_MPC_DIR_MPU_III

IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्सची चेन्नईवर 10 धावांनी मात

एमपीसी न्यूज – अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईवर 10 धावांनी मात केली. मोक्याच्या क्षणी कोलकत्ता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी केलेलं पुनरागमन आणि अखेरच्या षटकांत सुनिल नारायण व वरुण चक्रवर्तीचा खुबीने वापर करत कोलकाताने सामन्याचं चित्र बदलून टाकलं.

_MPC_DIR_MPU_IV

कोलकाता नाईट रायडर्सने दिलेल्या 168 धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या संघाने आश्वासक सुरुवात केली. फाफ डु-प्लेसिस आणि शेन वॉटसनने सुरुवातीच्या षटकांमध्ये काही चांगले फटके खेळले. शिवम मवीने डु-प्लेसिसला माघारी धाडत चेन्नईला पहिला धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या अंबाती रायुडूने शेन वॉटसनला चांगली साथ दिली.

दोन्ही फलंदाजांनी दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करत चेन्नईचा डाव सावरला. ही जोडी चेन्नईला विजयपथावर घेऊन जाणार असं वाटत असतानाच कमलेश नागरकोटीने रायुडूला माघारी धाडलं. दुसरीकडे शेन वॉटसनने आपलं अर्धशतक पूर्ण केलं, मात्र यानंतर लगेचच तो नारायणच्या गोलंदाजीवर पायचीत होऊन माघारी परतला. वॉटसनने 40 चेंडूत 6 चौकार आणि एक षटकारासह 50 धावा केल्या.

_MPC_DIR_MPU_II

महेंद्रसिंह धोनीने हा दबाव झुगारत फटकेबाजीचा प्रयत्न केला. पण यात त्याला अपयश आलं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळताना तो 11 धावा काढून माघारी परतला. त्याच्या सोबत असलेला सॅम करनही आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना माघारी परतला. यानंतर चेन्नईचे फलंदाज सामन्यात पुनरागमन करु शकले नाहीत. कोलकात्याकडून शिवम मवी, वरुण चक्रवर्ती, नागरकोटी, नारायण आणि रसेल यांनी प्रत्येकी 1-1 बळी घेतला.

त्याआधी, सलामीवीर राहुल त्रिपाठीच्या धडाकेबाज 81 धावांच्या खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईविरुद्ध सामन्यात 167 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाता नाईट रायडर्सने डावाची चांगली सुरुवात केली होती. परंतू शुबमन गिल माघारी परतला आणि कोलकात्याच्या डावाची घसरगुंडी उडाली. मधल्या फळीतला एकही फलंदाज राहुल त्रिपाठीसोबत महत्वपूर्ण भागीदारी करु शकला नाही. चेन्नईच्या गोलंदाजांनीही मधल्या षटकांमध्ये चांगलं पुनरागमन केलं.

कोलकाता नाईट रायडर्सचे इतर फलंदाज माघारी परतत असतानाही राहुल त्रिपाठीने एक बाजू लावून धरली. चेन्नईच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करत राहुलने आपलं अर्धशतक झळकावलं. अखेरच्या षटकांत भरवशाचे फलंदाज स्वस्तात माघारी परतत असतानाही त्रिपाठी एक बाजू सांभाळत मैदानावर पाय रोवून उभा राहिला. मधल्या षटकांमध्ये राहुलने फटकेबाजी करत कोलकात्याला आश्वासक धावसंख्या गाठून दिली. अखेरच्या षटकांत ब्राव्होच्या गोलंदाजीवर तो देखील शेन वॉटसनकडे झेल देऊन माघारी परतला.

51 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने राहुलने 81 धावा केल्या. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्सला 167 धावांचा टप्पा गाठून दिला. चेन्नईकडून ब्राव्होने 3 तर शार्दुल ठाकूर, सॅम करन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.