Pimpri : सत्ता जाताच भाजप आमदारांना शास्तीकराचा प्रश्न सुटला नसल्याचा साक्षात्कार – नाना काटे

मागील पाच वर्षे आमदारांनी नागपूरच्या तालावर नाचत कारभार केला

एमपीसी न्यूज – मागील पाच वर्षे राज्यातील सत्तेत असणार्‍या लक्ष्मणभाऊ, महेशदादा या दोन्ही आमदारांना शास्तीकराचा आणि पाणी प्रश्न सोडवता आला नाही. आता सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आतच सरकारबाबत जनतेत नाराजी असल्याचा आमदारांना साक्षात्कार कसा झाला?, असा सवाल विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे. तसेच मागील पाच वर्षे आमदारांनी नागपूरच्या तालावर नाचत कारभार हाकला, असा आरोपही त्यांनी केला.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नाना काटे यांनी म्हटले आहे की, शहरातील अधिकृत बांधकामासह शास्तीकराचा प्रश्न मार्गी लागत नाही म्हणून 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांना मागील पाच वर्षात शहरातील शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावण्यात काही अंशी यश आले असे सांगताना स्वतःचे अपयश लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. 1000 चौरस फुटापर्यंत निवासी बांधकाम असलेल्या नागरिकांना जिझिया करात सूट देण्यात आली असल्याचे सरकारने वेळोवेळी घोषीत केले. त्यावेळी स्थानिक भाजपच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे ही भरवले होते.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात 95 टक्के पाणीसाठा असताना सत्ताधारी भाजपने शहरात पाणी कपात सुरू केली. विस्कळीत पाणीपुरवठा होत असल्याने लोकांच्या मनात असंतोष आहे. या आमदारांना मागील पाच वर्षात सत्तेत राहून शास्तीकराचा विषय निकालात काढता आला नाही. आता सत्ता गेल्यानंतर एका महिन्याच्या आतच सरकारबाबत जनतेत नाराजी असल्याचा साक्षात्कार कसा झाला?, असा सवालही त्यांनी केला.

आजही शहरात अनेक ठिकाणी दूषित व व विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. शहराला समान पाणीपुरवठा करण्यासाठी योजना मार्गी लागत नाहीत. तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पाणीकपात करावी लागते, असे भाजपच्या दोन्ही आमदार सांगतात. मागील पाच वर्षे नागपूरच्या तालावर नाचत कारभार हाकला. सत्ता गेल्यानंतर आता पुन्हा एकदा नागपुरात जाऊन शहरातील प्रश्नासाठी लक्षवेधी मांडण्याची वेळ का आली याचा अभ्यास आमदारांनी करावा, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.