IPL 2020 : केएल राहुलची 74 धावांची खेळी व्यर्थ, पंजाबचा दोन धावांनी पराभव

एमपीसी न्यूज – कोलकाता‌ आणि पंजाब यांच्या रंगलेल्या अतिशय रोमांचक सामन्यात पंजाबचा दोन धावांनी पराभव झाला. सामना सुपरओव्हरमध्ये नेण्यासाठी पंजाबला शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज होती, पण अवघ्या एका इंचाने चेंडू सीमारेषेनजीक पडला आणि पंजाबला केवळ चारच धावा मिळाल्या. कॅप्टन राहुलने 74 धावांची खेळी केली पण मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने त्याची खेळी व्यर्थ गेली.

कोलकाताच्या 165 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मयंक अग्रवाल आणि लोकेश राहुल यांनी दमदार शतकी सलामी दिली. चौदाव्या षटकात 118 धावांवर पंजाबने मयंक अग्रवालचा बळी गमावला. त्याने 56 धावा केल्या.

त्यानंतर आलेल्या निकोलस पूरनला फटकेबाजी करता आली नाही. तो 16 धावांवर बाद झाला. दमदार खेळी करणारा राहुल देखील एकोणिसाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. त्याने 58 चेंडूत सह चौकारांसह 74 धावा केल्या.

शेवटच्या तीन षटकात धावांचा ओघ आटल्याने शेवटच्या षटकात पंजाबला विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. सुनील नारायणच्या गोलंदाजीवर पहिल्या पाच चेंडूंवर मॅक्सवेलने कसाबसा एक चौकार लगावला.

त्यामुळे एका चेंडूत पंजाबला विजयासाठी सात धावांची तर सुपर ओव्हरसाठी सहा धावांची आवश्यकता होती. मॅक्सवेलने ऑफसाइडला पडलेला चेंडू हवेत उडवला पण अवघ्या काही इंचांनी चेंडू सीमारेषेच्या आत पडला आणि पंजाबला केवळ चार धावाच मिळू शकल्या.

नाणेफेक जिंकून कर्णधार दिनेश कार्तिकने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. राहुल त्रिपाठी 4 धावांवर तर नितीश राणा 2 धावांवर माघारी परतला. त्यानंतर गिल आणि मॉर्गन या दोघांनी चांगली फलंदाजी केली. मॉर्गन खेळपट्टीवर स्थिरावला असतानाच झेलबाद झाला. त्याने 23 चेंडूत 2 चौकार व 1 षटकार खेचत 24 धावा केल्या.

मग गिल आणि कर्णधार कार्तिक यांना कोलकाताच्या डावाला आकार दिला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 43 चेंडूत 82 धावांची भागीदारी केली.

दरम्यान दोघांनीही आपली अर्धशतकं झळकावली. गिल 57 धावा काढून बाद झाला. पाठोपाठ आंद्रे रसेलही 5 धावांवर माघारी परतला.

कार्तिक मात्र शेवटपर्यंत मैदानात उभा होता. त्याने 29 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 58 धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, बिश्नोई आणि सिंग यांनी 1-1 बळी घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.