IPL 2020 News : कोलकाता नाईट रायडर्सची दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी मात

एमपीसी न्यूज – कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सवर 59 धावांनी मात केली आहे. या विजयासह कोलकाताने प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम राखल्यामुळे आता यापुढील संघांमध्ये रंगणारे सामने अधिक रंगतदार होणार आहेत. विजयासाठी दिलेल्या 195 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ 135 धावांपर्यंतच मजल मारु शकला.

विजयासाठी 195 धावांचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवातच खराब झाली. सलामीवीर अजिंक्य रहाणे शून्यावर माघारी परतला. या सामन्यात शिखर धवनही अपयशी ठरला.

यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी भागीदारी करत संघाचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ऋषभ पंत 27 धावा काढून बाद झाला.

यानंतर दिल्लीच्या डावाला लागलेली गळती थांबलीच नाही. श्रेयस अय्यर 47 धावा काढून माघारी परतला. स्टॉयनिस आणि अक्षर पटेलही मोठे फटके खेळताना विकेट गमावून बसले. कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने 5 तर पॅट कमिन्सने 3 आणि लॉकी फर्ग्युसनने 1 बळी घेतला.

सुरवातीला कोलकाताने नितीश राणा आणि अष्टपैलू सुनिल नारायण यांच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्लीविरुद्ध सामन्यात 194 धावांपर्यंत मजल मारली.

दिल्लीच्या गोलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात करत कोलकाता नाईट रायडर्सला धक्के दिले. नितीश राणा आणि सुनिल नारायण हे दोन्ही फलंदाजांनी चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली.

नितीश राणा आणि सुनिल नारायण यांनी दरम्यानच्या काळात आपलं अर्धशतकही साजरं केलं. नारायणने 32 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावा केल्या.

नितीश राणानेही 53 चेंडूत 81 धावांची खेळी केली. सुनिल नारायण माघारी परतल्यानंतर नितीश राणाने मॉर्गनच्या साथीने संघाला 194 धावांचा टप्पा गाठून दिला. दिल्लीकडून नॉर्ज, स्टॉयनिस आणि रबाडाने प्रत्येकी 2-2 बळी घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.