Interview With CP Krishna Prakash: जो कायदा पाळणार नाही, त्या प्रत्येकावर कारवाई होणारच- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

मी कोणत्याही दबावाला थारा देत नाही. आजपर्यंत माझ्यावर कधीच राजकीय दबाव आला नाही. तो यापुढे देखील येईल, असे वाटत नाही. मी कायद्याने चालतो आणि कायदा सर्वांना समान आहे, असे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी या विशेष मुलाखतीत स्पष्ट केले.

एमपीसी न्यूज – आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी काही तासातच माध्यमांशी संवाद साधला आणि सर्व प्रकारच्या गुन्हेगारांना उद्देशून कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल, असा त्यांच्या खास शैलीत दम दिला. पहिल्याच दिवशी अशी दमदार एंट्री केलेल्या कृष्ण प्रकाश यांच्याशी ‘एमपीसी न्यूज’ने संवाद साधला. त्यावेळी ‘कायदा हा सर्वाना समान आहे, मग तो गरीब, श्रीमंत, गुन्हेगार असो व कोणी राजकीय नेता असो. जो कायदा पाळणार नाही, त्या प्रत्येकावर कारवाई होणारच’ असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. पोलीस आयुक्तांशी साधलेला प्रश्नोत्तररुपी संवाद ..

प्रश्न : कायदा बदला किंवा मला बदला, अशी आपली रोखठोक भूमिका असते, त्याबाबत काय सांगाल ?

उत्तर : हे कायद्याचे राज्य आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. मग तो गरीब, श्रीमंत, गुन्हेगार असो व कोणी राजकीय नेता असो. जो कायदा पाळणार नाही त्याच्यावर कारवाई निश्चित आहे. मी कायदा पाळणारा माणूस आहे.

प्रश्न : अनेक वेळेला बदलीची धमकी दिली जाते ?

उत्तर : जसे की मी सांगितले. माझ्यावर आजवर कुणी दबाव आणलेला नाही, आणि आणण्याची शक्यताही नाही. माझी कुठेही बदली झाली तरी माझा पगार तेवढाच राहणार आहे. त्यामुळे बदलीची धमकी दिली. बदली झाली, तरीही मी माझे काम करतच राहणार आहे.

प्रश्न : पिंपरी-चिंचवड शहरात आदर्श पोलिसिंगसाठी आपले काही प्लॅन आहेत का ?

उत्तर : ठोस प्लॅन सध्या काहीही नाहीत. पण महिला आणि मुलांच्यासाठी काही योजना राबवणार आहे. शहराची थोडीफार माहिती आहे. त्यामुळे शहराचा प्रथम अभ्यास करून त्यानंतर काय करता येईल, याबाबत प्लॅन तयार करणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांचे हित ही कामाची प्राथमिकता असेल.

प्रश्न : आयुक्तालयाच्या अडचणी सोडविण्यासाठी कसे प्रयत्न असणार आहेत ?

उत्तर : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हे नवीन आहे. पूर्वीच्या अधिका-यांनी आयुक्तालयाच्या अडचणींबाबत चांगला पाठपुरावा केला आहे. पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलेला पाठपुरावा सुरु राहील. याबाबत उच्चस्तरावरून सकारात्मक प्रतिसाद देखील मिळत आहे. पण अडचणी सुटण्यासाठी काही वेळ लागेल. तोपर्यंत आहे त्या परिस्थितीत स्मार्ट वर्क करून अडचणींवर मात केली जाईल. यात विशेष म्हणजे मला काम करताना जेवढी आव्हाने असतील तेवढी मजा येते.

प्रश्न : पोलिसांवर काम करताना राजकीय दबाव आणला जातो ? याबाबत काय सांगाल ?

उत्तर : मी कोणत्याही दबावाला थारा देत नाही. आजपर्यंत माझ्यावर कधीच राजकीय दबाव आला नाही. तो यापुढे देखील येईल, असे वाटत नाही. मी कायद्याने चालतो आणि कायदा सर्वांना समान आहे.

प्रश्न : शहरातील अवैध धंद्यांबाबत काय सांगाल ?

उत्तर : मी शहराच्या एकंदरीत स्थितीचा अभ्यास करीत आहे. मी जोपर्यंत आहे, तोपर्यंत सर्वांना कायद्याने वागावे लागेल. अवैध किंवा बेकायदेशीर धंदे करणाऱ्यांनी मी आहे तोपर्यंत इतर उद्योग शोधावे.

प्रश्न : शहरात आयटी पार्क, औद्योगिक वसाहत, झोपडपट्टी असा तीन प्रकारचा परिसर आहे, यामधल्या गुन्हेगारीला आळा कसा बसवणार ?

उत्तर : हे खरं आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एकीकडे आयटी पार्क असल्याने उच्चभ्रू वसाहत आहे. दुसरीकडे औद्योगिक पट्टा आहे. त्यातच झोपडपट्टीसारखा मध्यम आणि निम्नवर्ग देखील आहे. त्यामुळे या प्रत्येक भागातील गुन्हेगारीचे स्वरूप वेगवेगळे आहे.

झिरो टॉलरन्स ही माझी मुख्य भूमिका आहे. जो कायदा हातात घेईल त्याच्यावर कारवाई होणार. गुन्हेगारांना एक नवी दिशा देऊन गुन्हेगारीतून बाहेर आणण्यासाठी काही उपक्रम राबवण्याचा विचार सुरु आहे.

प्रश्न : नागरिकांना काय आवाहन कराल ?

उत्तर : सर्वांनी कायदा पाळावा. सर्व नियम पाळून पोलीस व प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करावे. कोरोनाच्या काळात घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. कोणतीही अडचण असल्यास थेट संपर्क करा. माझे दरवाजे नागरिकांसाठी 24 तास खुले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.