IPL 2020 : चेन्नईचा पंजाबवर 10 गडी राखून दणदणीत विजय

एमपीसी न्यूज – पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला 179 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई करत चेन्नईला 10 गडी राखत विजय मिळवून दिला.

वॉटसन आणि डु प्लेसिस या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. जॉर्डनच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत वाॅटसनने 31 चेंडूत अर्धशतक ठोकलं. आयपीएलमधील हे वॉटसनचं विसावं अर्धशतक ठरलं. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत डु प्लेसिसने 33 चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याचं हे आयपीएलमधील पंधरावं अर्धशतक ठरलं.

या दोघांनी आपली विकेट न गमावता संघाला 179 धावांचं लक्ष्य सहज गाठून दिलं. डु प्लेसिसने नाबाद 87 तर वॉटसनने नाबाद 83 धावा केल्या. चेन्नईच्या संघाची ही आयपीएल इतिहासातील सर्वोत्तम सलामी भागीदारी ठरली.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून पंजाबने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालला चांगली सुरूवात मिळाली पण तो 26 धावांवर तो बाद झाला.

आज संधी मिळालेला मनदीप सिंगदेखील चांगल्या सुरूवातीनंतर 27 धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी 58 धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले.

केएल राहुलचं धडाकेबाज अर्धशतक आणि निकोलस पूरनची तडाखेबंद फटकेबाजी याच्या जोरावर पंजाब दोनशेपार सहज मजल मारेल अशी अपेक्षा होती. पण शेवटच्या काही षटकांत चेन्नईच्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध कामगिरी करत पंजाबच्या धावगतीवर अंकुश लावला.

सलग दोन चेंडूवर राहुल आणि पूरनला बाद करणाऱ्या शार्दूल ठाकूर सर्वाधिक दोन गडी बाद केले तर रविंद्र जडेजा व पियुष चावला यांनी 1-1 गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.