Interview with Uma Khapre : ‘महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे अक्षम्य दुर्लक्ष, अपेक्षेविना पक्षाकडून खूप मिळाले’

एमपीसी न्यूज (गणेश यादव) – राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. कोविड केअर सेंटर, रुग्णालयात  महिलांवर अत्याचार होत आहेत. महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही. सरकार कानाडोळा करत असून घरात बसून सरकार चालवत आहेत. सरकार केवळ अभ्यास करत आहे. काम काही करत नाही, असा हल्लाबोल भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केला.

तसेच कोणतीही अपेक्षा न करता पक्षाकडून खूप काही मिळाले. महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी, महिलांसाठी काम करण्याचे माझे स्वप्न होते. माझी स्वप्नपूर्ती झाली आहे. तीन वर्षात गरीब, वंचितापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवून महिलांना अर्थिक सक्षम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन, असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या उमा खापरे यांची नुकतीच महिला प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘एमपीसी न्यूज’चे राजकीय प्रतिनिधी गणेश यादव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

प्रश्न – राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. पुढील वाटचाल कशी असेल?
उत्तर –
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनेरी गडाच्या पायथ्याशी जाऊन जिजाऊंचे दर्शन घेतले आणि कामाला सुरुवात केली. जुन्नरच्या काही मुली बेपत्ता होत्या. त्यासंदर्भात नारायणगाव पोलिसांकडे जाऊन तक्रार केली. महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यास, त्यावर आवाज उठविण्यास सुरुवात केली. महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणार आहे. महिला मोर्चाने केवळ रांगोळी आणि दीपप्रज्वलनापूरते मर्यादित न राहता रक्तदान, नेत्रदान शिबीर असे कार्यक्रम  त्यांच्या हिमतीवर करावेत. त्याकरिता महिलांना प्रोत्साहन देत आहे.

संघनटनेत डॉक्टर, परिचारिका, आयटीतील मुली, झोपडपट्टीतील महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सेल तयार करणार आहे. सर्वांचे प्रश्न सरकारकडून सोडवून घेण्याचा प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. महिलांसाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. त्याचा लाभ मिळवून देणे, महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आर्थिक सक्षम, सबल करण्याचा प्रयत्न राहील.

केंद्र सरकारची ‘सुकन्या समृद्धी योजना’ आहे. त्यामध्ये दहा वर्षांच्या आतील गरीब कुटुंबातील दिव्यांग, अनाथ मुलींसाठी सहा वर्षापर्यंत दरवर्षी त्यांच्या नावावर पैसे भरण्यात येत आहेत. या योजनेचा जास्तीत-जास्त मुलींना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहीन. गरीब, वंचितापर्यंत सरकारच्या योजना पोहविणार आहे. महिलेला सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढील तीन वर्षे शक्य होईल, तेवढे काम करणार आहे.

प्रश्न – संघटनेचे काम कसे सुरू आहे?
उत्तर –
राज्याचा संघटनात्मक दौरा बुधवारपासून सुरू करणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात महिलांच्या गाठीभेटी संघटन वाढविण्याबाबत मार्गदर्शन, महिलांना सूचना करणे. बूथपर्यंतच्या कामात महिलांचा संघटनेत सक्रीय सहभाग असला पाहिजे.

आतापर्यंत डॉक्टर आणि पोलिसांचा कोविड योद्धा म्हणून गौरव केला. परंतु, संघटनेच्या वतीने रुग्णवाहिका चालक, आशा वर्कर, परिचारिका, वार्डबॉय, लॉकडाऊन काळात भाजी पुरवणारे भाजीवाले, दूधवाले यांचाही सन्मान केला गेला.

प्रश्न – पक्ष राज्यात विरोधात असताना तुम्हाला पद मिळाले आहे. त्याबाबत काय सांगाल?
उत्तर –
त्याचे मला काही वाटतं नाही. मी पक्षाची खूप जुनी कार्यकर्ती आहे. 1998 पासून महिला मोर्चाची पदाधिकारी म्हणून काम करत आहे. पहिल्यांदा कोषाध्यक्ष झाले. तीनवेळा चिटणीस होते. एकदा उपाध्यक्ष होते. चिटणीस असताना महाराष्ट्राची महिला प्रभारी होते. हे सगळे कोळून प्यायले आहे. सत्ता आणि विरोधक हे दोन्ही मी पाहिले आहे. संघटनेचे काम हे एकमेव धोरण आहे. केंद्र सरकारमध्ये भाजपची सत्ता आहे. महिलांना सक्षम करण्याचे विषय, त्यांचे प्रश्न केंद्र सरकारकडून सोडवून घेण्यात येतील.

प्रश्न – राज्य सरकारचे अपयश लोकांपर्यंत कसे पोहोचविणार?
उत्तर –
राज्य सरकार सर्वंच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. त्याविरुद्ध आंदोलन करत आहे. सोशल मीडियासह विविध पातळ्यांवरून सरकारचे अपयश जनतेसमोर मांडत आहे आणि मांडत राहणार आहे. 3 जुलैला अध्यक्ष झाल्यापासून लगेच सरकार विरोधात लढत आहे. तीन पक्ष विरोधात आहेत. त्यांचे मला काही देणेघेणे नाही. सरकारच्या विरोधात मी सक्षमपणे लढत आहे. राज्यातील प्रत्येक चुकीच्या घटनेबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांना निवेदन देत आहे. महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत राहील.

प्रश्न – राज्यातील महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. महिला सुरक्षित आहेत का?
उत्तर –
राज्यातील मुली, महिला सुरक्षित नाहीत. कोविड केअर सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. याविरोधात भाजप महिला मोर्चा आजच राज्यभर आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकारचे महिलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष नाही. कानाडोळा करत आहेत. घरात बसून सरकार चालविले जात आहे. सरकार केवळ अभ्यास करत आहे. काम काही करत नाही.

प्रश्न – महाराष्ट्र पिंजून काढणार आहात. डोळ्यासमोर काय आहे?
उत्तर – संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. कालच मावळातील एका गावात कार्यक्रमाला मी गेले होते. प्रदेशाध्यक्ष छोट्या गावात का जातात अशी तिकडे चर्चा झाली. मी गावागावात, वस्ती, पाड्यांवर जाऊन संघटना वाढविणार आहे. नाशिक, धुळे, जळगांव, जालना, पुणे ग्रामीण, मुंबई या भागात जाऊन आले आहे. तीन वर्षात पूर्ण राज्यभर फिरणार आहे.

प्रश्न – राज्यातील, शहरातील नेत्यांचे सहकार्य मिळते का?
उत्तर –
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य, साथ आहे.  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, संघटन सरचिटणीस विजय पुराणिक यांचे बहूमोलाचे सहकार्य आहे. मी एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हटले की लगेच परवानगी देतात. पदाधिकारी निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देतात. राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे वेळेवेळी मार्गदर्शन मिळत आहे. शहराचे अध्यक्ष, आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रामुख्याने सहकार्य आहे. माजी खासदार अमर साबळे यांचे खूप चांगले मार्गदर्शन मिळते. या सर्वांचे सहकार्य मिळत असल्याने मी काम करू शकत आहे.

प्रश्न – संघटनेने पालिका निवडणुकीची तयारी सुरू केली आहे का?
उत्तर –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत. शहरात पक्ष संघटना आणखी मजबूत करत आहोत. पालिकेत पुन्हा भाजपची सत्ता आणण्यासाठी जे काही सहकार्य लागेल. ते मी करणार आहे.

प्रश्न – विधानपरिषदेवर संधी मिळेल अशी अपेक्षा आहे का?
उत्तर –
कोणतीही अपेक्षा न करता पक्षाकडून खूप काही मिळाले असून आता कशाला अपेक्षा करायची आहे. महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी, महिलांसाठी काम करण्याचे माझे स्वप्न होते. माझी स्वप्नपूर्ती झाली आहे. प्रदेश जो निर्णय घेईल. मी त्यांच्या निर्णयासोबत असणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.