Interview with Dr. Neelam Gorhe: ‘महिलांसाठी काम करताना उपसभापतीपदाचा फायदा होईल; कुरघोडी, गटबाजीच्या पलीकडे जाऊन शहरात शिवसेना वाढेल’

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपसभापती म्हणून काम करता येत आहे. त्याबाबत माझ्या मनात समाधान आहे

0

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – महिलांसाठी काम करताना त्यांना कायद्याची माहिती देणे, प्रबोधन करणे. त्यांच्या आरोग्याची माहिती हे कामाचे स्वरूप असते. महिलांसाठी काम करताना उपसभापतीपदाचा नक्कीच फायदा होईल असे सांगतानाच पिंपरी-चिंचवड शहराकडे पक्षाचे दुर्लक्ष होत नाही. कुरघोडी, गटबाजीच्या राजकारणापलीकडे जाऊन शहरात शिवसेना वाढेल, असा विश्वास विधानपरिषदेच्या नवनिर्वाचित उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उपसभापती म्हणून काम करता येत आहे. त्याबाबत माझ्या मनात समाधान आहे, असेही त्यांनी म्हटले.

मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून पुन्हा एकदा शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची फेरनिवड झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’चे राजकीय प्रतिनिधी गणेश यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न – सलग दुसऱ्यांदा विधानपरिषदेच्या उपसभापती झाला आहात. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – हा अत्यंत अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण आहे. 55 वर्षांपूर्वी म्हणजे महाराष्ट्र राज्य स्वतंत्र झाले नव्हते. भारताचा संयुक्त भाग होतो. आता महाराष्ट्र भारतातच आहे. परंतु, महाराष्ट्र राज्य भाषावार प्रांत रचनेनुसार संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला. त्यांनतरची मी पहिली महिला उपसभापती आहे. हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण सांगितले होते. त्या मार्गावर गेले 22 वर्षे माझी वाटचाल चालू आहे.

2002, 2008, 2014 आणि 2020 ला असे चारवेळा विधानपरिषदेची सदस्य म्हणून माझ्यावर पक्षाने जबाबदारी टाकली. परिषदेत पक्षाची पहिली महिला प्रतोद, विशेष हक्क समितीची पहिली महिला प्रमुख मी झाले. 2007 पासून शिवसेनेची पहिली महिला प्रवक्ता आहे. 2005 पासून 15 वर्ष शिवसेनेची उपनेता म्हणून काम करत आहे. याखेरीज सामाजिक कामाचीसुद्धा  विधी मंडळाने दखल घेतली आहे. याबाबत मी सर्वांची ऋणी आहे.

प्रश्न – भाजपने निवडणुकीवर आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर तुमचे काय मत आहे?

उत्तर – यावर मी भाष्य करणे योग्य नाही.  सभागृहाने माझी निवड केली असून सभापतींनी स्पष्ट केले आहे.

प्रश्न – शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे तीन पक्षाचे सरकार आहे. तर, भाजप विरोधात आहे. सभागृहात समतोल कसा साधणार, पक्षपातीपणा होईल का?

उत्तर – सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे सभागृहाचे कामकाज चालविण्याच्या दृष्टीने असतात. सभागृहाचे नियम असतात. त्याचबरोबर विधिमंडळ सचिवालय आणि कायद्याचे संदर्भ घेतले जातात. पूर्वी झालेल्या प्रकरणाचा अभ्यास केला जातो. ज्यावेळेला काही वादाचे प्रसंग तयार होतात. त्यावेळेला त्याच्या आधीचे प्रघात आणि नियमावली पुस्तकाचा आधार घेतल्यास वादाचे प्रसंग तयार होत नाहीत. झाले तरी काय योग्य निर्णय आहे. तो घेतला जातो. पूर्वीपण मी उपसभापती म्हणून काम करताना योग्य निर्णय घेतले. त्याला सभापतींचे मार्गदर्शन असते. विधिमंडळाचे सचिवालय पण आम्हाला पूर्ण ते मार्गदर्शन करत असते.

प्रश्न – पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्याचे काही दडपण असेल का?

उत्तर – उद्धव साहेब यांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनानुसार गेली अनेक वर्षे काम करत आहे. ते ज्या प्रकारे शेतकऱ्यांशी संवाद साधतात.  सुख दुःखच्या प्रसंगात  सहभागी होत असतात. कोणत्याही गोष्टींचा त्यांचा विचार त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडलेला असतो. त्यामुळे आम्हाला त्यांच्या कार्यशैलीचा परिचय आहे. चांगले विधायक काम होत असेल. तर, त्याला विरोधासाठी विरोधात न करता सर्वांनी सहकार्य करावे. एवढीच त्यांची अपेक्षा असणार आहे. त्याच्यामुळे दडपण म्हणण्यापेक्षा ते मुख्यमंत्री असताना उपसभापती म्हणून काम करता येत आहे. त्याबाबत माझ्या मनात समाधान आहे.

प्रश्न – महिलांबाबत तुमचे राज्यभरात विशेष काम आहे. ते काम करताना उपसभापतीपदाचा कितपत उपयोग होईल?

उत्तर – महिलांसाठी काम करताना त्यांना कायद्याची माहिती देणे, प्रबोधन करणे. त्यांच्या आरोग्याची माहिती हे कामाचे स्वरूप असते. कार्यकर्त्या तयार करण्यासाठी मी मार्गदर्शन करत आले आहे.  50 टक्क्यांपेक्षाही मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आहेत. महापौर, जिल्हापरिषद अध्यक्षा, वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना यासाठी अधिकाधिक सहकार्य कसे करता येईल याकडे माझे लक्ष असते.

महिलांसाठी काम करताना या पदाचा उपयोग होईल. शहरातील, ग्रामीण भागातील महिलांचे प्रश्न सोडविणे. ग्रामीण भागात नागरी सुविधांचा अभाव असतो. आरोग्य विषयक समस्या असतात. त्यावर मार्ग काढण्यासाठी या पदाचा चांगल्या प्रकारे उपयोग होईल. त्याचबरोबर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविकाला योग्य ती सुविधा, स्वच्छता मिळावी. यासाठी एकविरा संस्थान, आळंदी, पंढरपूर देवस्थान, नृसिंहवाडी संस्थानाबरोबर बैठक घेतल्या होत्या. त्याचा सुद्धा पाठपुरावा करणे शक्य होऊ शकेल.

प्रश्न – महिला सक्षमीकरणाबाबत काय सांगाल?

उत्तर – समाजातील जे घटक न्यायापासून दूर असतात. त्या सर्वांचे सक्षमीकरण करणे म्हणजेच महिला सक्षमीकरण होय. हिंसाचारापासून महिला मुक्त होणे. त्यांना विकासाच्या संधी मिळणे. त्यादृष्टीकोनातून शासन, समाज, कायदा, कौशल्य प्रशिक्षण या सर्वांची गरज आहे. ते करण्यासाठी भरपूर काम, वाटचाल करायची आहे. अजूनही हिंसाचार होत आहेत.

जेवढ्या प्रमाणात निर्णय प्रक्रियेत महिलांची संख्या पाहिजे तेवढी नाही. संयुक्त राष्ट्र संघांने 2030 पर्यंत सर्व क्षेत्रात 50 टक्के महिला असतील, असे म्हटले आहे. वर्ष पटकन निघून जात आहेत. बदल होत आहे. परंतू, तो फार मंद गतीने होत आहे. म्हणूनच सामाजिक भावनेतून या कामासाठी अधिक चालना देणे हा माझा आवडीचा विषय असेल.

प्रश्न – पिंपरी-चिंचवडच्या तुम्ही संपर्क प्रमुख होतात. संघटनेत तुम्ही काम केले आहे. शहराकडे पक्षाचे दुर्लक्ष होतेय असे तुम्हाला वाटते का?

उत्तर – नाही. शहरप्रमुख आहेत. एक खासदार, एक माजी खासदार आहेत. शिवाजीराव आढळराव पराभूत झाले असले. तरी, त्यांचे मतदारसंघात लक्ष आहे. बाकी लोकप्रतिनिधी नसले. तरी मला जेवढे शक्य आहे तेवढे मी करते. नगरसेवक काम करत आहेत. पिंपरी-चिंचवडच्या विषयांसाठी काही मदत लागत असेल. त्यादृष्टीकोनातून माझे लक्ष असणार आहे.

प्रश्न – तुम्ही उपनेत्या, प्रवक्त्या या जबाबदार पदावर आहात. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराकडे लक्ष देणार का?

उत्तर – संपर्क नेते, संपर्क प्रमुख आहेत. संघटनेबाबतचा अहवाल ते वेळोवेळी पक्षप्रमुखांना देत असतात. उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार संजय राऊत  यांचा चांगला संपर्क आहे. रवींद्र मिर्लेकर यांचे शहरात येणे-जाणे असते. त्यामुळे सर्वांनी मिळून कशाप्रकारे शिवसेनेची ताकद वाढविता येईल. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. कुरघोडी, गटबाजीच्या राजकारणापलीकडे जाऊन शहरात शिवसेना वाढेल. आता नवीन समीकरण आहे. त्या पार्श्वभूमीवर काम करावे लागणार आहे. जे प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. ते मार्गी लावले जातील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.