IPL 2020: चेन्नईची बंगळुरूवर आठ गडी राखून मात

एमपीसी न्यूज – पुणेकर ऋतुराज गायकवाडच्या दमदार खेळीच्या जोरावर चेन्नईने बंगळुरूवर आठ गडी राखून सहज विजय मिळवला. विराट कोहलीने झुंजार अर्धशतक झळकावत बंगळुरूला 20 षटकात 6 बाद 145 धावांपर्यंत मजल मारली होती. सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 65 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीला उतरलेली फिंच-पडीकल जोडी जपून फलंदाजीला सुरूवात केली. पण फिंच 15 धावांवर माघारी परतला. त्यानंतर देवदत्त पडीकल 22 धावा काढून माघारी परतला. कर्णधार विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स यांनी बराच खेळ खेळपट्टीवर तळ ठोकला पण चेन्नईच्या गोलंदाजांनी त्याला फटकेबाजी करून दिली नाही.

68 चेंडूत त्यांना 82 धावांचीच भागीदारी करता आली. विराट कोहलीने अर्धशतक ठोकलं पण मोठे फटके खेळताना डीव्हिलियर्स 39 धावांवर तर विराट 50 धावांवर माघारी परतला. मोईन अली आणि ख्रिस मॉरिसही स्वस्तात बाद झाला. त्यामुळे बंगळुरूला 20 षटकांत केवळ 145 धावाच करता आल्या.

या आव्हानाचा पाठलाग करताना मराठमोळा ऋतुराज गायकवाड याने दमदार खेळी करत शानदार अर्धशतक ठोकलं. त्याने 42 चेंडूत ही कामगिरी केली आणि आपली निवड सार्थ ठरवली. फाफ डु प्लेसिस (25) आणि अंबाती रायडू (39) दोघांनीही आपापल्या डावाची सुरूवात चांगली केली होती. पण त्यांना मोठ्या खेळी उभारता आल्या नाहीत. ऋतुराजने मात्र धोनीच्या साथीने शेवटपर्यंत मैदानावर तळ ठोकत संघाला विजय मिळवून दिला. धोनीनेही 3 चौकारांच्या मदतीने नाबाद 19 धावा केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.