Interview With ShivSena City Chief Sachin Bhosale : ‘नव्या, जुन्यांच्या साथीने महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार’

एमपीसी न्यूज -( गणेश यादव ) :  आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी थेरगावातील नगरसेवक अॅड. सचिन भोसले यांची नियुक्ती झाली आहे. संघटना वाढ, निवडणुकीची तयारी याबाबत ‘एमपीसी न्यूज’ने त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न- शिवसैनिक ते शहरप्रमुख एवढी मोठी जबाबदारी कशी पेलवाल?

उत्तर – गेल्या चार वर्षांपासून मी महापालिका सभागृहात नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडत आहे. तळागाळात काम करतो. तळागाळात काम करणा-यांना शिवसेनेत पदे मिळतात. माझ्या कामाची दखल पक्षप्रमुखांनी घेतली. माझ्यावर विश्वास ठेवून मोठी जबाबदारी दिली आहे. शहर मोठे आहे. परंतु, पूर्ण शहराच्या कानाकोप-यात जाऊन संघटना वाढविण्याचे काम निश्चितपणे करेल. जबाबदारी चोखपणे पार पाडण्यासाठी प्रयत्नशिल राहील.

प्रश्न –  मागील सव्वाचार वर्षातील महापालिकेतील शिवसेनेची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. नऊ जणांचे नऊ दिशेने तोंडे आहेत. आता सभागृहात शहरप्रमुख म्हणून तुमचा आवाज घुमणार का?

उत्तर – मी यापूर्वीही संघटनेला अभिप्रेतच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सभागृहात मांडत राहिलो. भविष्यातही जनतेचे प्रश्न मांडत राहणार आहे. सत्ताधारी भाजपच्या चुकीच्या कामाला शिवसेनेचे सर्वच नगरसेवक कडाडून विरोध करतील. शहरप्रमुख म्हणून सुद्धा चुकीच्या कामांना तीव्र विरोध करणार आहे. चुकीच्या कामाविरोधात निश्चितपणे आवाज उठविणार आहे. जनहिताच्या कामांना विरोध केला जाणार नाही.

प्रश्न – संघटनेचा कसा विस्तार करणार?

उत्तर – शहरात संघटना मजबूत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु करायची आहे. सर्वांना एकत्र घेवून जोमाने काम करणार आहे. नवीन, जुने पदाधिकारी, नाराज शिवसैनिकांसोबत चर्चा करणार आहे. त्यांची नाराजी दूर केली जाईल. संघटनेत येणा-या नवीन कार्यकर्त्यांचे स्वागत केले जाईल. नव्या, जुन्या शिवसैनिकांना सोबत घेऊन संघटना बळकट करणार आहे. येणा-या काळात संघटनेची बांधणी मजबूतपणे केली जाणार आहे. नव्या, जुन्यांच्या साथीने महापालिका निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

प्रश्न – भोसरीतील पदाधिकारी शहरप्रमुखाला जुमानत नाहीत. असा मागच्या शहरप्रमुखाबाबतचा अनुभव आहे. त्याबाबत काय सांगाल?

उत्तर – जुमानत नाहीत असे म्हणता येणार नाही. भोसरी विधानसभेत शिवसेनेचे काही पदाधिकारी काम पाहतात. परंतु, शहरप्रमुखाला जुमानले नाही. या गोष्टी चुकीच्या आहेत. येणा-या काळात भोसरीत सुद्धा चांगल्या प्रकारची संघटना बांधणी झालेली दिसेल.

प्रश्न – शिवसेना गटा-तटात विभागली आहे. सगळे गट एकत्रित कसे आणणार?

उत्तर – गटा-तटात विभागले गेलेत. पण, कोणाचे मनभेद नाहीत. राजकारणात मतभेद असतात. कोणत्यातरी कारणांवरुन मतांमध्ये अंतर पडलेले असेल. पण, मी सर्वांना एकत्र आणण्याचा  100 टक्के प्रयत्न करणार आहे. कारण, मनभेद कोणाच्यात नाहीत. त्यामुळे सर्व एकत्र बसून मनभेद दूर करुन पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रश्न – गटनेते बदलण्याचे चालले आहे. त्याबाबत तुमची भुमिका काय आहे. तुमचा कोणाला पाठिंबा आहे?

उत्तर – गटनेत्यांनी राजीनामा दिला आहे. नवीन गटनेता नियुक्तीची प्रक्रिया सुरु होईल. गटनेत्याबाबतचा पक्षश्रेष्टी निर्णय घेतील. पक्ष जो निर्णय घेईल. तो निर्णय आम्हा सर्व नगरसेवकांना मान्य असणार आहे.

प्रश्न – खासदार श्रीरंग बारणे यांचे समर्थक मानले जात होतात. पण, राहुल कलाटे यांनी तुमची शिफारस केली. त्यामुळे तुमच्यावर कलाटे यांचा शिक्का बसल्याची चर्चा आहे?

उत्तर – असे म्हणता येणार नाही. शेवटी पक्ष निर्णय घेत असतो. याचा समर्थक, त्याचा समर्थक या गोष्टींवर मी विश्वास ठेवत नाही. कारण, पक्षावर माझा विश्वास आहे. शिवसैनिक म्हणून मी काम करत आहे. गटा-तटाच्या विषयावर मला जास्त बोलायचे नाही.

प्रश्न – महाविकास आघाडीत शहरप्रमुख म्हणून तुमची भुमिका महत्वाची राहणार आहे. जागा वाटपात कशी भुमिका घेणार?

उत्तर – राज्यात महाविकासआघाडी आहे. महापालिकेची आगामी निवडणूक महाविकास आघाडीत लढायची की स्वतंत्र लढायची. याबाबतचा निर्णय पक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील. त्यांच्या आदेशाचे आम्ही पालन करणार आहोत. पक्षाच्या आदेशानुसार आम्ही निडणूक लढविणार आहोत.

प्रश्न – तुम्ही किती नगरसेवक निवडून आणणार?

उत्तर –  शहराचा आढावा घेत आहे. आता महापालिकेत नऊ नगरसेवक आहेत. पण, आगामी महापालिका निवडणुकीत नक्कीच शिवसेनेचे मोठ्या संख्येने नगरसेवक असतील.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.