Interview with Dr. Bharat Sarode : चिंता व नैराश्य टाळण्यासाठी विचार बदलणे गरजेचे, परिस्थिती नंतर बदलते – डॉ. भरत सरोदे

सध्या बेरोजगारी, आर्थिक अडचण या समस्या देखील आहेतच. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की परिस्थितीचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. कोरोना संकट एकट्या दुकट्याचं नसून सर्वव्यापक आहे.

एमपीसी न्यूज (प्रमोद यादव) – कोणत्याही प्रकारची चिंता, नैराश्य यामधून बाहेर पडण्यासाठी ‘विचार बदलणे गरजेचे आहे परिस्थिती नंतर बदलते’ विचार बदलला तर त्याचा सकारात्मक फायदा तुम्हाला होतो असं मत मनोविकार तज्ज्ञ डॉ. भरत सरोदे यांनी ‘एमपीसी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव सर्व जगात थैमान घालत आहे. कोरोनाबाधित रुग्ण संख्येच्या जागतिक क्रमवारीत भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. एकीकडे कोरोना संसर्गाविरुद्ध लढाई सुरू आहे त्याचवेळी मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधित विविध समस्यांनी देखील डोकं वर काढले आहे. अनेकांना नैराश्य, चिंता, ताणतणाव, आत्महत्या प्रवृत्ती तसेच इतर नकारात्मक विचार व मानसिक समस्यांनी ग्रासलं आहे. डॉ. भरत सरोदे यांनी अशा निवडक प्रश्नांची उत्तर दिली आहेत.

डॉ. भरत सरोदे हे मागील 25 वर्षांपासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड याठिकाणी कार्यरत असलेले अनुभवी मनोविकार तज्ज्ञ आहेत. त्यांच्याशी साधलेला प्रश्नोत्तर स्वरूपातील संवाद…

प्रश्न : कोरोना आणि त्यानंतर सुरू झालेला लॉकडाऊन यामुळे आलेल्या नैराश्य, चिंता व ताणतणाव यांचा सामना नागरिकांनी कसा करावा?

उत्तर – कोरोनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे साहजीकच त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्याला तर कोरोनाची लागण होणार नाही ना, याची चिंता वाढली आहे. तसेच, बेरोजगारी, आर्थिक अडचण या समस्या देखील आहेतच. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की परिस्थितीचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे.

कोरोना संकट एकट्या दुकट्याचं नसून सर्वव्यापक आहे. त्यामुळे सगळ्यांसाठीच ही समस्या आहे हे लक्षात आल्यानंतर एकटेपणाची भावना काही प्रमाणात कमी होते. दुसरी गोष्ट म्हणजे आजुबाजुला आपल्याला मदत करणारे लोक असतात ती मदत आपल्याला मागता आली पाहिजे, मदत मागण्यासाठी घाबरले नाही पाहिजे.

लॉकडाऊनमुळे थेट संपर्क, गाठीभेटी बंद झाल्या त्यामुळे एकटेपणा आणखी वाढला पण फोन, व्हिडिओ कॉल यांच्या माध्यमातून आपल्या जवळच्या लोकांच्या संपर्कात राहिले पाहिजे, आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत. छंद जोपासणे, फार पुढचा व नकारात्मक विचार न करता सर्व ठिक होईल, अशी आशादायी भावना बाळगली पाहिजे.

प्रश्न : दिवसेंदिवस बाहेरची परिस्थिती बदलत आहे, बेरोजगारी, आर्थिक अडचण व इतर समस्या यांच्या मुळे येणाऱ्या नकारात्मक विचारांवर मात कशी करावी?

उत्तर – याआधी सांगितल्या प्रमाणे जी परिस्थिती आता बदलता येऊ शकत नाही ती स्वीकारण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. सध्या जी आर्थिक समस्या भेडसावत आहे त्याबाबत चिंता करत न बसता त्यावर तोडगा कसा काढता येईल, याचा विचार करावा लागेल. कोणतेही काम करण्याची तयारी ठेवावी लागेल सुरुवातीला थोडा कमी मोबदला मिळेल पण ही परिस्थिती देखील बदलेल, हा विश्वास बाळगला पाहिजे.

आपण आजकाल ज्या भरमसाठ अपेक्षा बाळगतो त्या कमी केल्या पाहिजेत. परिस्थितीचा स्वीकार करून ती सुधारण्यासाठी निराश न होता प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी सुरुवातीला कमी मोबदला मिळाला तरी चालेल पण मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवावी लागेल.

प्रश्न : आत्महत्येची प्रवृत्ती (सुसायडल टेंन्डसी) याचं प्रमाण अलीकडे खूप वाढलं आहे. यापाठीमागे नेमकं काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं, आत्महत्येच्या विचारांपासून स्वत:ला कसं परावृत्त करावं?

उत्तर – आत्महत्या हे एक तीव्र उदासीनतेचं लक्षण आहे. आता सर्व काही संपलं मला कुणाचीही मदत मिळू शकत नाही अशी समजूत करुन घेणं चुकीचं आहे. याबाबत कोणतीही गोष्ट ही शेवटची नसते प्रत्येक अडचणीत एक आशेचा किरण दिसत असतो फक्त तो शोधावा लागतो आणि यासाठीच मदत मागायची असते. ही बाब लक्षात घेणं गरजेचं आहे.

समजा दहा ठिकाणी तुम्हाला मदत नाही मिळाली तर अकराव्या ठिकाणी नक्की तुम्हाला मदत मिळते. आत्महत्येचा विचार मनात येण्याअगोदर जी समस्या भेडसावत आहे ती सोडवण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध असतात त्या पर्यायांचा विचार करायला हवा. आपल्याला मार्ग सापडत नसेल तर इतरांची मदत घ्यावी मात्र, पूर्णपणे निगेटिव्ह होऊन आता सगळं काही संपलं आहे म्हणून टोकाचा निर्णय घेऊ नये.

आत्महत्या ही पूर्णपणे टाळता येणारी गोष्ट आहे. कोणत्याही नैराश्य, चिंता यामधून बाहेर पडण्यासाठी ‘विचार बदलणे गरजेचे आहे परिस्थिती नंतर बदलते’ विचार बदलला तर त्याचा सकारात्मक फायदा तुम्हाला होतो. थोडक्यात आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल न उचलता आपली समस्या बोलून दाखवली पाहिजे त्यासाठी काही ना काही मार्ग नक्कीच मिळतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.

प्रश्न : ब-याच वेळा आपल्याला मन मोकळं करायचं असतं किंवा कुणाशीही संवाद साधायचा असतो पण कुणाशी बोलावं ते कळतं नाही किंवा कुणीच आजुबाजुला नसतं, अशावेळी काय करावं, विचार व भावनांना वाट मोकळी करून कशी द्यायची?

उत्तर – सोशल सर्कल किंवा मित्र परिवार कमी असणाऱ्या तसेच एकटं राहण्याची सवय असलेल्या लोकांत नैराश्यासारख्या समस्या दिसतात. मात्र, ज्यावेळी कुणीही आजुबाजुला बोलण्यासाठी नाही असं वाटतं तेव्हा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता, तसेच आजकाल ऑनलाईन काऊन्सिलींग उपलब्ध आहे. किंवा जवळचा मित्र असेल कुटुंबांतील कुणी ज्येष्ठ मंडळी असतील यांच्याशी संवाद साधला पाहिजे.

सरकारी तसेच खासगी मोफत समुदेशन हेल्पलाईन सेवा आहेत त्यांची मदत घेता येते. सुसाईड प्रिव्हेशन हेल्पलाईन आहे, काही समाजसेवी संस्था आहेत त्या मदत करतात फोन करून तुमची समस्या अथवा अन्य काही कारण असेल ते सांगून त्यांचा सल्ला तुम्ही मिळवू शकता.

प्रश्न : अतिविचार आणि त्यामुळे निर्माण होणारी चिंता या गोष्टीवर नियंत्रण कसे मिळवावे?

उत्तर – यावर काही अंशी मनाने नियंत्रण करता येते पण जेव्हा खरंच गोष्ट आटोक्याबाहेर जाते, ज्याला नॉर्मल आणि अबनार्मल म्हणतात, नॉर्मल म्हणजे आपल्याला स्वत:ही त्यांच्यावर नियंत्रण करता येते किंवा थोडीशी मदत घेऊन करता येते. अबनार्मल म्हणजे जिथं मानसशास्त्र संबंधित काही बदल असतात त्याठिकाणी औषधोपचारांचा फायदा होतो.

सामान्यपणे जर अतिविचार यावर नियंत्रण मिळवायचं असेल तर त्यासाठी दिवसाचे नियोजन करणं, दररोज व्यायाम करणे, ध्यानधारणा करणं, आपले आप्तस्वकीय आहेत त्यांच्याशी संवाद साधणं एका वेळी एकाच दिवसाचा विचार करणं उद्या काय होईल याची चिंता न करणे यामुळे ब-याच अंशी अतिविचारावर नियंत्रण मिळवता येत. आजच्या दिवशी फक्त आजचा विचार करणे आणि मेडिटेशन याचा अतिविचारवर नियंत्रण मिळवण्यासाठी फायदा होतो.

प्रश्न : मनःशांती आणि राग, संतापावर नियंत्रण मिळवण्यासाठी आध्यात्म अथवा श्रद्धेचा खरंच फायदा होतो का? होतो तर कसा?

उत्तर – हो निश्चित फायदा होतो, महाराष्ट्र ही साधूसंतांची भूमी आहे. कीर्तन, भजन, पारायण किंवा ज्या आषाढी, कार्तिकी वारी असतात हा एक ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चाच प्रकार आहे. आध्यात्माचा नक्कीच फायदा होतो मात्र, यामध्ये अंधश्रद्धा व बुवाबाजीसारख्या प्रकारात पडून आपलं नुकसान करून घेण्यात काही अर्थ नाही. याव्यतिरिक्त जे खरंच मानसिक समाधान देणारे काही आध्यात्मिक कार्यक्रम असतात, काही ॲक्टिव्हिटी असतात त्यांचा नक्कीच फायदा होतो.

प्रश्न : काही लोक नास्तिक (देवाला न मानणारे) असतात त्यांना काय सल्ला द्याल?

उत्तर – आस्तिक आणि नास्तिक हा एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. पण नास्तिक हे सुद्धा काही प्रमाणात आस्तिकच असतात म्हणजे त्यांची ‘देव नाही’ या गोष्टीवर श्रद्धा असते. म्हणजे ते ही श्रद्धाळूच असतात पण त्यांच्या श्रद्धा वेगळ्या असतात. प्रत्येक धर्मातील एका सर्वोच्च शक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि जेव्हा आपल्या हातात काही नसतं तेव्हा त्या शक्तीवर आपण विश्वास ठेवून काम करतो.

जेव्हा आपण स्वीकार करतो की परिस्थिती बदलणार आहे आणि त्या गोष्टीला दुजोरा देणारं काहीतरी आपल्याला हवं असतं त्याच शक्तीला आपण देव मानतो. श्रद्धेचा फायदा होतो उदाहरणच द्यायचं झालं तर काही रुग्ण असतात जे ताण कमी करण्यासाठी भरमसाठ गोळ्या घेतात मात्र, आषाढी वारीला जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना एकही गोळी लागत नाही त्याकाळात त्यांचा स्ट्रेस कितीतरी कमी होतो म्हणजे श्रद्धा उपयोगी पडतेच ना !

प्रश्न : सध्या सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन सुरु आहे, पण यामुळे मुलं मोबाईलचा जास्त वापर करतात. सोशल मीडिया आणि गेम यामध्ये जास्त वेळ घालवतात यामुळे मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? मुलांना आणि पालकांना काय सल्ला द्याल?

उत्तर – मुलांना लहान वयात मोबाईल दिला की ते गेम, सोशल मीडिया याला ॲडिक्ट होण्याची मोठी शक्यता असते, त्यांचा स्क्रिन टाईम वाढतो. सतत मोबाईलच्या वापरामुळे चिंता, उदासीनता, चिडचिडेपणा याचे प्रमाण मुलांमध्ये ब-यापैकी वाढत आहे. अलिकडे शिक्षणासाठी त्याचा जास्त वापर केला जातो ती एक सकारात्मक गोष्ट आहे पण जर ते दुसऱ्या गोष्टींच्या आहारी गेले तर त्याचा विपरीत परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.

मोबाईलचा मर्यादित वापर हाच त्याच्यावर उपाय आहे. याबाबत पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुलांच्या ऑनलाईन क्लासेस व्यतिरिक्त त्यांना मोबाईल वापरण्यास देऊ नये.कामापुरता वापर हा त्याच्यावर पर्याय आहे.

प्रश्न : सायबर विभागाच्या आकडेवारीनुसार पॉर्नोग्राफी (विशेषतः चाईल्ड) पाहण्याचे प्रमाण अधिक वाढलं आहे, पॉर्नोग्राफी ॲडिक्शन पासून दूर कसं रहावं आणि ॲडिक्शन झाल्यास त्यातून मुक्त कसं व्हावं?

उत्तर – कोणत्याही ॲडिक्शन मधून बाहेर येण्यासाठी सर्वप्रथम त्याच्यावर बंधनं घालणं गरजेचं आहे. ज्यावेळी तुमच्या लक्षात येते की आपण याच्या आहारी चाललो आहोत त्या क्षणी ते बंद करणं आवश्यक आहे. लहान मुलांना (16 वर्षाच्या आतील) मोबाईल वापरण्यास दिला तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे, अभ्यास किंवा क्लास झाला की लगेच मोबाईल काढून घेणे हा घरात नियमच करावा लागेल.

प्रश्न : मानसिक आरोग्य, आजार आणि त्यासंबंधी जनजागृतीसाठी सरकारी यंत्रणा कमी पडतात असं वाटतं का तुम्हाला?

उत्तर – हो, कारण, शारीरिक आजार असेल तर आपण लगेच रुग्णालयात जातो डॉक्टरांचा सल्ला घेतो. पण मानसिक आजाराबाबत तेवढी जनजागृती अजूनही नाही. काहींना तर मानसिक आजार आहे हेच मान्य नसतं. मानसिक आजार म्हणजे वेडच असा समज होतो. शासनाने याबाबत जनजागृती करणं अपेक्षित आहे. तसं पाहिलं तर आता ब-यापैकी अवेअरनेस आला आहे.

सुरूवातीला जिथं कुठेतरी एखाददुसरा मनोविकार तज्ज्ञ पहायला मिळत असे आता ते तालुकास्तरावर देखील आहेत. विविध माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचत आहे. लोक स्वत:हून उपचारासाठी येत आहेत ही सकारात्मक बाब आहे त्यामुळे हळूहळू जनजागृती होत आहे.

प्रश्न : मानसिक आरोग्य आणि त्यासंबंधी काळजी घेण्यासाठी सर्वांना काय आवाहन कराल?

उत्तर – कोणतीही परिस्थिती असो तिचा स्वीकार करणं फार गरजेचं आहे. चिंता व ताण न घेता सकारात्मक विचार करून कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढता येतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे. अतिविचार करून जास्त चिंता करून ताणतणावात राहण्यात काहीच अर्थ नाही.

कोरोना परिस्थिती गंभीर असली तरी सर्व जण त्यावर तोडगा काढण्यासाठी झटत आहेत. यापासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्या मात्र, काळजी करत बसू नका. सकारात्मक विचार करा व सर्व नियमांचे पालन करा. कोणतीही परिस्थिती कायमस्वरुपी नसते हे लक्षात ठेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.