Interview with Sujit Dilip : ‘डिजीटल सर्कस’ची ही मोहमयी दुनिया, लॉकडाऊनवर शोधलेला एक अनोखा उपाय

एमपीसी न्यूज (स्मिता जोशी) – आजही ‘जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा’ हे गाणं कुठेही ऐकलं की आपल्याला लगेच आठवतो तो हातात लालभडक हृदय घेतलेला जोकरच्या वेषातील राज कपूर. सर्कसमधील आयुष्यावर आधारलेला ‘मेरा नाम जोकर’ हा एक माइलस्टोन चित्रपट होता. एका जोकरचे ते रंगीबेरंगी आत्मकथन होते. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यातील बालपणीच्या आठवणीत सर्कस हा एक अविभाज्य घटक आहे. मोठ्यामोठ्या झुल्यांवर लीलया, सराईतपणे झोके घेणारे ट्रॅपीज कलाकार, वेगवेगळ्या कसरती करणारे कलाकार, जोकर, विविध प्राण्यांच्या कसरती, जोरजोरात वाजणारे संगीत म्हणजे सर्कसची जादूमयी दुनिया.

मात्र कोरोनाच्या या काळात इतरांसारखी सर्कसच्या कलावंतांवर देखील उपासमारीची वेळ आली. मागील सहा महिन्यांपासून सर्कस पूर्णपणे ठप्प आहे.  पुन्हा कधी सुरु होणार याची काहीच कल्पना नाही. खरंतर मुलांना लागलेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे सर्कसच्या कलाकरांसाठी सुगीचे दिवस असतात. कारण नंतर येणा-या पावसाळ्यात सर्कस पूर्णपणे बंद असते. पण यंदा हा सीझन झालाच नाही. मार्चपासून सर्कसचा व्यवसाय बंदच आहे. एकीकडे कोरोनाचे संकट आणि दुसरीकडे काम नाही या कात्रीत हा व्यवसाय सापडला आणि लॉकडाऊनमध्ये तर कलाकारांनी आपापल्या घरी जाण्याचा मार्ग पत्करला.

रॅम्बो सर्कस ही पुण्यातील सर्कस. सुजीत दिलीप हे त्याचे मालक आणि सर्वेसर्वा. लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली सर्कस आकुर्डी येथील दिनेश शेट्टी यांच्या प्रॉडक्शन क्रू या कंपनीच्या सहकार्याने सुजीत यांनी आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर नव्याने सुरु केली आहे. शुक्रवार, 25 सप्टेंबर रोजी रॅम्बो सर्कसचे डिजीटल स्वरुपात पहिल्यांदाच खेळ रंगले. या लॉकडाऊनमध्ये सर्कस व्यवसायाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागले आणि त्यातून सर्कस कशी तरली, नवीन काळाशी सुसंगत कसे बदल घडवले गेले याविषयी सुजीत दिलीप यांच्याशी केलेली ही बातचित.

प्रश्न – रॅम्बो सर्कसची पार्श्वभूमी काय आहे ?
उत्तर – माझे वडील पी. टी दिलीप यांनी 26 जानेवारी 1991 रोजी रॅम्बो सर्कस सुरु केली. त्याआधी त्यांच्या एरिना सर्कस, ग्रेट ओरिएन्टल सर्कस आणि व्हिक्टोरिया सर्कस या तीन सर्कस होत्या. या तीनही सर्कसचे रुपांतर रॅम्बो या एकाच मोठ्या सर्कसमध्ये करण्यात आले. आम्ही भारतात आणि संपूर्ण जगात देखील रॅम्बो सर्कसचे खेळ करत आहोत. सुरुवातीपासूनच आम्ही काळाप्रमाणे सर्कसमध्ये बदल घडवत गेलो. सर्कसचे मुख्य आकर्षण असते ते म्हणजे त्याचा तंबू. आमचा खास बनवलेला वॉटर आणि फायरप्रूफ तंबू आहे.

प्रश्न – अचानकपणे आलेल्या लॉकडाऊनचा सर्कसवर काय परिणाम झाला ?
उत्तर – खरंतर लॉकडाऊनच्या थोड्याच दिवस आधी मी मॉस्कोला गेलो होतो. रशियामध्ये सर्कसची खूप मोठी परंपरा आहे. नवीन काय प्रकार आणता येतील याविषयी तेथे माहिती घेण्यासाठी मी गेलो होतो. पण तिथून आल्यानंतर आपल्याकडे लगेचच लॉकडाऊन सुरु झाला. आम्हाला याविषयी कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती. त्यामुळे आमची तयारी देखील नव्हती. माझ्याकडे सर्कसमध्ये काम करणारे कलाकार विविध राज्यांमधील आहेत. पश्चिम बंगाल, बिहार, ओरिसा, नागालँड, मणिपूर, आसाम येथील हे सर्व कलाकार आहेत. लॉकडाऊन जाहीर झाल्यावर हे सगळे आपापल्या घरी निघून गेले.

माझ्याकडे काम करणा-या शंभर लोकांपैकी सुमारे साठ लोक गावाला गेले. चाळीस लोक इथेच राहिले. पण सर्कस बंद असल्याने त्यांना काहीच काम नव्हते. साधारणपणे तीन महिने आम्ही सगळ्यांनीच कसेबसे काढले. मात्र हे तीन महिने कसोटी पाहणारे होते. आजवर असे नुसते बसून राहणे कधीच माहिती नव्हते.

प्रश्न – या लॉकडाऊनच्या काळात सर्कसच्या व्यवसायापुढे कोणत्या प्रकारची आव्हाने समोर ठाकली ?
उत्तर – सर्कसचा व्यवसायाचा मुख्य काळ असतो तो मुलांच्या शाळांना जेव्हा सुट्टी सुरु होते तेव्हा म्हणजे साधारणपणे एप्रिल, मे आणि जून महिन्याचे काही. पण यंदा कोरोनाच्या साथीमुळे मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि आमचा सगळा सीझनच वाया गेला. 24 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मार्चचे उरलेले दिवस, पूर्ण एप्रिल आणि मे महिना सर्कसचा एकही खेळ होऊ शकला नाही.

_MPC_DIR_MPU_II

आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे याची काहीच कल्पना नसल्याने आम्ही वेगळी अशी काहीच पूर्वतयारी केली नव्हती. शंभर माणसांचे कुटुंब सांभाळणे हे काही सोपे काम नाही. त्यामुळे सुरुवातीचा काळ सोडल्यानंतर आम्ही अक्षरश: आलेला दिवस ढकलत होतो. तो खूप त्रासदायक कालखंड होता. उद्या काय परिस्थिती असणार आहे याची आज काही कल्पना नव्हती.

प्रश्न – मग तुम्ही यातून मार्ग कसा काढलात ?
उत्तर – ‘रंग दे बसंती’फेम चित्रपट अभिनेता कुणाल कपूर याला कुणीतरी आमच्याविषयी सांगितले. त्याने काही संस्थांच्या मार्फत आम्हाला आर्थिक मदत केली. त्या जोरावर आम्ही तीन महिने कसेबसे काढले. जे लोक लॉकडाऊनच्या काळात गावाला गेले होते तेदेखील काही दिवसांनी परत आले. कारण त्यांना देखील तिथे त्यांच्या गावामध्ये राहणे मुष्किल झाले होते.

याच दरम्यान माझी आकुर्डी येथील दिनेश शेट्टी यांच्याशी अचानकपणे भेट झाली. त्यांची  प्रॉडक्शन क्रू नावाची कंपनी आहे. त्यांनी मला सर्कस डिजीटल स्वरुपात कशा पद्धतीने सुरु करता येईल याची माहिती दिली. त्यांनी त्यांच्या सहका-यांच्या साथीने यावर दोन – तीन महिने पूर्णपणे रिसर्च केला. स्टोरीलाइन सुचवली. आणि नुकतेच आम्ही डिजीटल सर्कसचे शो सुरु देखील केले.

खरंतर सर्कस हा बच्चेकंपनीचा आनंदाचा विषय आहे. पण सध्या झालंय काय की मुलांना शाळापण नाहीत. पण ते कुठे बाहेर जाऊ शकत नाहीत. आणि अगदी खरे तर मुले सहा महिने घरात राहून कंटाळली देखील आहेत. अशावेळी त्यांना बाहेर न जाता घरातच मनोरंजनचे काही साधन मिळाले तर उत्तम होईल असे वाटत होते. याचवेळी ही डिजीटल सर्कसची कल्पना समोर आली. आणि आम्ही त्यावर काम सुरु देखील केले. सध्या आमचे सगळे कलाकार नवी मुंबईतील ऐरोली येथे आहेत. ते तेथूनच शो सादर करतात.

प्रश्न – डिजीटल सर्कस म्हणजे काय ?
उत्तर – सध्या आपल्यावर असलेल्या अनेक निर्बंधांमुळे आपण तंबूत लाईव्ह सर्कस बघू शकत नाही. पण डिजीटल सर्कसमध्ये तुम्ही लाईव्ह सर्कस बघू शकता. आम्ही हे शो ‘बुक माय शो’ च्या माध्यमातून दाखवतो. शुक्रवारी दोन शो म्हणजे संध्याकाळी सहा आणि आठ वाजताचे असतात. तर शनिवार आणि रविवारी दुपारी चार, संध्याकाळी सहा आणि रात्री आठ वाजता असे तीन शो असतात.

यासाठी तुम्ही ‘बुक माय शो’ या साईटवर जायचे. पुढील सूचना तुम्हाला तिथे मिळतील. यासाठी तिकीटदर पण रिझनेबल ठेवले आहेत. म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी, कुटुंबासाठी आणि ग्रुपसाठी असे वेगवेगळे दर आहेत. सध्या आमची डिजीटल सर्कस वेगवेगळ्या देशांमधून देखील पाहिली जात आहे. अगदी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड येथून देखील प्रेक्षक या सर्कसचा आनंद घेत आहेत. हळूहळू हे सगळ्यांपर्यत पोहोचेल आणि आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे.

डिजीटली खेळ करणारी रॅम्बो ही भारतातील पहिली सर्कस आहे, हे मी अभिमानाने सांगू इच्छितो. आणि हा मान आपल्या पुण्याला मिळाला आहे आणि यात पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीच्या दिनेश शेट्टी यांचा मोलाचा सहभाग आहे.  भविष्यकाळात जेव्हा सर्कस सादर करण्याची परवानगी मिळेल तेव्हा तो तंबूमधील खराखुरा थरार प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्ही आतुर आहोतच, पण सध्याच्या या डिजीटल सर्कसच्या माध्यमातून देखील आम्हाला प्रेक्षकांचे मनोरंजन करता येत आहे याचा मनोमन आनंद आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1