IPL 2020 FINAL : आज आयपीएलचा महामुकाबला; कोण मारणार बाजी ?

एमपीसी न्यूज – आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा अंतिम सामना आज (मंगळवारी) दुबईच्या मैदानावर रंगणार आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच फायनलमध्ये आलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असणार आहे. यामुळे निकालाची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे.

सलग दुसऱ्या जेतेपदासाठी उत्सुक असलेल्या मुंबईची फलंदाजांची फळी स्पर्धेत सर्वोत्तम मानली जाते. रोहित शर्माव्यतिरिक्त क्विंटन डीकॉक (483 धावा), सूर्यकुमार यादव (461), इशान किशन (483) यांच्यामुळे मुंबईची मधली फळी भक्कम असून हार्दिक पंड्या, कायरन पोलार्ड अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्यात वाकबगार आहेत. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश ठेवण्यासाठी दिल्लीच्या गोलंदाजांना फार परिश्रम घ्यावे लागतील.

मुंबईच्या जसप्रीत बुमराह (27 बळी) आणि ट्रेंट बोल्ट (22) या वेगवान जोडीपासून दिल्लीला पुन्हा सावध राहावे लागणार आहे. हंगामात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असणाऱ्या बुमराचे ‘पर्पल कॅप’कडेही लक्ष असेल. त्याशिवाय फिरकीपटू राहुल चहर (15) मधल्या षटकांत धावा रोखण्यात पटाईत आहे.

दुसरीकडे हंगामात दोन शतके झळकावणारा सलामीवीर शिखर धवन (603 धावा) आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस (352 आणि 12 बळी) यांच्यावर दिल्लीची प्रामुख्याने भिस्त आहे. कर्णधार अय्यर (454) फलंदाजीतही छाप पाडत असून क्षेत्ररक्षणातील त्याची व्यूहरचना यशस्वी ठरत आहे. ऋषभ पंत आणि अजिंक्य रहाणे यांनीही अंतिम फेरीत योगदान दिल्यास दिल्लीला रोखणे मुंबईसाठी कठीण जाईल.

‘पर्पल कॅप’च्या शर्यतीत अग्रस्थानी असणारा कॅगिसो रबाडा (29 बळी) आणि आनरिख नॉर्किए (20) या दक्षिण आफ्रिकेच्या जोडीने दिल्लीच्या प्रत्येक विजयात मोलाची भूमिका बजावली असून त्यांना फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांची साथ लाभत आहे. परंतु मुंबईच्या संघात डावखुऱ्या फलंदाजांचा भरणा असल्यामुळे प्रवीण दुबे किंवा अक्षरपैकी एकालाच अंतिम सामन्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईने आतापर्यंत चारवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. पाचवी आयपीएल जिंकण्यासाठी मुंबई इंडियन्सपुढे दिल्ली कॅपिटल्सचे तगडे आव्हान असेल. दिल्लीला आतापर्यंत एकदाही जेतेपद मिळाले नाही. त्यामुळे पहिला आयपीएल किताब जिंकण्यासाठी दिल्ली जोरदार प्रयत्न करणार यात शंका नाही. एकंदरीत आयपीएलच्या फायनलची ऊस्तुकता शिगेला पोहोचली आहे. या माहामुकाबल्यात बाजी कोण मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III