Interview With Ramswarup Haritwal : अपुरी साधन सामुग्री, कमी मनुष्यबळ; कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज – रामस्वरूप हरितवाल

कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे

एमपीसी न्यूज (गोविंद बर्गे) : देशातील 62 कॅन्टोमेन्ट बोर्डांपैकी सर्वात गरीब कॅन्टोमेन्ट बोर्ड अशी देहूरोड कॅन्टोन्मेंटची परिस्थिती. मार्च महिन्यात कॅन्टोन्मेंट कर्मचाऱ्यांचे वेतन कसे करायचे हा मोठा प्रश्न होता. त्याचवेळी कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण देश लॉकडाऊन झाला. अशा भयानक परिस्थितीत स्थानिक आमदार, सर्व बोर्ड सदस्य आणि बोर्डाचे वैद्यकीय पथक, कर्मचारी यांच्या सहकार्याने पुणे जिल्ह्यात कोरोनाविरुद्धच्या लढाईत समाधानकारक कामगिरी करणे शक्य झाले. त्यामुळेच आज  जिल्ह्यातील कोरोनाचा सर्वात कमी 2.69 टक्के इतका मृत्यूदर राखण्यात यश आले.

त्याचबरोबर कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही समाधानकारक आहे. मात्र,  अशा परिस्थितीतही काही मंडळी कॅन्टोन्मेंट बोर्डाची बदनामी करण्याची संधी शोधात असतात. त्यासाठी चुकीच्या बातम्या आणि अफवा परसविल्या जात आहेत. कोरोनाची लढाई जिंकण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळे कुणीही अफवांवर आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांनी केले आहे.

प्रश्न : कोरोनाचा सामना करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या?
उत्तर :  देशात मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला. त्यानंतर  सर्व बोर्ड सदस्य, बोर्डाचे डॉक्टर आणि  वैद्यकीय कर्मचारी यांच्या मदतीने  तसेच स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 67 लाखांचा निधी मिळाला. या निधीतून तातडीने एप्रिल महिन्यात महात्मा गांधी शाळेत 100 बेड्चे कोविड केअर सेंटर उभारले. त्यानंतर रुग्णवाढ होऊ लागल्याने पंडित जवाहरलाल नेहरु  मंगल कार्यालयात 50 बेड्चे संस्थात्मक विलगीकरण कक्ष उभारले. तसेच  बोर्डाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु केले जाईल.

प्रश्न : महात्मा गांधी कोविड केअर सेंटरची कामगिरी कशी आहे?
उत्तर : महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांवर चांगले उपचार केले जातात. इसिजी, एक्स-रे, ऑक्सिमीटरचीही सुविधा आहे.  ऑक्सिजन सिलेंडरसुद्धा उपलबध आहे. चहा, नाश्ता, दोन वेळचे दर्जेदार जेवणही पुरविले जाते.   दिवसातून तीन वेळा रुग्णांची तपासणी केली जाते.  त्यामुळे या सेंटरमध्ये उपचार घेणारा रुग्ण कोरोनामुक्त होऊनच घरी जातो. अपवादात्मक परिस्थितीत  रुग्णाला  अन्य रुग्णालयात पाठविले जाते.  सध्या दररोज 100 जणांची कोविड तपासणी करुन सॅम्पल घेतले जातात.

प्रश्न :   कोविड ट्रेसिंग व प्रतिबंधासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?
उत्तर :  कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी वॉर्डनिहाय पथकाची स्थापना केली आहे. त्यात एक नोडल ऑफिसर असून कार्यालयीन अधिकक्षक, स्थानिक बोर्ड सदस्य डॉक्टर, परिचारिका, आशा वर्कर, स्वयंसेवक यांचा समावेश आहे. या पथकाच्या माध्यमातून संबंधित वॉर्डातील कोरोना रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती गोळा केली जाते.  देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत सातही वॉर्डांमध्ये मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून वैद्यकीय पथक नागरिकांची तपासणी करतात.

सध्या दिवसाला 50 ते 60 नागिरकांची  तपासणी केली जाते. या व्हॅनमध्ये वैद्यकीय कर्मचारी व सॅनिटायझर, मास्क, औषधे आदी साहित्याचे  किट असते. त्याचबरोबर आशा वर्कर घरोघरी सर्वेक्षण करतात व  गरजेनुसार औषधांचे वाटप केले जाते. सध्या अँटजेन टेस्टचे 2000 किट उपलब्ध झाले आहेत.

प्रश्न : झोपडपट्यांमध्ये कोरोनाची काय परिस्थिती आहे?
उत्तर : सुरुवातीला झोपडपट्टी भागात कोरोनाचा शिरकाव झाला होता. तसेच रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत होती.  मात्र, आमच्या वैद्यकीय पथकाने केलेल्या योग्य नियोजनामुळे झोपडपट्टी भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.  सध्या गृहनिर्माण सोसायट्या आणि गावठाण भागात रुग्ण आढळून येत आहेत. सोसायट्यांमध्ये  होम आयसोलेशनची सुविधा उपलब्ध होत असल्याने तेथील बहुतांश रुग्णांना होम आयसोलेट केले जात आहे. त्यांना घरपोहोच औषध पुरवठा केला जात असून डॉक्टर आणि नर्स संबंधित रुग्णांच्या संपर्कात असतात.

प्रश्न : कोविडच्या लढाईसाठी पुरेसे डॉक्टर, परिचारिका, वैद्यकीय कर्मचारी आहेत का?
 उत्तर :  एप्रिल महीन्यात कोविड केअर सेंटर सुरु केले तेव्हा नेमलेले वैद्यकीय पथक सध्या कार्यरत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात फक्त चार कोरोना रुग्णांची नोंद  झाली आहे. जूनपासून हळूहळू रुग्णवाढ सुरु झाली. जुलैमध्ये 331 तर ऑगस्टमध्ये 841 रुग्ण सापडले. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकावर  प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे 5 एमबीबीएस डॉक्टरप्रत्येकी 5 जीएनएम नर्सेस, वॉर्डबॉय आणि आया यांची आवश्यकता आहे. त्यासाठी पाठपुरावाही सुरु आहे.

प्रश्न : कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आर्थिक परिस्थितीबाबत काय सांगाल?  
उत्तर :  मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांचे वेतन कसे अदा करायचे हा प्रश्न होता. त्यात कोरोनाचे संकट आल्यानंतर सर्व बोर्ड सदस्य, बोर्डाचे डॉक्टर आणि  वैद्यकीय कर्मचारी यांच्या मदतीने  तसेच स्थानिक आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी 67 लाखांचा निधी मिळाला. या निधीच्या जोरावर आतापर्यंत कामकाज सुरु आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे 1 कोटी 19 लाखांच्या मदतीची मागणी केली आहे. तीही लवकर  मिळेल, अशी अपेक्षा आहे.

प्रश्न : कोरोना लढाईत बोर्ड सदस्यांसह आमदार, खासदारांचे कितपत सहकार्य मिळते?
उत्तर : कोरोना लढाईमध्ये कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्व सदस्यांचे मनापासून सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच अपुरे मनुष्यबळ व साधन सामुग्री नसतानाही लढाई सुरूच आहे. स्थानिक आमदार आणि खासदार यांच्याकडूनही कायम मदत होत आहे. तेही सतत संपर्कात राहून मदत करीत असतात.

प्रश्न : देहूरोडकरांकडून काय  अपेक्षा आहेत?
उत्तर : देहूरोडच्या जनतेने कोरोनाच्या संकटात प्रशासनाला सहकार्य केले आहे. ते या पुढेही असेच राहू द्यावे. त्याचबरोबर कोरोनाला हरवण्यासाठी प्रत्येकाने प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करने गरजेचे आहे. प्रत्येकाने तोंडाला मास्क लावूनच घराबाहेर पडावे. सोशल डिस्टंसिंग, सॅनिटायझरचा वापर याचेही पालन करावे. सर्वात महत्त्वाचे कुणीही अफवा आणि चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये.

प्रश्न : कोरोना लढाईत कॅन्टोन्मेंट  बोर्डाच्या कामगिरीबाबत काय वाटते?
उत्तर :  कोरोनाचे संकट आल्यानंतर सुरुवातीला प्रचंड दडपण आले होते. मात्र, सर्वांच्या सहकार्याने या संकटाचा सामना केला आहे. करीत आहे. मावळ तालुक्यात कॅन्टोन्मेंट बोर्डाने सर्वात आधी शंबर बेड्चे कोरोना कोविड सेंटर उभारले. तसेच 50 बेड्चे संस्थात्मक विलगीकरण कक्ष आणि 30 बेड्चे डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर सुरु केले जाणार आहे. या सर्व यंत्रणेबाबत जिल्हाधिकारी आणि स्थानिक आमदार यांनी कॅन्टोन्मेन्टचे कौतुक केले आहे. त्यामुळे कोरोना संकटाच्या सामना करण्यासाठी नवी ऊर्जा मिळाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.