IPL 2020 : ‘सुपर ओव्हर’मध्ये ‘दिल्ली कॅपिटल्स‌’ची ‘किंग्ज इलेव्हन पंजाब’वर रोमहर्षक मात

एमपीसी न्यूज – आयपीएल तेराव्या हंगामाचा दुसरा सामना किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात रंगला. सुपरओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर रोमहर्षक मात केली.

विजयासाठी अवघ्या 3 धावांचं आव्हान मिळालेल्या दिल्लीने आपलं लक्ष्य सहज पूर्ण करत संघर्षपूर्ण लढतीत विजय संपादन केला. कगिसो रबाडाने सुपरओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा देत 2 बळी घेतले. ऋषभ पंतने विजयासाठी दिलेलं आव्हान सहज पूर्ण करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

दुबईच्या मैदानावर दिल्ली आणि पंजाब यांच्यात रंगलेला सामना निर्धारित वेळेत बरोबरीत सुटला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात दिल्लीने भेदक मारा करत पंजाबला 157 धावांत रोखलं. मयांक अग्रवालने 89 धावांची बहारदार खेळी करत पंजाबला विजयाच्या जवळ आणलं.

स्टॉयनिसने अखेरच्या षटकात दोन बळी घेत सामना बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं आणि सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सुपर ओव्हर खेळवावी लागली. त्यामध्ये मिळालेल्या 3 धावांचे आव्हान दिल्लीने सहज पार केले.

त्याआधी, नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमी आणि पंजाबच्या इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाची गाडी रुळावरुन घसरली वीस षटकांत दिल्लीचा संघ 157 धावांपर्यंत मजल मारु शकला.

आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी दिल्लीला चांगलीच महागात पडली, परंतु अखेरच्या षटकांत स्टॉयनिसने फटकेबाजी करुन सर्व कसर भरून काढली. स्टॉयनिसने 21 चेंडूत 53 धावांची खेळी करुन दिल्लीचा डाव सावरला.

पंजाबकडून मोहम्मद शमीने 3, शेल्डन कोट्रेलने 2 तर रवी बिश्नोईने 1 बळी घेतला. दिल्लीकडून पहिल्या डावात रबाडा-आश्विन आणि स्टॉयनिस या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले. मोहीत शर्मा आणि अक्षर पटेलने 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.