Interview with Sunil Ghvane ‘शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्तीत सुटसुटीतपणा अन् विद्यापीठ उपकेंद्रासाठी प्रयत्न करणार’

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोन) महत्त्वाचा प्रश्न आहे. येणा-या काळात तो आणखी भेडसावत जाईल. शैक्षणिक कर्ज माफक दरात मिळाले पाहिजे. शिष्यवृत्तीत सुटसुटीतपणा असला पाहिजे. ‘डीबीटी’ योजनेत पारदर्शकपणा आणणे यासह राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात विद्यापीठ उपकेंद्रासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सरकारकडे पाठपुरवा करणार असल्याचे राष्ट्रवादीचे नवनियुक्त विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांनी सांगितले.

महाविद्यालयांकडून जीमखाना, इंटरनेट, ग्रंथालयासाठी शुल्क घेतले जाते. पण, विद्यार्थ्यांना त्या सुविधा मिळत नाहीत. त्याविरोधात मोठे आंदोलन उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर विद्यार्थी संघटनेची जबाबदारी सांभाळत असलेल्या सुनील गव्हाणे यांच्यावर राज्याची जबाबदारी आली आहे. पक्षाने नुकतीच त्यांची विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले, सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या गव्हाणे यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. त्यानिमित्त ‘एमपीसी न्यूज’चे राजकीय प्रतिनिधी गणेश यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न – पक्षाने राज्याची जबाबदारी दिली आहे. खूप मोठा विश्वास टाकला आहे. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर – पक्षाने मोठा विश्वास दाखविला आहे. मी पक्षाचा मनापासून आभारी आहे. कामाला आणि निष्ठेला महत्त्व असल्याचे पक्षाने अधोरेखित केले. माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना पक्षाने विचारांवर निष्ठा ठेवणारा आणि काम करणा-या कार्यकर्त्याला संधी दिली आहे.

प्रश्न – कामाची पुढील दिशा कशी असेल?
उत्तर – राज्यभरात संघटना बांधणी करणार आहे. संघटनेत बदल करणार आहे. गावपातळीपर्यंत लक्ष ठेवणार आहे. महाविद्यालयातील शाखांपर्यंत देखील लक्ष घालणार आहे. संघटनेची रचना बदलणार आहे. यापूर्वी तालुक्याची, तेथील महाविद्यालयांची जबाबदारी जिल्हाध्यक्षांकडे होती. आता महाविद्यालयासाठी शैक्षणिक आणि राजकीय वेगळी टीम करत आहोत.

इंजिनिअरिंग, सायन्स, वैद्यकीय विभागाचे वेगळे पदाधिकारी असणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी योग्य पद्धतीने मांडता येतील. त्या-त्या क्षेत्रातील पदाधिकारी अडचणी योग्य पद्धतीने समजून घेऊन सोडवतील. त्यासाठी हा बदल करत आहोत. राजकीय टीम पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या विद्यार्थी संघटनेची अशी रचना नाही. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आढावा घेत आहे. ज्या जिल्ह्यात संघटना कमकूवत आहे. तिथे नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. दहा जिल्ह्यात नवीन जिल्हाध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे.

प्रश्न – विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका घेतल्या जाव्यात का, तुमचे काय मत आहे?
उत्तर – निवडणुका घेतल्या जाव्यात, अशी राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्वीपासून ठाम भूमिका आहे. सहा वर्षांपूर्वी विद्यार्थी मागणी परिषदेत महाविद्यालयीन निवडणुका सुरु करण्याची आग्रही मागणी केली होती. तत्कालीन भाजप सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. पण, आता महाविकास आघाडीचे सरकार आहे. येणा-या काळात ही मागणी आग्रहाने करणार आहोत. तो विषय हाती घेतला जाईल.

प्रश्न – कोरोनामुळे यंदा प्रत्यक्ष शिक्षण अद्यापपर्यंत थांबले आहे. शैक्षणिक वर्ष कसे असेल, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. याबाबत काय सांगाल?
उत्तर – कोरोनामुळे यंदा शिक्षणाचे नियोजन कोलमडले आहे. परिस्थिती कठिण आहे. शाळा, महाविद्यालये प्रत्यक्षात सुरु नाहीत. पर्याय नसल्याने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु आहे. त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. रेंजची अडचण, ग्रामीण भागात बहुतांश विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाहीत. शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोबाईल देण्यासाठी पालकांना घरी थांबावे लागते. तांत्रिक, आर्थिक अडचणींचा डोंगर आहे. प्राप्त परिस्थितीत दुसरा पर्याय नाही.

शैक्षणिक शुल्काबाबतचा मोठा प्रश्न आहे. सर्वजण आर्थिक विंवचनेत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून ऑगस्टमध्ये राज्यभरात शुल्कनिधी अभियान राबविले होते. कोणतीही शुल्कवाढ यंदा करु नये. शुल्कामध्ये कपात करावी. शाळा, महाविद्यालये, पालकांनी एकत्रित बसून बैठक घ्यावी. निश्चित झालेले शुल्क टप्प्या-टप्प्यात आकारावे. शुल्कामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांना त्रास देवू नका, ऑनलाईन शिक्षण बंद करु नका, असे आवाहन केले होते.

विद्यार्थ्यांना अडचण आल्यास संघटनेच्या पदाधिका-यांनी मदत केली. शुल्कनिधीलाही चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक महाविद्यालयांनी आम्हाला प्रतिसाद देत. काही फी पुढीलवर्षी भरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली.

प्रश्न – प्रत्यक्ष शाळा सुरू नसताना, खासगी संस्थांकडून शुल्क वसूलीचा तगादा लावला जात आहे. त्याविरोधात आवाज उठविणार का?
उत्तर – शिक्षण शुल्कनिधीच्या माध्यमातून तो विषय घेतला होता. शुल्क भरण्याचा कोणीही तगादा लावू नये, असे शैक्षणिक संस्थांना आवाहन केले होते. त्यासाठी आता राज्यपातळीवर एक हेल्पलाईन नंबर चालू केला जाईल. कोणाचे लक्ष नसल्याचे समजून संस्थाचालक आक्रमक होऊन पालकांकडे शुल्क वसूलीचा तगादा लावताना दिसून येतात. शुल्क वाढ करु नका, डेव्हलपमेंट फी सरसकट माफ करण्याची मागणी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली आहे.

प्रश्न – विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न तुम्हाला महत्त्वाचे वाटतात. ते सुटणे आवश्यक आहे. सरकार तुमचे आहे. ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार का?
उत्तर – शैक्षणिक कर्जाचा (एज्युकेशन लोन) महत्त्वाचा प्रश्न आहे. येणा-या काळात तो आणखी भेडसावत जाईल. आर्थिक घडी विस्कटली असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचणी येणार आहेत. शैक्षणिक कर्ज माफक व्याजदरात मिळाले पाहिजे. समाजकाल्याण विभागामार्फत मिळणा-या शिष्यवृत्तीत सुटसुटीतपणा असला पाहिजे.

तत्कालीन भाजप सरकारने (डीबीटी) प्रक्रिया आणली. पण, यंत्रणा तयार नव्हती. त्यामुळे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर पैसे मिळण्यास अडचणी आल्या. पैसे खात्यात पडले. तरी, विद्यार्थी फी भरणार नाहीत. असे गृहित धरुन त्यांच्याकडून स्टॅम्प पेपरवर लिहून घेतले. पण, त्याचा फायदा काहीच झाला नाही. आजही ती यंत्रणा पूर्णपणे कार्यरत नाही. कोणताही अभ्यास न करता निर्णय घेतले होते. आता येणा-या काळात या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे.

महाविद्यालयांकडून जीमखाना, इंटरनेट, ग्रंथालयासठी शुल्क घेतले जाते. पण, विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. या सुविधा द्याव्यात. नाही तर शुल्क घेऊ नये, यावर एक आंदोलन करणार आहोत. विद्यापीठ उपकेंद्राचा मोठा प्रश्न आहे. कार्यालयीन कामकाजासाठी विद्यार्थ्यांना नाशिकहून पुण्याला यावे लागते. त्यामुळे जिथे विद्यापीठ आहेत. तिथे विद्यापीठाची उपक्रेंद असली पाहिजेत. प्रत्येक जिल्ह्यात उपकेंद्र असावे. त्यासाठी आमचा काही वर्षांपासून पाठपुरावा सुरु आहे. आता कोविडची परिस्थिती आहे. यातून बाहेर पडल्यानंतर हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. महाविकास आघाडी सरकारकडून हे प्रश्न सुटतील, अशी आशा आहे.

प्रश्न – पिंपरी-चिंचवड शहरात विद्यार्थी संघटनेची बांधणी दिसत नाही. शहराध्यक्षपद रिक्त आहे. संघटन वाढविण्यासाठी काय करणार?
उत्तर –
शहरातील प्रत्येक प्रभागात संघटनेचे पदाधिकारी आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर थोडाशी ढिलाई आली. त्यात कोरोना आल्यामुळे कोणी घराबाहेर पडत नव्हते. महाविद्यालयेही बंद आहेत. त्यामुळे ‘ऑनफिल्डवर’ काम दिसले नाही. परंतु, संघटना बांधणीची कामे सुरु होती. नवीन शहराध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया सुरु आहे. 15 जणांचे अर्ज आले आहेत. सर्वांसोबत चर्चा करुन स्थानिक पदाधिकारी, प्रदेश कार्यकारणीच्या एकमताने लवकरच नवीन शहराध्यक्ष निवडला जाईल. त्यानंतर संघटना पुन्हा जोमाने काम करेल.

प्रश्न – विद्यार्थी संघटनेतून पुढे आलेल्यांना पिंपरी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळवून देणार का?
उत्तर – विद्यार्थी संघटना सर्वांत ‘ज्युनियअर’ आहे. निवडणुकांकडे लक्ष ठेवून काम करणारे फार कमी तरुण विद्यार्थी संघटनेत असतात. निवडणूक लढविण्यास इच्छूक असणारेही काही पदाधिकारी असतात. त्यांच्या हक्कासाठी भांडणे हा संघटनेचा अधिकार आहे. येणारी पालिका निवडणूक लढवू इच्छिणा-यांसाठी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करणार आहे.

प्रश्न – राज्यभरात काम करत आहात. विद्यार्थ्यांचा कसा प्रतिसाद मिळतोय?
उत्तर – फार चांगला प्रतिसाद आहे. शरद पवारसाहेब यांच्याबद्दल तरुणांमध्ये फार आकर्षण आहे. साहेबांचे काम, या वयात काम करण्याची क्षमता, वेळेचे नियोजन यामुळे राज्यातील फार मोठा तरुण वर्ग प्रवाहित झाला आहे. आयुष्यात फार अडचणी आल्या. पुढचे सर्वच रस्ते संपले आहेत, असा प्रश्न निर्माण झाला. तर आम्हाला पवारसाहेब आठवतात असे तरुण सांगत आहेत. विधानसभा निवडणुकी अगोदरचे त्यांचे कष्ट आठवतात.

एकीकडे निष्ठावान सहकारी सोडून जात होते. पक्षात पडझड सुरु होती. दुसरीकडे बलाढ्य सत्ताधारी नाहक प्रकरणात नाव गोवण्याचा प्रयत्न करत होता. त्यावर मात करत पवार साहेबांनी धैर्याने सामना केला आणि पुन्हा नव्याने पक्ष उभा केला. याचे प्रचंड आकर्षण राज्यातील विद्यार्थीवर्गामध्ये आहे. तरुण राजकारणातच नव्हे तर त्यांच्या वैयक्तीत आयुष्याच्या वाटचालीत देखील साहेबांकडे बघून वाटचाल करत आहेत. यामुळे फार मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे जाणवत आहे.

प्रश्न – संघटनेत काम करताना वरिष्ठांचे सहकार्य मिळते का?
उत्तर –
पिंपरी-चिंचवड शहरातील नेत्यांचे मोठे सहकार्य आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच प्रदेश पातळीवर पोहोचू शकलो. राज्यभरात काम करत असताना वरिष्ठ नेत्यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य मिळते. मानसन्मान दिला जातो. निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जाते. याबाबतीत पक्षनेतृत्व फार कटाक्षाने लक्ष घालते. त्यामुळे काम करायला सोपे जाते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.