IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सकडून राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव, गुणतालिकेत दिल्ली अव्वल

एमपीसी न्यूज – दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव करीत सहाव्या विजयाची नोंद केली. दिल्लीने दिलेल्या 162 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 148 धावांमध्ये गारद झाला. दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांची अर्धशतकीय खेळी महत्त्वपूर्ण ठरली. 12 गुणांसह दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर नंबर वनवर पोहोचला आहे.

राजस्थानकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर संजू सॅमसन 25, रॉबिन उथप्पा 35, जोस बटलरने 22 धावा करून तंबूत परतले.

दिल्लीकडून तुषार देशपांडे, ऑनरीच नॉर्टजेने प्रत्येकी दोन बळी घेतले तर कसिगो रबाडा, आर अश्विन, अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

त्याआधी दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सपुढे 162 धावांचं लक्ष्य ठेवले.

सलामीवीर शिखर धवन आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनी दिल्लीकडून अर्धशतके ठोकली. तर राजस्थान रॉयल्सकडून जोफ्रा आर्चरने शानदार गोलंदाजी करत चार षटकांत 19 धावा देऊन तीन बळी घेतले.

सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉ खाते न उघडताच बाद झाला. अजिंक्य रहाणेही 2 धावा करुन बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी दिल्लीचा डाव सावरत धावसंख्येला आकार दिला.

शिखर धवनने 33 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी केली. त्याने सहा चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर श्रेयस अय्यरने 43 चेंडूत 53 धावा केल्या. अय्यरने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले.

अखेरच्या षटकात दिल्लीची धावगती कमी करण्यात राजस्थानला यश मिळाले. मार्क्स स्टॉयनिसने 19 चेंडूत फक्त 18 धावा केल्या आणि अ‍ॅलेक्स कॅरीनेही 13 चेंडूत 14 धावा केल्या. त्यामुळे दिल्लीचा संघ 20 षटकात केवळ 161 धावा करू शकला.

राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने तीन बळी घेतले. तर जयदेव उनाडकटने दोन, कार्तिक त्यागी व श्रेयस गोपाळ यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.