IPL 2020 : चेन्नईचा सलग दुसरा पराभव, दिल्ली कॅपिटल्सची चेन्नईवर 44 धावांनी मात

एमपीसी न्यूज – महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर 44 धावांनी मात केली. विजयासाठी दिलेलं 176 धावांचं लक्ष्य चेन्नईला पूर्ण करता आलं नाही. 

दिल्लीने दिलेल्या 176 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईने सावध सुरुवात केली. परंतु अक्षर पटेलच्या चेंडूत वॉटसन आऊट झाला आणि संघाला गळती लागली. त्यानंतर मुरली विजय, ऋतुराज गायकवाड ठराविक अंतराने माघारी परतले.

यानंतर केदार जाधव आणि फाफ डु-प्लेसिस यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु मधल्या षटकांत अपेक्षित धावगती राखण्याच हे फलंदाज अपयशी ठरले, ज्यामुळे चेन्नईसमोरचं आव्हान अधिक बिकट झालं.

फाफ डु-प्लेसिस आणि केदार जाधव माघारी परतल्यानंतर धोनी आणि रवींद्र जाडेजा यांनी फटकेबाजीचा प्रयत्न केला. परंतु त्यांचे प्रयत्नही तोकडे पडले. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 3, नॉर्टजेने 2 तर अक्षर पटेलने 1 बळी घेतला.

त्याआधी दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ या दिल्लीच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी 94 धावांची भागीदारी करत चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. खेळपट्टीवर स्थिरावल्यानंतर दोन्ही फलंदाजांनी मैदानात चौफेर फटकेबाजी केली.

पृथ्वी शॉने यादरम्यान आपलं अर्धशतक साजरं केलं. ही जोडी दिल्लीसाठी मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच पियुष चावलाने शिखर धवनला माघारी धाडत दिल्लीची जोडी फोडली. तो 35 धावा काढून माघारी परतला.

यानंतर अर्धशतकवीर पृथ्वी शॉही चावलाच्या गोलंदाजीवर यष्टीचीत झाला. 43 चेंडूत 9 चौकार आणि एका षटकारासह पृथ्वीने 64 धावांची खेळी केली.

ऋषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही फलंदाजांमध्ये अर्धशतकी भागीदारीही झाली, परंतू मोक्याच्या षटकांत धावा करण्यात ते अपयशी ठरले. 19 व्या षटकाच्या अखेरीस कर्णधार श्रेयस अय्यर माघारी परतला.

यानंतर स्टॉयनिस आणि पंत जोडीने दिल्लीला 175 धावांपर्यंत मजल मारुन दिली. चेन्नईकडून पियुष चावलाने 2 तर सॅम करनने 1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.