमची संस्था भविष्यात पर्यावरण संवर्धन करून ते वाचण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. आमच्या प्रमाणे इतर भागांमध्येही वृक्षलागवड केली जावी, यासाठी आमच्या संस्थेच्या वतीने जनजागृती केली जात आहे.

प्रश्न : नागरिकांना काय आवाहन कराल ?
उत्तर : सर्वांना आवाहन की, तुम्हीही पर्यावरण संवर्धनाच्या कामात सामील व्हा. या पृथ्वीला हरीत बनविण्यासाठी प्रयत्न करा. आपण ज्या भागात असाल तिथे वृक्षारोपण आणि त्याचे संवर्धन करा. काही मदत लागली तर आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या मदतीला नक्की येऊ.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.