Interview With Dr. Suhas Mate : प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे मानूनच काळजी घ्यावी लागेल – डॉ. सुहास माटे

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – येणाऱ्या काळात समोरचा प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे, असे मानूनच काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाची लस अद्याप दुष्टीक्षेपात नाही त्यामुळे सध्या त्यावर खबरदारी हाच उपाय आहे, असे मत भारतीय वैद्यकीय संघटना (इंडियन मेडिकल असोसिएशन) पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष डॉ. सुहास माटे यांनी व्यक्त केले आहे. डॉ. माटे यांनी 25 वर्ष पालिकेत वैद्यकीय अधिकारी (त्वचा विकार तज्ज्ञ) म्हणून काम पाहिले आहे.

कोरोना या जीवघेण्या विषाणूचे थैमान सर्व जगात सुरू आहे. गेले सहा ते सात महिन्यांपासून या आजाराने सर्वांना वेठीस धरले आहे, या पार्श्वभूमीवर सर्वांच्या मनात या आजाराबाबत विविध प्रश्न आणि शंका आहेत अशाच काही प्रश्नांवर डॉ. सुहास माटे यांच्याशी प्रश्नोत्तर स्वरूपात साधलेला हा संवाद…

प्रश्न : सध्या देशात असो की महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची विक्रमी वाढ होत असल्याचे दिसून येत आहे, बेडची (विशेषतः ऑक्सिजन बेड) कमतरता प्रकर्षाने भासत आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी गंभीर होईल का ? आपल्याला काय वाटते? 

उत्तर – हो, एकंदरीत परिस्थिती पाहता गंभीर चित्र दिसत आहे. येत्या महिन्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे बेडची कमतरता तर आहेच ती वस्तूस्थिती आहे.

प्रश्न : कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करताना अनेक डॉक्टर हलगर्जीपणा करतात, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे ; या आरोपाचे खंडन कसे कराल?

उत्तर – एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की या आजाराबाबत अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. डाॅक्टरसुद्धा उपचार करत आजाराबाबत शिकत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक काय डाॅक्टरांच्या मनातसुद्धा कोरोनाबद्दल भिती आहे. कित्येक डॉक्टर कोरोनाबाधित झाले बरे होऊन पुन्हा रुग्णांच्या सेवेत रुजू झाले आहेत.

सुरुवातीला प्लाझ्मा थेरपीचा फायदा होतो असे सांगण्यात आले नंतर त्याचा फारसा उपयोग होत नसल्याचे समोर आले. मास्कबाबत सुद्धा कोणता मास्क वापरावा, याबाबत संभ्रम आहेत. परिस्थिती पाहता अजूनही सगळेच शिकताहेत त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा होतो यात फारस काही तथ्य नाही.

प्रश्न : प्लाझ्मा थेरपीचा जास्त फायदा होत नसल्याचे ‘आयसीएमआर’ने सांगितले आहे, तरी अजूनही प्लाझ्मा थेरपी केली जात आहे. तर याचा कितपत रुग्णांना फायदा होतो? 

उत्तर – प्लाझ्मा थेरपी हा कोरोनावर उपाय नाही. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा जर गंभीर कोरोना रुग्णांना दिला तर त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची शक्यता असते. अर्थात प्लाझ्मा थेरपी ही एक शक्यता आहे हा कोणताही खात्रीशीर उपाय नाही.

प्रश्न : भोसरीतील एका ज्येष्ठ नागरिकांने डाॅक्टरने कोरोनाची भिती दाखवली म्हणून आत्महत्या केल्याची घटना घडली. तर खरंच अशी भिती दाखवली जाते का ? मग ती अनाठायी नाही का?

उत्तर – प्रत्येक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची ही जबाबदारी आहे की रुग्णांच्या मनात भिती निर्माण न करता विश्वासात घेऊन दिलासा द्यायला हवा. भिती तर आहेच पण अधिक न वाढवता कमी करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कोरोनासोबत आर्थिक अडचणी, मानसिक ताणतणाव आहेत त्यामुळे रुग्णांना दिलासा देण्याचे काम केले पाहिजे.

प्रश्न : कोरोना काळात अनेक रुग्णालये फी दरवाढ करत आहेत, त्यावर आपल्या असोसिएशनचे कसे नियंत्रण आहे? एखाद्या सदस्य डॉक्टरांच्या बाबतीत असा प्रकार आढळल्यास काय कारवाई केली जाते?

उत्तर – नाही, ‘आयएमए’चे दरवाढीवर कोणतेही नियंत्रण नसते ती संपूर्ण वैयक्तिक बाब आहे. याबाबत असोसिएशन भावनिक आवाहन करु शकते. पण, प्रत्येक रुग्णांवर होणारा खर्च यानुसार दर कमी जास्त होत असतात यामुळे दरात फरक दिसू शकतो. उदाहरणार्थ काही रुग्णांना व्हेंटीलेंटर लागतो तर काहींना लागत नाही याचा दरावर फरक पडतो.

काही रुग्णालयांनी दरवाढ केली आहे पण ती प्रवृत्ती चुकीचीच आहे. शासनानेसुद्धा अवाजवी दरवाढी विरोधात बिल तपासणीसाठी पथक नेमले आहे त्याचाही दरवाढ रोखण्यास ब-यापैकी फायदा होईल.

प्रश्न : कोरोना साथीमुळे इतर आजारांकडे दुर्लक्ष होतंय का? होत असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असतील?

उत्तर – महापालिकेच्या रुग्णालयासह खासगी रुग्णालय देखील कोरोना रुग्णांच्या उपचारात अडकून पडले आहेत. कोरोनाबाधित एखादा रुग्ण रुग्णालयात दाखल झाला की, इतर रुग्णांना दुसरीकडे हलवावे लागते किंवा दुसरे रुग्ण तिथं येतच नाहीत. तसेच, काही सौम्य आजार आहेत जसे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, दातांची शस्त्रक्रिया असेल त्वचा संबंधित आजार असतील अशा गोष्टी लोकांनी पुढे ढकलल्या आहेत.

लोकांमध्येही जागृती निर्माण झाली आहे की आता गरज असेल तरच दवाखान्यात जातात ती एक चांगली प्रवृत्ती आहे. सुरुवातीला भितीनं दवाखाने बंद ठेवण्यात आले पण आता ब-यापैकी सर्वच दवाखाने सुरळीत सुरू आहेत.

प्रश्न : खासगी डॉक्टर महामारीत बाहेर पडत नाहीत. हे योग्य आहे का, याबाबत तुमचे काय मत आहे?

उत्तर – अगदीच बोटावर मोजता येतील इतके डाॅक्टर असे आहेत, तरीही ते चुकीचे आहे. आता सहा ते सात महिन्यांचा कालावधी निघून गेला आहे. अजून किती काळ घाबरून दवाखाने बंद ठेवायचे? यामध्ये नुकसान दोघांचेही (डॉक्टर व रुग्ण) आहे हे लक्षात घेतलं पाहिजे.

प्रश्न : पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत नेमकी वाढ कशामुळे होत आहे?

उत्तर – महाराष्ट्रातील मोठ्या शहरातील रुग्ण संख्या वाढत आहे यासाठी तेथील लोकसंख्या हे एक कारण आहे. तसेच, चाचणीचे दर कमी केल्यामुळे वाढलेलं चाचण्यांचे प्रमाण, अलिकडे लोकांच्यात मोठ्या प्रमाणावर अवेअरनेस आला आहे त्यामुळे स्वत: हून चाचणी करण्याचे प्रमाण वाढले आहे.

एखाद्या ठिकाणी रुग्ण सापडला की त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधणे (ज्याला काॅन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणतात) त्यांची चाचणी करणे त्यामुळे रुग्ण वाढल्याचे दिसून येत आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात स्थलांतरित लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याठिकाणी जास्त रुग्ण हे बाहेरगावचे असल्याचे दिसून येते.

प्रश्र्न : सर्व जगाचे लक्ष लागून राहिले आहे ते म्हणजे कोरोनाची लस कधी येणार? सद्यस्थितीत लसीची कुठपर्यंत प्रगती झाली आहे आणि कधीपर्यंत लोकांसाठी ती उपलब्ध होईल?

उत्तर – मुळात कोणतीही लस निर्माण करण्यासाठी पाच ते सहा वर्षांचा कालावधी लागतो. आता नवीन काही तंत्रज्ञान असेल तर त्याबाबत फारशी माहिती नाही. पण हे जे सांगितले जात होते की ऑगस्ट महिन्यात लस येईल वैगरे ते काही खरं वाटत नाही, ‘लस अजून दृष्टिक्षेपातच नाही’. लसीची पहिली ट्रायल काय असते तर पहिल्यांदा तीचा 50 लोकांवर प्रयोग करायचा नंतर 500 आणि शेवटी 5000 लोकांवर.

पहिल्या चाचणीत ‌लसीचा त्रास काही होत नाही ना म्हणजे लसीची सेफ्टी तपासून पाहिली जाते, नंतर त्याची ‘इम्यूनोजेनेसिटी’ तपासली जाते म्हणजे त्यामुळे माणसाच्या शरीरात प्रतिजैविके तयार होतायत का हे पाहिले जाते‌. त्यानंतर मास व्हॅक्सिनेशन केलं जातं म्हणजे मोठ्या प्रमाणावर लोकांना लस देऊन त्याचा फाॅलोअप घेतला जातो. आणि हे सर्व करण्यासाठी मोठा कालावधी लागतो त्यामुळे लस निर्माण होण्यासाठी अजून बराच अवकाश आहे.

प्रश्र्न : ‘हर्ड इम्युनिटी’ येऊ शकेल का?

उत्तर – ‘हर्ड इम्युनिटी’ येण्यासाठी लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकसंख्येला त्याचा संसर्ग व्हावा लागतो. भारताच्या जवळपास 130 कोटी लोकसंख्येच्या प्रमाणात किमान 60 ते 70 कोटी लोकांना त्याचा संसर्ग व्हावा लागेल आणि तशी ती फार दूरची गोष्ट आहे. थोड्या दिवसांपूर्वी सिरो सर्व्हे झाला त्याच्यात ब-याच लोकांना लागण झाली पण ते कळूनच आलं नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ‘हर्ड इम्युनिटी’ ही फार दूरची गोष्ट आहे.

प्रश्र्न : अनलाॅक अंतर्गत जवळपास सर्वच आस्थापना सुरू करण्यात आल्या आहेत.‌ त्याचबरोबर नागरिकांमध्ये निष्काळजीपणा अधिक वाढल्याचे दिसत आहे याबाबत तुम्ही काय सल्ला द्याल?

उत्तर – प्रत्येक व्यक्ती कोरोनाबाधित आहे असं मानूनच इथून पुढे काळजी घ्यावी लागेल. अति आत्मविश्वास यापुढे घातक ठरू शकतो. स्वत:ची रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्याचा प्रयत्न करणे, शासनाच्या घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे, गरज तरच घराबाहेर पडणे ह्या गोष्टी इथून पुढे काटेकोर पण पाळाव्याच लागतील.

ताजा आणि पोषक आहार घेतला पाहिजे. मानसिक आरोग्य जपलं पाहिजे. नकारात्मक विचारांपासून स्वत:ला दूर ठेऊन सकारात्मक विचार केला पाहिजे. अनिश्चितता प्रत्येक क्षेत्रात आहे हे स्वीकारुन सकारात्मक वाटचाल करायला हवी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.