IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 59 धावांनी मात 

एमपीसी न्यूज – दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू वर 59 धावांनी मात केली. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या 197 धावांचं आव्हान बंगळुरुला पेलवलं नाही. कर्णधार विराट कोहलीचा अपवाद वगळता बंगळुरूच्या इतर सर्व फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजी समोर टिकाव धरू शकले नाही. बंगळुरुचा संघ 20 षटकात 9 गडी गमावत 137 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

बंगळुरुच्या संघाची सुरुवातच खराब झाली. देवदत पडीकल, फिंच आणि डिव्हीलियर्स हे तीन बिनीचे शिलेदार झटपट माघारी परतले. यानंतर कर्णधार विराट कोहलीने मोईन अलीच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही फलंदाजांमध्ये एक महत्वाची भागीदारीही झाली.

एकीकडे इतर सर्व फलंदाज बाद होत असताना विराट कोहलीने एक बाजू लावून धरत झुंज सुरु ठेवली होती. परंतू कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर तो ही माघारी परतला विराट कोहलीने 43 धावांची खेळी केली. त्यानंतर मैदानावर आलेला एकही फलंदाज दिल्लीच्या माऱ्याचा सामना करु शकला नाही. दिल्लीकडून कगिसो रबाडाने 4, अक्षर पटेल आणि नॉर्ट्जेने प्रत्येकी 2 तर आश्विनने 1 बळी घेतला.

सुरुवातीला नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने फटकेबाजी करत दिल्लीला चांगली सुरुवात करुन दिली. धवन आणि शॉ जोडी मैदानावर स्थिरावून मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत असतानाच मोहम्मद सिराजने पृथ्वी शॉला माघारी धाडत बंगळूरला पहिलं यश मिळवून दिलं. पृथ्वीने 42 धावा केल्या.

यानंतर ठराविक अंतराने शिखर धवन (32) आणि कर्णधार श्रेयस अय्यरही (11) माघारी परतले. त्यानंतर अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने अखेरच्या षटकांमध्ये महत्वपूर्ण भागीदारी करत दिल्लीला पुन्हा सामन्यात कमबॅक करण्यात मदत केली.

विशेष करुन स्टॉयनिसने आक्रमक पवित्रा घेत चौकार-षटकारांतून धावा केल्या. स्टॉयनिसने नाबाद 53 धावा केल्या तर रिषभ पंतने 37 धावा केल्या. बंगळुरुकडून मोहम्मद सिराजने 2 तर इसुरु उदाना आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.