IPL 2020 : सुपर ओव्हर मध्ये कोलकताचा हैदराबादवर दमदार विजय

एमपीसी न्यूज – हैदराबाद आणि कोलकाता संघात विजयासाठी झालेल्या सुपर ओव्हर मध्ये कोलकताने विजय मिळवला. कोलकाताने 20 षटकांत 163 धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला.

त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये लॉकी फर्ग्युसनने केवळ 2 धावा व 2 बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. तर इयॉन मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

कोलकताने दिलेल्या 164 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर केन विल्यमसन आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विल्यमसन 29 धावांवर बाद झाला. प्रियम गर्गदेखील 4 धावावर माघारी गेला. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती. पण तो 36 धावा काढून बाद झाला. मधल्या फळीतील मनिष पांडे 6 आणि विजय शंकरने 7 धावा केल्या.

अब्दुल समदने 15 चेंडूत 23 धावा करत हैदराबादसाठी विजयाच्या आशा जागवल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तीन चौकार ठोकत सामना बरोबरीत सोडवला. वॉर्नरने 5 चौकारांसह नाबाद 47 धावा केल्या. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा पहिलाच सामना खेळणाऱ्या फर्ग्युसनने 18 धावांत 3 बळी टिपले तर पॅट कमीन्स, शिवम मावी आणि वरुन चक्रवर्ती यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

सुरवातीला नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाताच्या संघाकडून राहुल त्रिपाठी आणि शुबमन गिल या दोघांनी तडाखेबाज सुरूवात केली. त्रिपाठी 23 धावांवर बाद झाल्यावर शुबमन गिल आणि नितीश राणाने फटकेबाजी केली. गिल 5 चौकारांसह 36 धावांवर तर नितीश राणा 3 चौकार व एका षटकारासह 29 धावांवर माघारी परतला.

आंद्रे रसल 9 धावा काढून बाद झाला. त्यानंतर इयॉन मॉर्गन (34) आणि दिनेश कार्तिक (नाबाद 29) यांनी 30 चेंडूत या दोघांनी 58 धावांची भागीदारी केली. हैदराबाद कडून टि नटराजन याने दोन तर, राशिद खान, विजय शंकर व थम्पी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.