Interview With Fire Chief Kiran Gawade: ‘गॅस सिलिंडर वापरताना अत्युच्च काळजी घ्या, कारण तिथे चुकीला माफी नाही’

सिलिंडरचा स्फोट होत नाही, तोपर्यंत अग्निशमन विभाग काम करू शकतो. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या हाताबाहेर परिस्थिती जाते. सिलिंडरच्या स्फोटाची दाहकता खूप मोठी असते.

एमपीसी न्यूज (श्रीपाद शिंदे) – गॅस वापरताना झालेल्या नकळत चुका देखील मोठी हानी करून जातात. ही हानी कधीही भरून निघणारी नसते. त्यामुळे गॅस सिलिंडर वापरताना अत्युच्च काळजी घेणे गरजेचे आहे. गॅसच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा जीवावर बेतू शकतो. तिथे चुकीला माफी नाही. असे पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाचे प्रमुख अधिकारी किरण गावडे म्हणाले. गॅस गळती होऊन किंवा अन्य प्रकारे होणा-या घटनांच्या अनुषंगाने ‘एमपीसी न्यूज’ने किरण गावडे यांची मुलाखत घेतली.

प्रश्न: गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे; असा जेव्हा कॉल येतो, तेव्हा अग्निशमन विभागाची तयारी कशी असते ?

उत्तर: काही प्रमाणात प्राथमिक तयारी केली जाते. प्रथम हे जाणून घेतलं जातं की, गॅस गळती कुठे आणि कशी झाली आहे. उंच इमारतीच्या वरच्या भागात लागली असेल तर तिथे जाण्याची व्यवस्था आहे का, नसेल तर शिडी किंवा अन्य साधने घेतली जातात. शक्यतो ती सर्व साधने सोबत असतातच. त्यामुळे वेगळी मोठी काही तयारी करावी लागत नाही.

प्रश्न: गॅस गळती होऊन आग लागल्यास ती विझविण्यासाठी काय काळजी घेतली जाते ?

उत्तर: गॅसचा वॉल्व्ह चालू राहिला असेल. ट्यूब फाटली असेल तर वॉल्व्ह बंद केला जातो. वॉल्व्हमध्येच आग लागली असेल तर सिलिंडरवर पाणी मारून सिलिंडर थंड करतो. आगीची दाहकता कमी असेल तर ओल्या बारदानाने झाकून आग विझविली जाते आणि सिलिंडर मोकळ्या जागेत आणून ठेवला जातो.

आग मोठी असेल तर प्रथम बाहेरची आग पाणी मारून विझविली जाते. आग पूर्ण विझल्यानंतर आत जाऊन सिलिंडरची परिस्थिती पाहून त्यावर उपाय केला जातो.

प्रश्न: अनेक वेळेला आग वेगळ्याच कारणांमुळे लागलेली असते पण आगीच्या ठिकाणी सिलिंडर असतात, अशा वेळी काय केलं जातं ?

उत्तर: हो, अनेक वेळेला असं घडतं. आग वेगळ्याच कारणांमुळे लागलेली असते. पण आगीच्या ठिकाणी सिलिंडर असतात. अशा वेळेला जवान आग विझवितानाच सिलिंडर दुस-या मार्गाने बाहेर काढतात. सिलिंडर सुरक्षित ठिकाणी ठेऊन नंतर पुढील आग विझविता येते.

प्रश्न: काही घटनांमध्ये सिलिंडरचा स्फोट होतो, ती परिस्थिती कशी हाताळली जाते ?

उत्तर: आग लागल्यानंतर जवान प्रथम आगीच्या ठिकाणी सिलिंडर आहेत, नाहीत याची खात्री करतात. कारण सिलिंडरचा स्फोट होत नाही, तोपर्यंत अग्निशमन विभाग काम करू शकतो. सिलिंडरचा स्फोट झाल्यानंतर अग्निशमन विभागाच्या हाताबाहेर परिस्थिती जाते. सिलिंडरच्या स्फोटाची दाहकता खूप मोठी असते. यामध्ये अग्निशमन विभागाच्या जवानांना देखील मोठी जोखीम पत्करावी लागते.

बंदिस्त जागेत स्फोट झाला तर काही वेळेत आगीचे लोळ कमी होतात. पण त्यात जर नागरिक, अग्निशमन विभागाचे जवान सापडले तर ते भाजण्याची दाट शक्यता असते. अशा वेळेला त्या जागेत थंडावा करून सिलिंडर बाहेर काढला जातो. उघड्या जागेत जेव्हा स्फोट होतो, तेव्हा ती आग पसरण्यास सिलिंडरच्या स्फोटामुळे मदत होते.

प्रश्न: गॅसच्या संबंधित घडणा-या आगीच्या घटनांचे स्वरूप कसे असते ?

उत्तर: अलीकडच्या काळात गॅसच्या संबंधित घटना अशा घडत आहेत की, गॅस सिलिंडर काही कारणांमुळे लिकेज राहिला, तो बंदिस्त एरियामध्ये लिकेज झाला आणि त्याचे व्यवस्थित व्हेंटिलेशन होऊ शकले नाही. त्यानंतर शेगडी, काडीपेटी पेटवल्यामुळे किंवा लाईटचे बटन सुरु केल्याने आग लागते.

त्याचा भडका होतो. पण त्यामुळे मोठी आग लागत नाही. मात्र स्फोटाची दाहकता मोठी असते. या दाहकतेत सापडणारा व्यक्ती भाजून निघतो, त्यात त्याचा मृत्यूही होऊ शकतो. हा मृत्यू भाजूनच होईल असे नाही. तर स्फोटाच्या दाहकतेमुळे भिंत अंगावर पडेल, अन्य काही अंगावर पडेल यामध्ये देखील मृत्यू होऊ शकतो. पण आगीत भाजून मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे.

प्रश्न: घटनास्थळावरील नागरिकांचे कसे सहकार्य होते ?

उत्तर: घटनास्थळावरील नेमकी परिस्थिती आम्हाला तिथे गेल्यागेल्या माहिती नसते. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना स्पष्ट आणि नेमकी माहिती देणे गरजेचे असते. आगीच्या ठिकाणी गॅस सिलिंडर आहेत का, असतील तर किती आहेत. कुठे आहेत ? अशी मुख्य माहिती मिळाली तरी मोठी मदत होते. नागरिक मदत करण्याचा प्रयत्न करतात.

ज्यांनी आम्हाला फोन करून प्रथम घटनेची माहिती दिली आहे, त्यांना आम्ही फोनवर काही बाबी समजावून सांगतो. गॅस सिलिंडर असेल तर बाहेर काढा. लाईट सुरु असतील तर बंद करा. त्यानुसार नागरिक ती खबरदारी घेतात.

आतापर्यंतच्या अनुभवानुसार 95 टक्के घटनांमध्ये स्थानिकांकडून माहिती मिळाली आहे. अनेक घटनांमध्ये आम्ही केलेल्या सूचनेनुसार नागरिक, कार्यकर्ते आतमध्ये जाऊन गॅस सिलिंडर बाहेर काढून ठेवतात.

प्रश्न: स्थानिकांकडून जवानांना मिसगाईड केलं जातं का ?

उत्तर: जाणीवपूर्वक कोणी मिसगाईड करत नाही. पण मिसगाईड होण्याची रिस्क आहे. कारण दुकानवजा ठिकाणी, गादीचे कारखाने, फॅब्रिकेशन दुकाने, भंगारची गोदामे यांच्या ठिकाणी माहिती द्यायला शक्यतो कोणी सापडत नाही. मालक जागेवर नसतो आणि आजूबाजूच्या लोकांना आतली माहिती नसते. तिथे अडचण येते.

कासारवाडी येथे आयसीसी कंपनीत लागलेल्या आगीत आतमध्ये गॅस सिलिंडर होते. तिथल्या सुरक्षा रक्षकांना त्याची माहिती नव्हती. कारण सुरक्षा रक्षक आत कधी जातच नव्हते. त्यांनी आम्हाला गॅस सिलिंडरची माहिती दिलीच नाही.

त्यामुळे स्थानिक व्यक्तीला कमी माहिती असल्याने अनकेदा रिस्क घ्यावी लागते. रहिवासी भागात अशी अडचण येत नाही. कारण लोकांना एकमेकांच्या घरी किती गॅस सिलिंडर आहेत. ते कुठे ठेवतात, याबाबत माहिती असते. त्याचा उपयोग होतो.

प्रश्न: अन्य आग आणि गॅस सिलिंडरच्या आगीत कोणता फरक आहे ?

उत्तर: निश्चित यात फरक आहे. गॅस सिलिंडरच्या आगी प्रचंड धोकादायक आहेत. तिथे थेट स्फोट होण्याची भीती असते. इतर आगींमध्ये स्फोट होत नाही. अन्य आग पसरतात, वाढतात पण त्यात स्फोट होत नाही. हा स्फोट केवळ एलपीजी गॅस सिलिंडरमुळेच होतो असे नाही, तर ऑक्सिजन, नायट्रोजन, अॅसिडील या कोणत्याही गॅस सिलिंडरमुळे होऊ शकतो.

स्फोटासाठी पेटणाराच गॅस पाहिजे असे नाही. तर जे प्रेशरने भरलेले गॅस आहेत, त्या सर्वांच्या बाबतीत हा धोका आहे. गॅस सिलिंडरच्या आगी अन्य आगींच्या तुलनेत चार पट धोकादायक असतात.

प्रश्न: एकापेक्षा अधिक गॅस सिलिंडर वापरणं कितपत योग्य आहे ?

उत्तर: गॅस सिलिंडर हा जिवंत बॉम्ब आहे. पूर्वी गॅस सिलिंडर जास्त मिळत नव्हते. त्यामुळे नागरिक त्याचा जास्त वापर करत नव्हते. पण आता गॅस सिलिंडर सहज मिळत आहेत. त्यामुळे सामान्यतः प्रत्येक घरात दोन गॅस सिलिंडर असतातच.

अनेक घरांमध्ये तर तीन ते चार सुद्धा गॅस सिलिंडर असतात. हे चार सिलिंडर म्हणजे घरात चार बॉम्ब आहेत. ही बाब खूप धोकादायक आहे. जास्तीत जास्त एक सिलिंडर स्पेअर म्हणून ठेवावा. जास्त सिलिंडर घरात ठेवणं धोकादायक आहे.

प्रश्न: गॅस सिलिंडरची आग टाळण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यायला हवी ?

उत्तर: जास्त गॅस सिलिंडर घरात ठेऊ नये. एक वापरातला आणि एक स्पेअर असे जास्तीत जास्त दोन सिलिंडर ठेवावेत. जो स्पेअर सिलिंडर आहे, तो वापरातल्या सिलिंडरपासून दूर, बाल्कनीमध्ये किंवा पटकन बाहेर काढता येईल, अशा ठिकाणी ठेवावा. जिथे पेटणा-या वस्तू, कचरा आहे, अशा ठिकाणी सिलिंडर ठेऊ नये.

जो गॅस सिलिंडर वापरात आहे, तो सुरक्षितपणे वापरावा. गॅस शेगडीचे बटन सुरु राहणार नाही, याची काळजी घ्यावी. ट्यूब, रेग्युलेटर फाटलेला असेल तर सिलिंडर वापरणे धोकादायक आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी एक घटना घडली. त्यामध्ये त्या कुटुंबातील लोक सिलिंडरच्या फाटलेल्या ट्यूबला चिकटटेप लाऊन वापरत होते. त्यामुळे तिथे गॅस लिकेज होऊन आग लागली. हा जीवाशी केलेला खेळ आहे. अशी रिस्क घेतली तर त्याचं उत्तर खतरनाकच असणार आहे.

बनावट रेग्युलेटर वापरू नये. बेकायदेशीररीत्या रिफील केलेले सिलिंडर वापरू नये. कंपनीचे देखील सिलिंडर लिकेज असू शकतात. ते सिलिंडर वेळीच बदलून घ्या. वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला तर अडचण येऊ शकते.

सर्वात उत्तम उपाय असा की, किचन ओट्याजवळ गॅस साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. गॅस बाहेर पडण्यासाठी, त्याचे व्हेंटिलेशन होण्यासाठी योग्य खबरदारी घेतली तरी मोठा धोका टळतो. दिघी येथील घटनेत गॅस आतमध्ये साचून राहिला. त्यामुळे त्याचा स्फोट झाला. गॅस बाहेर जाण्यासाठी जागा असती, तर ही घटना घडली नाही. जरी घडली असती तरी त्याची दाहकता तेवढी निश्चित वाढली नसती.

प्रश्न: व्यावसायिक ठिकाणी वापरल्या जाणा-या गॅस बाबत कशी काळजी घ्यावी ?

उत्तर : बहुतांश व्यवसायांमध्ये गॅस सिलिंडर वापरला जातो. त्यात धोकादायक ठिकाणी एखादा गॅस वापरला तर ठीक आहे. पण अनेक गॅस सिलिंडर वापरले तर त्याचा धोका आणखी वाढतो. व्यवसायाच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल गॅस वापरणे आवश्यक आहे.

अनेक भाडेकरू रिफील केले जाणारे सिलिंडर घेऊन वापरतात. ते चुकीचं आणि धोकादायक आहे.

प्रश्न: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे ?

उत्तर: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला संसाधनांच्या बाबतीत कोणतीही अडचण नाही. पण मनुष्यबळाच्या बाबतीत काही अडचणी आहेत.

प्रश्न: गॅस सिलिंडरच्या आगी टाळण्यासाठी नवीन संसाधनांचा वापर करता येईल का ?

उत्तर: हो, निश्चित करता येईल. सध्या बाजारात एलपीजी गॅस डिटेक्टर नावाचं डिव्हाइस मिळतं. त्याचा उपयोग करण्यास हरकत नाही. घरात गॅस लिक झाला, तर ते डिव्हाइस गॅस सेन्स करतो आणि तुम्हाला बीप सिग्नल देतो. काही डिटेक्टर यूएसबी बेस आहेत. म्हणजे घरात लिक होणारा गॅस तुम्हाला तुमच्या मोबाइल फोनवर समजू शकते. त्यामुळे मोठा धोका टाळण्यासाठी वेळीच योग्य उपाय करता येऊ शकतो.

प्रश्न: नागरिकांना काय आवाहन कराल ?

उत्तर : गॅस हे अतिशय धोकादायक आहे. याच्या बाबतीत निष्काळजीपणा करू नका. विनाकारण जास्त सिलिंडर ठेऊ नका. सिलिंडर वापरताना अत्युच्च काळजी घ्या. गॅस लिक होणार नाही, गॅस साचून राहणार नाही. त्याचे व्हेंटिलेशन होईल, याची काळजी घ्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.