Interview with Santosh Patil : ‘पाणी वितरण, प्रक्रियेच्या क्षमतेत वाढ होण्याची आवश्यकता’

एमपीसी न्यूज – (गणेश यादव) पिंपरी-चिंचवड औद्योगिक, विकसित शहर आहे. चांगल्या पद्धतीने प्रशासकीय कामकाज असलेली महापालिका आहे. येथे काम करायला मिळाले ही मोठी संधी होती. नागरी संस्थेत काम करण्याचा अनुभव पुढील प्रशासकीय काळामध्ये निश्चितपणे उपयोगी होईल, असे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी सांगितले.

वायसीएमएचमधील ‘पीजी’ संस्थेची मान्यता, भरती प्रक्रिया आणि प्रत्यक्ष कामकाज चालू करण्यात हातभार लावता आला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. शहरात एक वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा आहे. भविष्यातील शहराची वाढ लक्षात घेता पाण्याच्या वितरण आणि प्रक्रियेच्या क्षमतेत लवकरात-लवकर वाढ होण्याची आवश्यकता असल्याचेही ते म्हणाले.

अप्पर जिल्हाधिकारी (गट-अ) संवर्गातील संतोष पाटील यांना राज्य सरकारने बढती दिली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेतून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (सामान्य ) या पदावर त्यांची नुकतीच बदली करण्यात आली आहे. पालिकेतील दोन वर्षांच्या कामगिरीबाबत ‘एमपीसी न्यूज’ने त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न: कोरोना काळातील कामकाजाचा अनुभव कसा होता?

उत्तर – कोरोना काळातील कामाचा अनुभव खूप वेगळा आणि आव्हानात्मक होता. कोणत्याही प्रशासकीय अधिका-याच्या कारकिर्दीमध्ये अपवादाने असे काम करायला मिळते. जवळपास 100 वर्षानंतर महामारी आली होती. हा वेगळा अनुभव असून खूप काही शिकवून जातो. अशा संकटात प्रशासकीय अधिकारी, त्यांची टीम जास्त क्षमतेने काम करते. इतरवेळी शक्य होत नाही असे काम महामारीत प्रशासन आणि जनतेने एकत्रितपणे केले. संकटाचा सामना केला. जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला ही चांगली गोष्ट आहे. आपण प्रत्येक संकटावर मात करु शकतो. संकट कितीही मोठे असले. तरी, प्रशासन आणि जनतेमध्ये संकटावर मात करुन मार्ग काढण्याची क्षमता आहे, हे निश्चितपणे यामध्यमातून लक्षात आले.

प्रश्न – तुमच्या कार्यकाळात सर्वात उत्कृष्ट काम कोणते झाले. असे तुम्हाला वाटते?

उत्तर – शहराच्या दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांमध्ये चांगले काम झाले आहे. विकास आराखड्यातीन नवीन रस्ते विकसित करण्यावर जोर दिला. यामुळे  समाविष्ट झालेल्या नवीन गावांच्या विकासाला हातभार लागला आहे. नवीन रहिवाशी भाग निर्माण झाल्याने शहरातील घरांची उपलब्धता वाढण्यास, दर नियंत्रणात राहण्यास मदत झाली. कमी किमतीत घर उपलब्ध झाल्याने बेकायदेशीर घर निर्मितीला आळा बसला.  पदव्युत्तर वैद्यकीय महाविद्यालय (पीजी) संस्था सुरु करणारी पिंपरी-चिंचवड एकमेव महापालिका आहे. महाविद्यालयाची मान्यता, भरती प्रक्रिया आणि आता प्रत्यक्ष कामकाज चालू झाले आहे. ही मोठी संस्था म्हणून नावारुपाला येणार असून ही समाधानाची बाब आहे. त्या कामात हातभार लावता आला ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.

प्रश्न – पालिकेतील दोन वर्षांच्या कामगिरीबाबत समाधानी आहात का?

उत्तर – पूर्ण अंशाने समाधान मानन्यासारखे नाही. काही कामे पूर्ण करता येतात असे नाही. परंतु, सर्वसाधारणपणे बोलायचे झाले. तर, समाधानी आहे.

प्रश्न – पहिल्यांदाच पुणे विभागात त्यात पिंपरी-चिंचवड  मध्ये काम केले. त्याचा उपयोग पुढील कारकिर्दीत होईल का?

उत्तर – हो, नक्कीच. कारण, मी राज्य सेवेतील अधिकारी असल्याने वेगवेगळ्या विभागात काम करण्याची संधी मिळत असते. भविष्यात भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नती मिळेल. त्यावेळी या अनुभवाचा निश्चितपणे फायदा होणार आहे. महाराष्ट्रात 50 टक्यांपेक्षा जास्त नागरीकरण झाले आहे. नागरी संस्थेत काम करण्याचा अनुभव पुढील प्रशासकीय काळामध्ये निश्चितपणे उपयोगी होणार आहे. पिंपरी-चिंचवड औद्योगिक, विकसित शहर आहे. चांगल्या पद्धतीने प्रशासकीय कामकाज असलेली महापालिका आहे. येथे काम करायला मिळाले ही मोठी संधी आहे. या अनुभवाचा फायदा सर्वच विभागात काम करताना होईल.

प्रश्न – शासकीय अधिका-यांची तीन वर्षांनंतर बदली होते. तुमची मुदतपूर्व बदली झाली. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – बदली मुदतपूर्व आहे असे म्हणता येणार नाही. शासनाने पदोन्नतीवर बदली केली आहे. पदोन्नती झाली नसती. तर, कदाचित बदली झाली नसती. पदोन्नतीनंतर सरकारने महसूल संर्वगातील सर्व अधिका-यांची सेवा मूळच्या विभागात वर्ग केली आहे. मूळ महसूल विभाग असल्याने त्या विभागात पदस्थापना केली आहे. पदोन्नतीवर बदली आहे. त्यामुळे त्याला मुदतपूर्व बदली म्हणता येणार नाही.

प्रश्न – शहरात आणखी कोणती विकास कामे करावीत. असे तुम्हाला वाटते?

उत्तर – शहराला चांगल्या नागरी सुविधा असणे आवश्यक आहे. रस्ते, पाणी, दिवाबत्तीची सोय, पूल अशा सुविधा गरजेच्या आहेत. मागील एक वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. भविष्यात आहे, त्या गतीने शहराची वाढ अपेक्षित धरली. किंवा यापेक्षा जास्त गतीने शहर वाढले. तर, पाण्याची वितरण, प्रक्रिया करणारी व्यवस्था पूरी पडण्याची शक्यता नाही. त्यासाठी वितरण, प्रक्रियेच्या क्षमतेत लवकरात-लवकर वाढ होण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काही अडचणी येणार नाहीत. महाराष्ट्रातील सर्वात गतीने वाढणारे पिंपरी-चिंचवड शहर आहे.

पर्यटन व्यावसायात वाढ होण्यासाठी काही प्रकल्प हाती घेणे गरजेचे आहे. ‘अॅम्युझमेंट’ पार्क सारखे मोठे प्रकल्प आले. तर, शहरात पर्यटन, रोजगार वाढण्यासाठी हातभार लागू शकेल. शहराचे अर्थकारण सुधारण्यात मदत होईल. तळवडेतील गायरान जागा नुकतीच महापालिकेकडे वर्ग झाली आहे. तिथे पश्चिम घाटाच्या धर्तीवर घाट किंवा डिअर पार्क विकसित करता येवू शकेल.

प्रश्न – शहरातील कामाचा अनुभव कसा होता. शहराने काय शिकविले?

उत्तर – शहरामध्ये काम करण्याचा अनुभव अतिशय वेगळा आणि चांगला होता. मोठ्या संकटात अतिशय चांगला प्रतिसाद देणारे हे शहर आहे. नागरिक सकारात्मक आहेत. चांगले काम करत असल्यास सकारात्मक प्रतिसाद मिळतो. चुका करणा-यांना जाणीव करुन देणारे हे शहर आहे. लोकप्रतिनिधी सकारात्मक, मदत करणारे आणि जागृत आहेत. अधिकारी, कर्मचा-यांचा संच चांगला आहे. त्यामुळे काम करण्यासाठी चांगले शहर आहे. शैक्षणिक, वैद्यकीय, नागरी सुविधा राज्यातील अनेक शहरांपेक्षा येथे चांगल्या आहेत. कायमस्वरुपी वास्तव्य करण्यासाठी योग्य शहर आहे.

औद्योगिक शहर असून  अनेक नागरिकांनी आपले मूळ गाव सोडून शहरात कामाला सुरुवात केली. आज ते अतिशय मोठ्या यशासह प्रस्थापित झाले आहेत. नेते, उद्योजक, शिक्षण संस्थाचालक झाले आहेत. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत असाल. तर, तुम्हाला आयुष्यात यश मिळाल्याशिवाय राहत नाही आणि अपयशाची काही शक्यता उरत नाही असे ही नगरी सांगते. प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करुन प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे. पुन्हा संधी मिळाली. तर शहरात नक्कीच काम करायला आवडेल. शहरातील पत्रकारही सहकार्य करणारे आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.