Interview with Dr. Pawan Salave: ‘कोरोनाचा नवा स्ट्रेन किती घातक, हे पंधरा दिवसात कळेल’ 

महापालिकेची लसीकरणाची तयारी पूर्ण

एमपीसी न्यूज – ( गणेश यादव ) पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या सध्या आटोक्यात आहे. लसीकरणाच्या कामकाजासाठी 150 लोकांची टीम तयार आहे. 28 हजार लोकांची लस टोचण्यासाठी नोंद झाली. लसीकरणाचे नियोजन पूर्ण झाले असून लस बाजारात आल्यानंतर सरकारच्या आदेशानुसार लसीकरण करण्यात येईल.

कोरोनाच्या नवीन स्ट्रेनचा अभ्यास राष्ट्रीय विषाणू संस्था करत आहे. तो किती घातक आहे, हे पुढील पंधरा दिवसात कळेल,  असे महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. त्याची काळजी करण्यापेक्षा दक्षता घेण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून डॉ. साळवे काम करत आहेत. सध्या शहरातील रुग्णसंख्या आटोक्यात आहे. जानेवारीत पुन्हा रुग्णवाढ होईल असा अंदाज वर्तविला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’ने डॉ. पवन साळवे यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न – कोरोनामुळे वैद्यकीय क्षेत्रात काय बदल झाले आहेत. असे तुम्हाला वाटते?

उत्तर – सामान्य नागरिकांचा वैद्यकीय उपचारांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. आपले आरोग्य, जीवन याकडे बघण्याच्या दृष्टोकन नक्कीच बदलणार आहे. मुलभूत गोष्टीकडे नागरिक जास्त लक्ष देतील. प्राधान्यक्रम बदलला आहे. वैद्यकीय उपकरण, मशीन तत्काळ घेवू शकतो. पण, ते चालविण्यासाठी तज्ज्ञ मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास अडचण निर्माण होते. कोरोनामुळे प्राधान्यक्रम लक्षात आला आहे. मशीनबरोबरच  कुशल मनुष्यबळ देखील पाहिजे हे लक्षात आले आहे. मानसांना परवडणा-या सुविधा पाहिजेत. आणखीन बदल व्हायचे आहेत. विकास कामांसोबत वैद्यकीय विभागासाठी कुशल मनुष्यबळ देखील उपलब्ध झाले असते. तर, त्याचा अधिक लाभ झाला असता.

प्रश्न – सध्या शहरातील कोरोनाची परिस्थिती काय आहे. रुग्णवाढ नियंत्रणात आहे का?

उत्तर – डिसेंबर महिन्यात थंडी वाढल्यानंतर रुग्णवाढ होईल असे बोलले जात होते. मोठ्या संख्येने रुग्णवाढ होईल असा अंदाज वर्तविला जात होता. पण, सुदैवाने रुग्णवाढ झाली नाही. चाचण्यांचे प्रमाण वाढवून देखील रुणसंख्या कमी आहे. मृत्यू वाढतील अशीही भिती व्यक्त केली जात होती. परंतु, मृत्यूचे प्रमाणही कमी आहे हे आशादायक चित्र आहे. आत्ता कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आहे.

प्रश्न – ब्रिटनमध्ये नव्याने सापडलेल्या कोरोना स्ट्रेनबाबत काय सांगाल. काळजी करण्याऐवढा तो धोकादायक आहे का?

उत्तर – इंग्लंडमधील काही भागात कोरोना विषाणूच्या जनुकीय रचनेत काही बदल झालेला नवीन विषाणू स्ट्रेन आढळला आहे. या विषाणूचा प्रसार नेहमीपेक्षा अधिक वेगाने होऊ शकतो असे तज्ञांचे मत आहे. नवीन स्ट्रेनचा अभ्यास राष्ट्रीय विषाणू संस्था करत आहे. त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळेल. तो किती घातक आहे हे पुढील पंधरा दिवसात कळेल. शहरातही इंग्लंडून आलेले दोन रुग्ण सापडले आहेत. त्यांच्यावर भोसरीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, परदेशातून आलेले काहीजण शहर सोडून गेले आहेत. काळजी करण्यापेक्षा दक्षता घेण्याची गरज आहे. लोकांनी विनाकारण गर्दी टाळावी. सुरक्षित अंतर पाळावे. मास्कचा वापर करावा, हात सॅनिटाईझ करावेत.

प्रश्न – जानेवारी महिन्यात रुग्णवाढ होईल अशी शक्यता वर्तविली जात आहे. तुम्हाला काय वाटते. रुग्णवाढ झालीच तर विभागाची तयारी आहे का?

उत्तर – शहरात दिवाळीनंतर रुग्णवाढ होईल असे ग्रहित धरले होते. पण, रुग्णवाढ झालेली नाही. शहरात कोरोनाचे जास्त रुग्ण नसल्याने कोरोनासाठी सुरु केलेली रुग्णालये  बंद करण्याची मागणी होत आहे. वैद्यकीय उपचार महापालिका रुग्णालयात चालू ठेवण्याचे सरकारचे आदेश येतील असे अपेक्षित आहे. सरकारच्या आदेशानुसार पुढील कारवाई केली जाईल.

प्रश्न- लसीकरण कधीपर्यंत सुरू होईल. नियोजन कसे केले आहे?

उत्तर – कोणत्या प्रकारची लस येणार आहे. किती प्रमाणात आपल्याकडे येणार आहे. लसीकरण कसे करायचे याबाबत केंद्र, राज्य सरकारकडून सूचना प्राप्त होतील. लसीकरणाच्या कामकाजासाठी 150 लोकांची टीम तयार आहे.

प्रश्न – लसीकरणासाठी किती लोकांची नोंदणी झाली. पहिल्या टप्प्यात किती लोकांना लस टोचवली जाणार आहे?

उत्तर – अत्यावश्यक सेवेतील शासकिय व खासगी आरोग्य सेवा कर्मचारी (HCW) यामध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी,वार्डबॉय, वार्डआया, सफाई कामगार, लॅब टेक्निशियन, सोनोग्राफी टेक्निशियन, रुग्णालयातील वाहनचालक, स्वागतिका व कार्यालयातील कर्मचारी अशा 28 हजार लोकांची लसीकरणासाठी नोंद केली आहे. लस टोचून घेण्यासाठी शहरातील खासगी वैद्यकिय व्यावसायिकांना नाव नोंदणी करण्याचे आवाहन केले जात आहे. महापालिकेच्या  ‘स्मार्ट सारथी ऍप’वर नोंदणी केली जात आहे. एकीकडे काही लोक काहीच माहिती देत नाहीत. तर, दुसरीकडे काही लोक आमची माहिती घ्या म्हणतात. पण, त्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार नाही.  सरकार प्राधान्य क्रम देईल. हॉस्पीटलमधील लोक, वैद्यकीय क्षेत्रातील काम करणारे लोकांना लस द्यावी अशा सूचना येतील. त्यानुसार लसीकरण  करण्यात येईल.

प्रश्न – कोरोना काळातील तुमचा अनुभव कसा आहे?

उत्तर – कोरोना काळातील कामाचा अनुभव चांगला होता. अशा प्रकारची आपत्ती सातत्याने येत नाही. त्यामध्ये काम करण्याची संधी मिळाली. फार चांगला अनुभव होता. महापौर  आयुक्त श्रावण हर्डीकर, महापौर उषा ढोरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. सर्व पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, नागरिकांनीही चांगले सहकार्य केले. कोरोनाची दहशत कमी होत आहे. त्यातून आता हळूहळू बाहेर येणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवन सुरळीत चालू करण्याची गरज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.