IPL 2020: बुमराह चमकला; मुंबई इंडियन्सची राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात

एमपीसी न्यूज – राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन संघाने 57 धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने राजस्थानला 194 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलर वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली खेळी करता आली नाही. बटलरने झुंजार 70 धावांची खेळी केली मात्र संघ 57 धावांनी पराभूत झाला. मुंबई कडून बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले. 

राजस्थानची सुरुवात खराब झाली पहिल्याच षटकात जैस्वाल बाद झाला आणि दुस-या षटकात स्मिथ बाद झाला त्यानंतर जोस बटलरने फटकेबाजी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याला कुणाची साथ मिळाली नाही. बटलरने झुंजार 70 धावांची खेळी केली‌.

जोफ्रा आर्चरने 24 धावा केल्या. राजस्थानचा संघ एकोणिसाव्या षटकात सर्वबाद 136 धावापर्यंत मजल मारु शकला आणि संघ 57 धावांनी पराभूत झाला. मुंबई कडून बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले तर ट्रेन्ट बोल्ट आणि पॅटिन्सन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले व चहर आणि पोलार्ड यांनी 1-1 बळी घेतला.

मुंबईच्या रोहित शर्मा व क्विंटन डी कॉक जोडीने तुफान फटकेबाजी करत चांगली सुरूवात केली होती, पण पदार्पणाचा सामना खेळणारा कार्तिक त्यागी याने आयपीएलच्या पहिल्याच षटकात डी कॉकला बाद केलं. डी कॉकने 15 चेंडूत 23 धावा केल्या.

सूर्यकुमार यादव सोबत रोहितने चांगली भागीदारी केली. पण श्रेयस गोपालने रोहितला मोठा फटका मारण्यास भाग पाडले आणि तो झेलबाद झाला. रोहितने 23 चेंडूत 2 चौकार व 3 षटकारांसह 35 धावा केल्या. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर इशान किशन पहिल्या चेंडूवर बाद झाला.

तीन गडी झटपट बाद झाल्याने कृणाल पांड्याला लवकर फलंदाजीस पाठवण्यात आले पण तो 17 चेंडूत 12 धावा करून माघारी परतला. एकीकडे गडी बाद होताना सूर्यकुमार यादवने मात्र एक बाजू लावून धरत झुंजार अर्धशतक ठोकलं.

सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या या जोडीने शेवटपर्यंत तळ ठोकत मुंबईने 193 धावांपर्यंत मजल मारली. श्रेयस गोपालने 2 चेंडूत 2 बळी टिपले जोफ्रा आर्चर आणि कार्तिक त्यागी यांनी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.